Home कला मी शैलेशसर

मी शैलेशसर

14
_Mi_ShaileshSir_3.jpg

मला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे स्वप्न नव्हते, पण घडले असे, की वडिलांच्या ओळखीचे व घरोब्याचे संबंध असणारे डॉ. विद्याधर कामत यांनी मला, त्यांची मुलगी स्वाती आणि तिच्या सोबत असणारे काही विद्यार्थी यांना ‘तू चित्रकला शिकवणार का?’ असे विचारले. त्यामुळे माझा पहिला वर्ग त्यांच्याच घरात सुरू झाला. कॉलेज सुटले, की मी त्यांच्याकडे जात असे. माझ्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांत वयाच्या दृष्टीने सात वर्षांचे अंतर होते. विद्यार्थी मला शैलेशदादा म्हणत. मला त्या वर्गात चित्रकला शिकवण्यातील गंमत कळली तसेच आनंदही मिळाला आणि हो फी देखील!

मला माझ्या शिक्षकांनी जे.जे. स्कूलला अॅडमिशन घेतानाच, चित्रकलेच्या शिक्षणाचा खर्च फार असतो याची जाणीव करून दिली होती. मी त्या कारणाने कॉलेजमध्ये फाजील खर्च होणार नाही याची नेहमीच काळजी घेत असे. मी मला मिळणारी फी स्वखर्चासाठीच वापरावी असे घरातून सांगितले गेले. मला त्याचा सुप्त आनंद मिळू लागला. स्वत:च्या कष्टाच्या कमाईतून कागद, रंग, ब्रश आणि इतर साहित्य खरेदी करताना असे वाटू लागले, की मी माझ्या आई-वडिलांच्या माझ्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चात थोडा हातभार लावू शकत आहे! मी शिकवणे त्या भावनेतून कायम ठेवले. मी पुढे पार्ट-टाईम नोकरी करत असतानादेखील शनिवार-रविवारच्या सुट्टीत जाऊन वर्ग घेत असे. मी माझे कलाशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय सुरू केला; पण तो करत असतानाही माझे वर्ग सुरूच होते. मी निष्ठेने वर्ग घेत राहिलो – शनिवार-रविवार! काळाच्या ओघात किती वर्षें निघून गेली तेही समजले नाही!

एक दिवस फोन आला. ‘मी डॉ. कामतांची स्वाती बोलतेय, दादा! दादा, तू अजून क्लास घेतोस का रे?’ तिने विचारले. मी हसलो आणि ‘हो’ म्हणालो. ‘माझ्या मुलीला ड्रॉइंग शिकवशील? मी कधी येऊ? कोठे घेतोस तू क्लास? घरातच घेतोस का?’ ती एकामागून एक प्रश्न विचारत होती.

‘तू मला जसे शिकवलेस ना, तसे चित्रकला शिकवणारे शिक्षक मी तिच्यासाठी शोधत होते. मिस्टर म्हणाले, आपल्याला शिकवण्यास येणाऱ्या दादाला विचार, तो योग्य शिक्षक सुचवेल.’

मी मध्येच अडवून तिला विचारले, ‘आपल्याला? म्हणजे तो पण माझाच विद्यार्थी आहे?’ मला खूपच आनंद झाला होता!

‘अरे!! हो, माझ्या सोबत नववीतला एक मुलगा यायचा बघ. शेजारच्या द्रवीडकाकूंचा. तोच माझा नवरा आहे.’

वा! मस्तच. आता माझ्या क्लासला नेक्स्ट जनरेशन येणार होती. मी शैलेशदादाचा, शैलेश मामा झालो होतो!

पालकांचे म्हणणे असे, की माझ्या शिकवण्यात काहीतरी निराळेपण आहे. ते म्हणतात, ‘तू चित्रकला विषय हसतखेळत शिकवतोस. मुलांवर अभ्यास म्हणून त्याचे दडपण येऊ देत नाहीस.’ खरे आहे ते. मुळात चित्रकला हा विषय स्वानुभवाची व निरीक्षणाची मांडणी आहे.

