आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणकरीता ‘सहयोग ट्रस्ट’ ही संस्था यवतमाळ जिल्ह्यात काम करते. त्याचप्रमाणे या संस्थेकडून शेतक-यांच्या स्त्रीयांना दर दिवाळीला कपडे वगैरे अशी भाऊबिजेची भेट दिली जाते.
आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणकरीता ‘सहयोग ट्रस्ट’ ही संस्था यवतमाळ जिल्ह्यात काम करते. त्याचप्रमाणे या संस्थेकडून शेतक-यांच्या स्त्रीयांना दर दिवाळीला कपडे वगैरे अशी भाऊबिजेची भेट दिली जाते. मुंबईच्या विलेपार्ले भागात रहाणा-या 88 वर्षीय श्री. दत्ताभाई गांधी आणि त्यांच्या 84 वर्षीय पत्नी सौ. आशाताई गांधी यांनी 24 लाखांचा निधी जमवून या संस्थेला दिला.
सेवादलाच्या मुशीत वाढलेल्या दत्ताभाई यांची शिक्षक म्हणून मोठी कारकिर्द आहे. आशाताईदेखील याच क्षेत्रातल्या. या दोघांनी गेल्या तीन-चार वर्षात आपल्या माजी विद्यार्थ्यांना पत्र लिहीण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत त्यांनी शेकडो पत्रे लिहीली आहेत. या प्रयत्नांतून ते विद्यार्थ्यांकडून निधी जमवतात. त्यांनी केवळ ‘सहयोग ट्रस्ट‘लाच नव्हे, तर ‘नर्मदा नवनिर्माण अभियानास’ही 12 लाखांचा निधी जमा करून दिला. दत्ताभाईंचा रविवारी 15 मे 2011 रोजी वाढदिवस झाला. यानिमित्ताने पनवेलजवळील तारा गावी जाऊन तेथील युसुफ मेहेरअली सेंटरमधील बापू कुटीत त्यांचा छोटेसे मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा सोहळा चित्तवृत्ती प्रफल्लीत करणारा ठरला.
– विजया चौहान शिक्षण हक्क समन्वय समिती आणि मराठी अभ्यास केंद्र.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.