मास्टर दीनानाथ यांच्या शिष्याला तो गात असलेल्या पूरिया धनाश्रीच्या ख्यालामध्ये होणारी चूक लहान वयाच्या लता मंगेशकर यांनी समजावून सांगितली. दीनानाथांनी ते पाहिले आणि दुसऱ्या दिवसापासून लता मंगेशकर यांची तालीम सुरू केली. तो राग होता पुरिया धनाश्री ! आणि ख्याल ‘सदारंग नित उठ’ हा तो ! स्वतः लता मंगेशकर यांनी अनेक मुलाखतींमध्ये तो गुणगुणून दाखवला आहे.
त्या किश्शामुळे मला पूरिया धनाश्रीबद्दल लहानपणी कुतूहल होते, पण मी तो कधी ऐकला मात्र नव्हता. मी त्या रागाचे सूर पहिल्यांदा जेव्हा शिकलो तेव्हा मात्र मोहित झालो. तोवर शुद्ध स्वरांचे बरेच राग परिचयाचे झाले होते. पण कोमल ऋषभ, कोमल धैवत आणि तीव्र मध्यम हे सूर पूरिया धनाश्रीच्या नुसत्या आरोह-अवरोह या स्वरूपातदेखील सतत म्हणण्यास आवडतात. तेथून माझे कोमल स्वरांच्या संध्याकालीन रागांशी नाते जुळले.
मी पूरिया धनाश्रीची प्रसिद्ध द्रुत चीज ‘पायलिया झनकार मोरी’ ही शिकलो. त्यानंतर भीमसेन जोशी व उस्ताद राशीद खान यांच्यासारख्यांनी गायलेली ती चीजपण ऐकली. परंतु पूरिया धनाश्रीच्या डोहात उतरू लागलो तो अश्विनी भिडे-देशपांडे यांचा पूरिया धनाश्री ऐकल्यावर ! त्यांनी गायलेला ‘कैसे दिन कठीन’ हा विलंबित त्रितालातला ख्याल म्हणजे पूरिया धनाश्री समजण्याचा जणू नकाशाच !
‘कैसे दिन कठीन से रंजन बिन
बिरहा लग्यो बिसंग को अरज सुनो
सखी मोहे पियाबिन
नैना प्राण ध्यान धरे चैन मोहे नाही पडे
रैन सुहावत नाही घरी पल छिन’
पूरिया धनाश्रीचा संपूर्ण भाव त्यात एकवटलेला आहे. त्याला जोडून गायलेली ‘मुश्किल करो आसान’ ही बंदिश त्याच भावाचे वेगळे रूप दाखवते. तशाच आशयाची सुलभा पिशवीकर यांनी बांधलेली चीज मी ऐकवतो.
पूरिया धनाश्री हा संधिप्रकाश वेळेचा राग आहे. दिवस मावळला आहे; पण अजून रात्र सुरू झालेली नाही त्या वेळेचा. त्याच वेळेला का? कारण त्या वेळेला जाणवणारे भाव हे त्या रागाच्या भावना लहरींशी जुळतात. त्या वेळेला कातरवेळ असेही म्हटले जाते. दिवसभर उमेद असलेले आश्वस्त मन संध्याकाळी जेव्हा हिंमत हरू लागते आणि सकाळी लवकर परत येतो असे सांगून गेलेला प्रियकर संध्याकाळ झाली तरी परत का आला नाही अशा हुरहुरीने जेव्हा नायिका त्याची वाट पाहते; या सगळ्याच्याही पुढे संपूर्णपणे हरलेली व केवळ ईश्वराच्या मदतीचा धावा एखादी व्यक्ती जेव्हा करते; त्या सर्व कातरवेळेच्या आणि पर्यायाने पूरिया धनाश्रीच्या भावाभिव्यक्तीने ! जेथे केवळ दैवी चमत्कार उद्धार करेल अशी परिस्थिती उद्भवते तेव्हाच पूरिया धनाश्रीचे सूर येतात. हे मनात ठेवून वर उल्लेखलेल्या ख्यालाचे शब्द वाचून बघावे; म्हणजे मी त्याला पूरिया धनाश्रीच्या अंतरंगात उतरण्याचा नकाशा का म्हणतो ते लक्षात येईल. कर्नाटकी संगीतातील पंतुवराळी राग हा पूरिया धनाश्रीसारखा आहे.