बाजारात मिळणारी पुस्तके ‘पहा आणि चित्रे काढा’ किंवा ‘काढून दिलेली चित्रे रंगवा’ या चुकीच्या मार्गाने बालपणापासून विचारशक्ती खुंटवणारे व परावलंबी बनवणारे संस्कार मुलांवर होतात. त्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती स्वाभाविक विस्तारू शकत नाही. पालकदेखील रेषेबाहेर रंग जाऊ न देता चित्र रंगवता येणे यालाच चांगली चित्रकला म्हणून ओळखतात. पालकांना त्या गैरसमजातून प्रथम बाहेर काढणे व चित्रकला शिकवताना विद्यार्थ्यांना स्वानुभवातून तयार होणारे विषय चितारण्यास देणे आणि त्यांनी मोकळेपणाने (कोणतीही कृत्रिमता येऊ न देता) चित्र रंगवणे याकडे माझा कल आहे. ते सर्व करताना लहानांमध्ये लहान होऊन राहिले, तर शिकवण्यात सहजता येते. तसेच, शिकणाऱ्यास विषयाचे दडपण येत नाही.

मी प्रकर्षाने एवढेच करत आलो आहे. मला माझ्या वर्गात नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. मी त्या मिळणाऱ्या ऊर्जेमुळेच तितक्याच श्रद्धेने शिकवत आहे. मला माझे चित्रकला हा विषय शिकवण्यातील वेगळेपण जाणणा-या पालकांनीच ठाण्यात ‘शैलेश सर’ ही ओळख निर्माण करून दिली आहे.

– शैलेश अनंत साळवी

About Post Author

14 COMMENTS

  1. आणि मी शैलेश सरांची…
    आणि मी शैलेश सरांची विद्यार्थीनी असल्याचा मला अभिमान आहे

  2. सर खरचं तुमची शिकवण्याची…
    सर खरचं तुमची शिकवण्याची पध्दत वेगळीच आहे. तुमच्याकडून शिकण्यासारखे बरचं काही आहे. मी सुद्धा ते कलेचे मोती वेचण्यासाठी तुमच्याकडे येते.

  3. This is just beautiful..and…
    This is just beautiful..and I am lucky to have you as my sir in life

  4. वा शैलेश सर…..मनापासून…
    वा शैलेश सर…..मनापासून अभिनंदन
    तुमच्यासारखाच तुमचा लेखही प्रांजळ आणि खराखुरा

  5. कलेच्या माध्यमातून सामाजिक…
    कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या , दुनियेसाठी ‘सर ‘ अशी ओळख असलेल्या माझ्या दादा चा मला अभिमान आहे.

  6. मला जाणवलेला सरांचा वेगळेपणा…
    मला जाणवलेला सरांचा वेगळेपणा म्हणजे सरांनी त्यांच्या व्यस्त धावपळीमुळे त्यांना चार पाच वेळा क्लास घेण्यास न जमल्यामुळे स्वःताहून माझ्या मुलीकडे अर्ध्या महिन्याची फी परत पाठविली. हल्लीच्या जीवनात असा सच्चेपणा आणि पैशाची हाव नसलेली माणसे क्वचितच सापडतील. …. अनन्याची आई.

  7. विद्यार्थी प्रिय कलाशिक्षक…
    विद्यार्थी प्रिय कलाशिक्षक शैलेश सर… अनेक शुभकामना, सध्या चित्रकला विषय… छापील चित्रे रंगवा किंवा नकलून चित्रे काढा या पद्धतीने शिकविण्याचे तंत्र बोकाळले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा.. मुक्तपणे प्रकट होण्याचा आनंदाचा… बळी जात आहे. त्यामुळे भावनाहीन हुशार विद्यार्थी तयार होतात. तुम्ही हे सर्व टाळून मुलांच्या वयानुसार त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांना मुक्तपणे… मोकळेपणाने प्रकटीकरण करण्यास प्रोत्साहन देता, त्यांच्याच वयाचे होऊन डोळसपणे चित्रकला विषय शिकविता. हाच तुमचा… निराळेपणा…. आहे. आजच्या उंदीर शर्यतीत मुलांना सप्तरंगी आनंद मिळण्यासाठी तुमच्यासारख्या कलाशिक्षकांची नितांत गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो ते विद्यार्थी स्वतः आनंदी राहतील व इतरांनाही आनंद देतील. तुमची ही कलेची आनंद यात्रा सातत्याने चालत राहो हीच शुभकामना…… पितळे सर

  8. शैलेश शाब्बास. शुभांगी…
    शैलेश शाब्बास. शुभांगी दातारचा अभिप्राय मला अगदी पटलाय

Comments are closed.

Exit mobile version