औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन 1989 साली बाहेर पडलेल्या सात तरुण डॉक्टरांनी मिळून बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही संस्था आणि त्याद्वारे हेडगेवार रुग्णालय सुरू केले. उद्दिष्ट होते आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकास! डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांचा समूह तयार झाला. त्यांनी रुग्णालयाच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात उत्कृष्ट दर्ज्याची वैद्यकीय सेवा देत असतानाच, शहरी झोपडवस्ती आणि दुर्गम ग्रामीण भागांतील वस्त्या येथे मूलभूत आरोग्याच्या प्रश्नावर कामाला सुरुवात केली. पण आरोग्याचे प्रश्न केवळ आरोग्याचे नसतात; त्यांच्या मुळाशी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक समस्या आहेत. सर्व प्रश्नांची तशी व्याप्ती लक्षात घेऊन, रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच सोबत ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’ची स्थापना (1993 साली) केली. अन्य सामाजिक विषयांतील मंडळीही त्यांच्यासोबत आली. तीन शहरी उपेक्षित वस्त्या तीन दुर्गम गावे यांतून आरोग्य व महिला संघटन यांमध्ये सुरू झालेले काम आज आरोग्य, शिक्षण, पाणी यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, कौशल्यविकास आणि उपजीविका या विषयांपर्यंत गेले आणि ते चाळीस शहरी वस्त्या व दीडशे गावांपर्यंत पोचले आहे.
मंडळाने जिल्ह्यातील ज्या तीन दुर्गम गावांमध्ये आरोग्याच्या प्रश्नावर कामाला सुरुवात केली त्या कामातून काही प्रश्नांची साखळी त्यांच्या समोर उभी राहिली. त्यांनी त्यातील शिक्षण हा विषय 2001 साली हाती घेतला. त्यांहनी दुर्गम भागातील महिलांसाठी साक्षरता वर्ग सुरू केले. सर्वांचे जीवन शेतीवर अवलंबून होते. आरोग्यसेवा आणि शिक्षण या सोयी झाल्यामुळे त्या भागातील लोकांनी मंडळाशी जवळीक साधली.
औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वेकडील गावांतील शेती व त्यावर अवलंबून असणाऱ्या अल्प भूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे. खडकाल भूप्रदेशामुळे पाणी जमिनीत मुरवण्यातही मुळात मर्यादा येतात, त्यातच वारंवार येणारे अवर्षण
बाराही महिने टँकरने पाणी पुरवावे लागे. मंडळाने शेतकऱ्यांच्या कृषीविषयक समस्या जाणून घेतल्या. मंडळाने त्यांची हलाखीची परिस्थिती पाहून 2007 साली त्यायसंबंधीही काम सुरू केले. त्यााच दरम्यान, कृषितज्ज्ञ सुहास आजगावकर मंडळाशी जोडले गेले. शेतीचा विकास करायचा तर त्याचे तंत्र पाण्याशी निगडित आहे. मंडळाचे प्रकल्प संचालक प्रसन्न पाटील सांगतात, की पाच ‘ज’ अर्थात, जन, जल, जंगल, जनावरे, जमीन यांचे व्यवस्थापन जर नीट झाले तर सर्व प्रश्न सुटतील! 2012 सालच्या भीषण दुष्काळात चारा-छावण्या लावाव्या लागल्या. त्या च दरम्यान काही बागायतदारांना बागा मोडाव्या लागल्या. तशा परिस्थितीमध्ये (‘जिओ फोरम संस्थे’च्या माध्यमातून) हायड्रोजिओलॉजिकल सर्व्हे केला गेला. मंडळातील इतर सदस्य बंधाऱ्याविषयी नकाशे बनवणे, विहिरींचा आणि बंधाऱ्यांचा सर्व्हे, पावसाचे मोजमाप, ज्या गावात काम करायचे आहे तेथील अहवाल बनवणे अशा प्रकारची कामे हाती घेऊन नियोजनाला लागले.
