शशिकांत पानट यांच्या ‘गीत महाभारत’ या पुस्तकाच्या दोन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. त्याचे गौरीश तळवलकर या गोव्याच्या गायकाने अकरा कार्यक्रम सादर केले. पानट यांना ‘गीत महाभारत’ सुचले तो क्षण उत्कट आहे. पानट अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे गेली त्रेचाळीस वर्षें स्थायिक आहेत. त्यांना कामानिमित्ताने रोज दोन-अडीच तास ड्राइव्ह करावे लागते. तो वेळ मुख्यत: श्रवण व चिंतन यांमध्ये जातो. परंतु एके दिवशी, अचानक, त्यांना कुरुक्षेत्रावरील एका प्रसंगासंबंधातील कवितेच्या दोन ओळी प्रसवल्या. त्या ओळी अशा – कुरुक्षेत्राचे युद्ध संपले | संपली अर्जुन-कृष्ण कथा | इथे गीतेचा जन्म जाहला | श्रीमद् भागवत गीता || त्यांच्या ध्यानात आले, की ही तर भैरवी आहे! त्यांनी ते गीत पूर्ण केले. ते सहा-सात महिने तसेच पडून होते. त्यांच्या मनात आले, की ज्याअर्थी ही भैरवी आहे! म्हणजे तो अंत आहे, त्याअर्थी त्याला उदय असणार. मग त्यांना एकाएकी स्फुरले, की ‘गीत रामायणा’प्रमाणे ‘गीत महाभारत’ लिहिले तर … त्यांना गदिमांचे ‘गीत गोविंद’ माहीत होते. तरीसुद्धा त्यांनी महाभारत गाण्याच्या रूपात सांगण्याचा चंग बांधला. त्यांनी जवळ जवळ पासष्ट-सत्तर गाणी रचली. त्यांतील आरंभीची काही गाणी ‘काळ कथा सांगतो’ अशा स्वरूपाची आहेत. पुढील गीते मात्र वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून केलेले प्रसंगवर्णन आहे. त्यांना महाभारतातील कथानकाचा अभ्यास करुन गीते लिहिण्यासाठी साडेपाच ते सहा वर्षांचा अवधी लागला. पानट म्हणाले, की “‘गीत रामायणा’त छपन्न गीते आहेत. ती श्रीरामाच्या दीड पिढ्यांची सरळसोट कथा आहे. महाभारत फार क्लिष्ट व गुंतागुंतीचे आहे. गीतांमधील निवेदनाने ते कसे जोडता येईल हा प्रश्न मजपुढे होता. तो तडीस लावताना फार दमछाक झाली.”
पानट व्यवसायाने मेकॅनिकल व इंडस्ट्रियल इंजिनीयर. ते आठ वर्षांपूर्वी निवृत्त झाले तेव्हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टुडिओंमध्ये संपुर्ण फॅसीलीटीज डीपार्टमेंटचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी स्वाती या निवृत्त परिचारिका आहेत. त्या प्रथम 1973 साली अमेरिकेत गेल्या. त्यांच्या पाठोपाठ एक वर्षाने शशिकांत तिकडे गेले. त्यांना दोन मुली आणि तीन नातवंडे असा त्यांचा संसार आहे. अमेरिकेत इंजिनीयरिंग व्यवसाय करत असतानाच त्यांना कविता रचण्याचा छंद लागला. त्यांच्या कवितांचा संग्रह – ‘अमेरिका तरंग’ ‘विदर्भ लेखक संघा’तर्फे प्रसिद्ध झाला आहे. त्यांची वीस-पंचवीस गाणी रेकॉर्डदेखील झाली आहेत. पानट मूळ पाचोरा (जळगाव) भागातील. “त्यामुळे ‘बहिणाई’ची अहिराणी मला झकास येते आणि कवितेचा धागाही मी तिच्याकडूनच उचलला असावा!” असे ते म्हणतात. पानट सांगतात, की “मला महाभारताची ओढ लहानपणापासून होती. शं.के. पेंडसे यांचे ‘महाभारतातील व्यक्तिदर्शन’ हे पुस्तक मला प्रेरक वाटले. गीतांना जोडणारे निवेदन लिहिताना शास्त्रशुद्ध इतिहासाची गरज होती. तो मला महाभारताच्या वेगवेगळ्या पुस्तकांतून मिळाला. मी भारतात गेलो, की ती पुस्तके घेऊन येत असे.” त्यांच्या मनात आई-वडिलांनी लहानपणी सांगितलेल्या महाभारताच्या गोष्टींचा खजिना होताच!
