Home लक्षणीय रवळनाथ दैवताच्या निमित्ताने

रवळनाथ दैवताच्या निमित्ताने

0
_Ravalnath_2_0.jpg

प्रकाश नारकर यांनी ‘थिंक महाराष्ट्र’वर सादर केलेला कोकणातील दैवतांचा अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी सूर्यविषयक माहिती गोळा करत असताना अमेरिकास्थित जय दीक्षित यांचे ‘ए ट्रिब्युट टू कोकणस्थ’ हे पुस्तक वाचले होते. त्यांनी कोकणस्थ ब्राह्मणांच्या दैवतांबद्दल माहिती देताना कोकणातील ह्या जातीच्या मुळांचा शोध घेतला आहे. त्यांनी नमूद केले आहे, की कोकणातील कोकणस्थ हे सूर्यपूजक होते. तेथील देवळांच्या नावातही सूर्यनामांचा वापर आहे. आदिनाथ, आदिनारायण, रवळनाथ इत्यादी. रवळनाथाची पूजा ही रविवारी होते. सिंधुदुर्गात रवळनाथ लोकप्रिय-भक्तप्रिय आहे. रवळनाथ हा शब्द राहुलभद्र ह्या महायान बौद्ध पंथाच्या संस्थापकावरून आल्याचा संदर्भ दीक्षित यांनी दिला आहे. कोकणस्थ हे खास करून परशुराम व सूर्याची पूजा करतात. त्यांची चौदा गोत्रे कर अक्षरांनी जाणली जातात. पूर्वाश्रमीच्या रशियातील जसे किलिनिगार्ड येथील खेड्यातील नावे संस्कृत शब्दांशी नाते सांगतात. रोमुवा (रामास) डेइव्हिटुरिता हिंदू देवतांचा अनुयायी, त्यांच्यात काही वैदिक चालीरीती आढळतात. त्यांचा दारमा (धर्म) वर विश्वास असतो, अभ्यासाने माणूस व्युदुनास (विद्वान) होतो, घरात ऊग्नीस (अग्नी) तेवत ठेवतात. त्याला प्रदक्षिणा घालतात. त्यात धान्य, समिधा आणि मीठही टाकतात; भारतात दृष्ट काढताना टाकतात तसे; नि ते तडतडले की वाईट शक्ती निघून जातात असा समज आहे. अग्नी (हा पृथ्वीवरील सूर्याचा प्रतिनिधी) माणासांचा त्यांच्या पूर्वजांशी संपर्क ठेवतो असा समज आहे.

रोमुवस मिथकात साऊल म्हणजे सूर्य ही स्त्री देवता (सृजनाशी संबंध म्हणून असेल) अग्नी कुंड हे घरातील शुभकार्यात महत्त्वाचे मानतात. रवळनाथ हा पुरुष देव तर रवलाई ही स्त्रीदेवता मानतात. भग म्हणजे सूर्य तर भगवती म्हणजे स्त्री सूर्य मानतात. त्यांचा प्रमुख देव परकुनास (पर्जन्य देव- इंद्र) आहे. त्याच्या हातात धनुष्यबाण नि कुऱ्हाड असून तो परशुरामागत वयस्क दाखवतात. इसवी सन शंभर ते इसवी सन चौदा या काळात कोकण, इजिप्त, रोम, ग्रीस असा व्यापार, येणेजाणे होते. स्ट्राबो (इतिहासकार) ह्याने कोकणाचे उल्लेख कोमकवी असा केला आहे.

रोह्याला सहा फूट उंचीची उदिच्च्य ( बूट, तुमान, शिरस्त्राण, चिलखत-एखाद्या योध्यागत) वेषधारी सूर्याची मूर्ती सापडली होती. ती आता रत्नागिरी म्युझियममध्ये आहे. परंतु देऊळ व इतर काही अवशेष काळाच्या उदरात गेले. तीच कथा नालासोपाऱ्यातील मूर्तीची आहे. खारेपाटण येथील कपिलेश्वर देवळात तीन फूट उंचीची सूर्यमूर्ती आहे. सूर्याचे अनेक ठिकाणी शिवाशी साधर्म्य साधलेले आहे. अनेक ठिकाणी मूळ मूर्ती बाजूला ठेवून शिवलिंग, देवी यांचे पूजन होताना दिसते. कशेळी, कसबा संगमेश्वर, परुळे, पोंक्षे-अंबव अशा काही ठिकाणी सूर्याची मंदिरे आहेत. ती शिवाच्या नावाशी संलग्न आहेत.

ज्योतिबा हे नावही प्रकाशाशी संबंधित आहे, चांगभलं हा शब्द सिंधीतील चंगाभला ह्यावरून आला आहे (त्यांनी ज्योत महाराष्ट्रात आणली). पूजा, रविवारचे महत्त्व, चैत्री रथयात्रा (सूर्याशी संबंधित) ह्या साऱ्या गोष्टी काही वेगळे सुचवत असतात. देवतांची अदलाबदल ही कालानुरूप पूजेचे, श्रद्धेतील देव बदलले, की भक्त मंदिरातील मूळ मूर्ती बदलून त्यांचे उपास्य देव तेथे स्थापित करतात. पण ललाटबिंब बदलणे (प्रवेशद्वाराच्या दगडी चौकटीच्या मधोमध मूळ देवतेची मूर्ती असते) अवघड असते. त्यावरून देवता कळू शकते. अनेक देवतांचे संमीलन करून त्यांचा देव हा सर्वांचे प्रतिनिधीत्व करतो अशी भक्तांची श्रद्धा असते. ज्योतिबा, खंडोबा, त्यांच्या पत्नी राज्ञी आणि छाया (रवळाई, यमी) अश्वमुखी अश्विनीकुमार वा अश्वारूढ रेवंत (सूर्यपुत्र ज्याच्या हाती वारुणीचा चषक असतो) यांची विविध रूपे पूजनात येतात. दैवत भक्तांसाठी विविध नाम, रूप, लांच्छन (हातातील शस्त्रादी वस्तू) धारण करतात. जसा चाफळचा राम म्हणून पूजली जाणारी मूर्ती वास्तविक सूर्याची आहे. तशी लांच्छने त्याच्या अंगावर आहेत. कमळ, मुकुट इत्यादी दैवतांचा इतिहास रंजक असतोच, तो स्थानिक भक्तांच्या भावनांशी संबंधित असतो.

– संजीवनी खेर

About Post Author

Exit mobile version