पूरिया धनाश्रीचे ख्याल बरेच आहेत. ‘अब तो ऋतु मान ले’, ‘बलबल जाऊॅं’, ‘चहिंदरा जगदाता’, कुमार गंधर्वानी बांधलेला ‘बल गई ज्योत सांज भई’, भीमसेनजी गात असत तो ‘पार करो अरज सुनो’ किंवा अश्विनी भिडे यांनी बांधलेला ‘आली मैं हारी’ हा ख्याल ही उदाहरणे. संध्याकाळच्या निसर्गाचे वर्णन करणाऱ्या बंदिशीही आहेत.
‘नीलिमा लालिमा कहु श्वेत कहु पीत’, ‘बहुरंग नभकी शोभा कछु न्यारी है’ हा झपताल किंवा कुमार गंधर्व यांची ‘आजरा दिन डूबा’ ही चीज, तसेच सावनी शेंडे-साठ्ये यांनी बांधलेला ‘केसर रंग’ हा संधिकालाचे वर्णन करणारा ख्याल पूरिया धनाश्रीच्या सुरांतून संध्याकाळचे वातावरण सुरेख उभे करतो.
किशोरी आमोणकर यांचादेखील तो आवडता राग असावा. त्यांनी अनेक मैफलींतून ‘कैसे दिन कठीन’ हा ख्याल गायला आहे. किशोरी आमोणकर सहसा ‘पायलिया झनकार मोरी’ हीच द्रुत बंदिश गात असत. पण मध्यंतरी, मला त्यांचे 1970च्या आसपासचे एक रेकॉर्डिंग मिळाले. त्यात त्यांनी एकतालातील ‘रंगीले आज भाग जागे’ ही तालाला काहीशी अवघड अशी चीज म्हटली आहे. बहुधा ती त्यांचीच रचना असावी; पण पुढे त्यांनी ती कधी गायली नाही. त्याचे कारण काय असावे? जसा त्यांचा रागभावाचा विचार समृद्ध होत गेला, त्यांची रससिद्धांताची संकल्पना विकसित झाली तसे त्यांना जाणवले असावे की ही चीज रागभावाला अनुसरून नाही. बंदिशीचे शब्द आहेत,
‘रंगीले आज भाग जागे
आये हो मंदिरवा
दीप जलाऊॅं फूल चढाऊॅं चरनन तुमरे
करूंगी सोलह सिंगरवा’
हे शब्द वाचून त्यांची पूरिया धनाश्रीच्या भावाशी असलेली विसंगती लक्षात येते. किशोरी आमोणकर यांचे मोठेपण लक्षात घ्यावे, की अत्यंत तयारीची झटकन आकर्षित करू शकणारी ही रचना, त्यांनी भावाशी विसंगत म्हणून; परत कधी गायली नाही; भावाशी प्रतारणा केली नाही.
पूरिया धनाश्रीच्या विस्तृत भावपटलामुळे त्यात गाणी खूप आहेत. ‘बैजू बावरा’ सिनेमातील ‘तोरी जय जय करतार’ किंवा ‘वंश’ या सिनेमातील ‘आके तेरी बाहोंमें’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गीत. हरिहरन यांचे प्रसिद्ध गाणे ‘हाय रामा…’ ही पूरिया धनाश्रीची रूपे ! अलिकडच्या ‘मॉर्निंग वॉक’ सिनेमात श्रेया घोषाल व उस्ताद राशिद खान यांच्या स्वरातील ‘भोर भये’ हे गाणे पूरिया धनाश्रीचे सूर व पश्चिमी वाद्यमेळ यांनी वेगळीच रंगत आणते. त्या व्यतिरिक्त वसंत देसाई यांनी संगीत दिलेले ‘रुक जाओ बनवासी राम’ किंवा आशा भोसले यांनी गायलेले ‘प्रेम लगन’ हे ‘सूरत और सीरत’ सिनेमामधील गाणे पूरिया धनाश्रीशी भेट करून देतात. एम एस सुब्बुलक्ष्मी यांनी गायलेले ‘दशावतार स्तोत्र’देखील पूरिया धनाश्री दाखवेल.
