रमेश पानसे यांनी ‘भाषांतर करण्याचे काम ‘सुरू’ आहे’ ह्या वाक्यावर आक्षेप घेतला आहे. ‘सुरू’ऐवजी तेथे ‘चालू’ म्हणणे योग्य होईल असे ते सुचवतात. परंतु अलिकडे हिंदीच्या संपर्कामुळे ‘चालू’ याला हीन अर्थ आला आहे, म्हणून ‘चालू’ याचा वापर विवेकानेच करावा लागेल.
‘सुरू असणे’ ही ‘सुरू होण्या’नंतरची क्रिया आहे. ‘सुरू होणे’ आणि ‘सुरू असणे’ हे दोन्ही प्रयोग मराठी भाषेच्या धाटणीला धरून आहेत. ‘सुरू असणे’ म्हणजे ‘सुरू झालेले काम बंद नसणे.’ ‘नळ सुरू आहे’ म्हणजे तो अजून बंद केलेला नाही. म्हणून ‘भाषांतराचे काम सुरू आहे’ असे म्हणणे गैर नाही. संदर्भ : हिवाळा 2009 अंक 1. पृ. 78
न.ब.पाटील – अ-37, कमलपुष्प, जन. अरुणकुमार वैद्य नगर, वांद्रे (पश्चिम), मुंबई 400 050