मंडळाने शेतकऱ्यांना ठिबक सिंचन पद्धत, कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धत, बाजार यांविषयी मार्गदर्शन केले, जलसाक्षरतेची शिबिरे घेतली. शेतकरी जलसंवर्धनाच्या संदर्भात एकेक कल्पना समोर आणत आहेत. चौका परिसारातील (येथील अठरा) शेतकऱ्यांनी मिळून स्वत:ची ‘नवलाई’ नावाची फार्म्स प्रोड्यूसर्स कंपनी सुरू केली आहे. त्याऱ कंपनीत बीबियाणे, खत, फवारणीचे औषध हे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
संस्थेने आय.एल.अॅण्ड एफ.एस., फोर्ब्स या कंपन्या सी.आय.आय. ही उद्योगाची संघटना, जलतज्ज्ञ, भूगर्भतज्ज्ञ आणि गावकरी या सगळ्यांची मोट बांधून नादुरुस्त बंधाऱ्यांचे (कोल्हापुरी बंधाऱ्याचे) पुनरुज्जीवन (रूपांतर पक्क्या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये) केले आहे. मुख्यत: छोटे नाले आणि ओढ्यांचे पात्र रुंद आणि खोल करणे (डोह तयार करणे),समतल चर खोदणे, शेतीची बांधबंदिस्ती करवून घेणे, वृक्षारोपण ही व जलसंधारणाची अशी इतर कामे मंडळामार्फत वेगाने सुरू आहेत. यात पुढे प्राज फाउंडेशन; नाबार्ड, अॅटलस कोप्को, पीड्ब्लुसी यांची मोलाची मदत झाली.
मंडळाने जलसंवर्धनाच्या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘जलमित्र अभियान’ हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. मंडळाने ज्या ग्रामीण भागात काम केले तेथील प्रत्येकी दोन-तीन तरुण शेतकऱ्यांना ‘जलमित्र अभियाना’त सामील करून घेतले आहे. त्यांनी त्यातून पंचेचाळीस व्यक्तींची ‘जलमित्र’ म्हणून निवड केली आहे. त्यांना पाणलोट क्षेत्राच्या विकासाविषयी प्रशिक्षण नियमित दिले गेले. ‘जलमित्र’ त्यांच्या त्यांच्या गावात जलसंवर्धन चळवळ चालवतात, ग्रामस्थांना जलसाक्षर करतात; तसेच, गावपातळीवर जलशाश्वतीचे सर्व प्रयत्न करतात. संस्थेलने 2016 च्या उन्हाळ्यापर्यंत तालुक्यारतील तेरा गावांमध्ये ते काम यशस्वी रीत्या पूर्ण केले. औरंगाबादेतील काम पाहून, जालन्याच्या उद्योजकांनी पुढाकार घेऊन तेथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी घाणेवाडी जलाशयात वर्षानुवर्षें साचलेला गाळ काढण्यास सुरुवात केली. तेथील पाणीटंचाई कमी झाली. त्यां कामात मंडळ सहयोगी संस्था म्हणून होती. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात मंडळाच्या कार्याची दखल घेतली गेली. त्या उपक्रमातून मंडळासाठी जमा झालेला निधी चेक स्वरूपात अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून देण्यात आला.
सद्यस्थितीला (2017 साली) तीनशे खाटांच्या सुसज्ज रुग्णालयासोबत चाळीस शहरी उपेक्षित वस्त्या (झोपडवस्त्या) आणि चार जिल्हे यांतील 150 गावांमधून 42 प्रकल्प सुरू आहेत. ‘पाणी हा केंद्रबिंदू आहे. संस्थेचा प्रवास पाण्यासाठी सुरू राहणार आहे” असे प्रकल्प संचालक प्रसन्न पाटील विश्वासाने सांगतात.
– शैलेश पाटील
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ
डॉ.हेडगेवार रुग्णालय, गारखेडा परिसर,
औरंगाबाद – 431001
0240-2245015, www.hedgewar.org
शैलेश सर यांनी खूपच चांगल्या…
शैलेश सर यांनी खूपच चांगल्या प्रकारे लिखाण केले आहे.
त्यांचे आभार ,शुभेच्छा
ते सात मित्र एकत्र येऊन आज…
ते सात मित्र एकत्र येऊन आज संभाजी नगर मधील मोठे रुग्णालय चालू केले आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ चालू केले यातून समाजचि सेवा करायला एक पर्याय उपलब्ध झाला आहे. हे सात मित्र एक साथ आले यावरून एकत्र आल्याचे फळ
आपल्याला दिसून येते