पूरिया धनाश्रीचे सूर; पण वेगळे चलन आणि वेगळा स्वरलगाव यामुळे गौरी राग प्रकट होतो ! त्यामुळे त्याला लक्षपूर्वक पूरिया धनाश्रीपासून वेगळे ठेवावे लागते. तो रागही संधिप्रकाश वेळेचा; पण त्याचा भाव पूरिया धनाश्रीपेक्षा वेगळा.
गौरी रागाचा परिचय अलिकडे झाला ! जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध आणि अतिशय क्लिष्ट अशा ‘ललितागौरी’ ह्या रागाने मला झपाटले होते. तो समजून घ्यायचा असेल, तर आधी गौरी शिकावा लागेल असे कळले. परंतु गौरी मैफलीत फारसा गायला जात नाही ! त्यामुळे त्याची रेकॉर्डिंग्ज उपलब्ध नाहीत. मग बरेच वाचून वगैरे समाधान करून घेतले; जेव्हा तालीम सुरू झाली; तेव्हा खरी मजा आली. वारंवार येणारा ‘नि सा रे नि सा नि ध नि’ हा स्वरसमूह, खटक्याने लागणारे खडे सूर ही त्याची ढोबळ वैशिष्ट्ये ! ‘आए राजन आईया म्हारे डेरे’ हा त्यातील पारंपारिक त्रिताल जयपुर घराण्याचे बहुतेक कलाकार गातात. केसरबाई केरकर यांची त्यात रेकॉर्ड आहे; त्या जोडीला मोगुबाई कुर्डीकर यांनी बांधलेली ‘आओजी नंदलाल’ ही द्रुत चीज, गजाननबुवा जोशी यांची ‘बॉट चलत छेडत है बिहारी’, सी.आर. व्यास यांची ‘खबरिया ले हो मोरी’ ते अगदी अश्विनी भिडे देशपांडे यांची ‘देवी दुर्गे’ ही चीज ! अशा अनेक चिजा गौरीत आहेत. वानगीदाखल मी ‘डार दिलौंदा ठगवे’ ही एक पारंपरिक चीज ऐकवतो.
कुमार गंधर्व यांनी गौरी रागाची तुलना पदर ओढून बसलेल्या नवविवाहितेशी केली आहे. गौरीला बोलते करण्यासाठी, तिच्या अंतरंगात उतरण्यासाठी तिचा ‘घुंघट’ दूर करावा लागतो असे ते म्हणत. मलासुद्धा हे पटते. पूरिया धनाश्रीपेक्षा गौरी काहीसा ‘रिझर्व्हड’ वाटतो -मनातील पटकन समजू न देणारा असा काहीसा ! कुमार यांनी ‘चित चंचल मोरा’ आणि ‘घुंघटा खोलो जी’ अशा चिजा गौरीत रचल्या आहेत. भातखंडेबुवांच्या पुस्तकात ‘भटकत काहे फिरे बावरे’ अशी श्री अंगाच्या गौरीची एक चीज आहे. अश्विनी भिडे-देशपांडे, केदार बोडस, तसेच मल्लिकार्जुन मन्सूर यांनी विस्तृतपणे गायलेले गौरीही जरूर ऐकावेत.
भैरव थाटाची गौरी हा गौरीचा सकाळी गायला जाणारा प्रकार ! तर श्रीगौरी, रामगौरी, मालीगौरा, चैतागौरी, कापारगौरी, साजगिरी असे अनेक अप्रचलित गौरी प्रकारही आहेत.
– सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com