पानट अमेरिकेसारख्या अ-मराठी देशात गेली साडेतीन तपे राहिल्यामुळे आणि रोजच्या व्यवहारात मराठी बोलले-ऐकले जात नसल्याने कवितेमधील काही मराठी शब्द लिहिण्यास अडचणी तयार होत. बर्याेच वेळा कवितेमधील विशिष्ट भावना वर्णन करण्यासाठी योग्य वा पर्यायी मराठी शब्दांची उणीव भासे. त्यामुळे गीते लिहिताना मनावर दडपण येई. पण त्यांनी तशा मर्यादांवर मात केली असे ते नमूद करतात. ‘गीत महाभारत’ पुस्तकाची पहिली आवृत्ती विकली गेली. दुसरी आवृत्ती जून 2017 मध्ये प्रसिद्ध झाली.
पानट यांना या छंदोद्योगात जे गौरीश तळवलकर भेटले ते संगीताने झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्यामध्ये फोंड्याला राहतात. त्यांच्या घराण्यात संगीत पूर्वापार नाही. किंबहुना त्यांचे वडील नोकरीनिमित्ताने रत्नागिरी-लांज्याहून गोव्यात आले व तेथेच स्थिरावले. पण गौरीश यांना बालक असल्यापासून गाण्यांचे वेड होते. गौरीश संगीतालंकार झाले आहेत. त्यांनी संगीत शिक्षकाची सरकारी नोकरी दोन वर्षांपूर्वी सोडली आणि संगीतक्षेत्रात पूर्ण वेळ ‘करिअर’ करण्याचे ठरवले. ते बेचाळीस वर्षांचे आहेत. ते संगीत शिक्षण जितेंद्र अभिषेकी यांच्या ‘गुरुकूल’मधून तयार झालेले लक्ष्मीकांत सहकारी यांच्याकडे घेतात. त्यांचे त्या आधीचे गुरू म्हणजे कै. कमलाकांत वळवईकर व बाळकृष्ण केळकर.
शशिकांत पानट यांचे एक वेगळेच रूप गेल्या दोन-चार वर्षांत प्रकट झाले आहे. त्यांना वॉशिंग्टन डीसीच्या प्रदीप साठे यांनी विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्यावर नाटक लिहा असे तेव्हा सुचवले. पानट यांनी विष्णू दिगंबर यांच्या चरित्राचा व त्या काळाचा अभ्यास करून संगीत नाटक लिहिलेदेखील. त्याचा प्रयोग अमेरिकेतील कलावंत अमेरिकेतच करत आहेत. परंतु त्यातून निर्माण झाले ते पानट यांचे पटकथा लेखनाचे वेड! ते नाटक मालिकारूपात टेलिव्हिजनवर सादर करावे अशी टूम निघाली. तेव्हा पानट यांनी पटकथा लेखनाचा अभ्यासक्रम हॉलिवूडमध्ये केला व पदवी मिळवली. त्यांनी दोन-तीन पटकथा लिहिल्या. त्यातील एक दोन तासांचा ‘फीचर मुव्ही’ हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होत आहे. तर त्यांचा, ते सहपटकथा लेखक असलेला ‘स्वच्छ भारत अभियान’ या संकल्पनेवरील कथा-चित्रपट मराठीत तयार होत आहे. त्याचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, पुढील प्रक्रिया चालू आहेत. अमेरिकेतील एका भारतीयाने ‘स्वच्छता अभियाना’च्या कल्पनेवर खूष होऊन त्या चित्रपटासाठी पैसे गुंतवले आहेत. चित्रपटातील गाणी पानट यांनीच लिहिली आहेत. त्यांच्या प्रतिभेला हे नवे क्षेत्र लाभणार का?
– प्रतिनिधी
गीत महाभारत वरील लेख उत्तम…
गीत महाभारत वरील लेख उत्तम झाला आहे, आशा आहे अधिक वाचकांपर्यंत या माध्यमातून ही कलाकृती पोहोचेल.
थिंकमहाराष्ट्र परिवार , श्री. शशिकांत पानट, श्री. गौरीश तळवलकर या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मंगल शुभेच्छा
Comments are closed.