मिहोकोने हे सारे पाहिले. मिहोको अगदी भारावून गेली होती. ती म्हणाली, ‘‘खरंच, मी बुध्द-शाक्यमुनीच्या भिक्षापात्राच्या अवशेषाला पाहात आहे. धन्य आहे ही वास्तू! भाग्यवान आहे मी. आजचा दिवस माझ्या आयुष्यात तुमच्यामुळे आला. मी हा क्षण कधीही विसरणार नाही. हे विविध देखणे कलश, सोन्याच्या छोट्याशा कलशातील तुकडे, त्यावर पसरलेली सोन्याची फुले. ह्या सात बुध्दांच्या धातूच्या अप्रतिम मूर्ती! सारेच भारावून टाकणारे आहे. मला नेपाळमधील ‘प्रज्ञा पारमिता’ हे दुर्मीळ देखणे हस्तलिखित पाहायला मिळाले. माझे येथे येणे सार्थक झाले!’’
तिने एशियाटिकच्या दरबार हॉलमध्ये जपानच्या नारा येथील ‘तोडाइजी’ या जगप्रसिध्द मठाबद्दल, तेथील कलेबद्दल सचित्र माहिती दिली. त्या मठाच्या परिसराच्या स्लाइड्स पाहून स्वर्गीय वातावरणात तो मठ उभारला गेला असावा असे वाटले. हिरव्या वनराईतील ती भव्य वास्तू, म्हणजे इसवी सन ७५० मधील बुद्धमंदिर आहे. जपानलाही पुरातन इतिहास नि परंपरा आहे आणि त्या गोष्टी जतन करायची वृत्ती त्यांनी जपली आहे. त्यामुळेच इतकी प्राचीन वास्तू अग्नीच्या भक्ष्यस्थानी अनेकदा पडूनही नव्यासारखी दिसते. ती जगातील सर्वात मोठी लाकडाची वास्तू आहे. नारा येथील बुद्धहॉल आणि वैरोचन बुद्धमंदिरातील सतरा मीटर उंचीच्या धातूच्या भव्य मूर्तीच्या नेत्र उघडण्याच्या समारंभाच्या वेळी बुधसेन हा मूळचा भारतीय भिक्खू तेथे हजर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील पूजाविधी झाले. ते आजतागायत त्याच रीतीने केले जातात. जपानमध्ये सरस्वती आणि लक्ष्मी यांची मंदिरे आहेत. वरुण आणि कुबेर हे तेथील महत्त्वाचे देव आहेत. तेथील्या सरस्वतीच्या देवळांची शान, निर्मळता फोटोत पाहिली तरी आपले देव परदेशांतच वैभवात आहेत असे म्हणावेसे वाटले. मंदिराचे प्रमुख आहेत मिहोकोचे पती. मंदिराचे पौरोहित्य गेल्या अनेक पिढ्या परंपरेने हिरोओका कुटुंबाकडे आहे. हिराओका यांच्यानंतर त्यांचा मुलगा तेथील प्रमुखपदी येईल. श्री. हिराओका स्वतः भारतात येऊन संस्कृत शिकले आहेत. जपानमध्ये ९० टक्के बौद्धधर्मीय लोक आहेत.
डॉ. मिहोको हिराओका ही विद्वान स्त्री भारतीय विचारांनी भारलेली आहे. ती भारतातल्या वाचनालयांना, लेण्यांना, विद्वानांना भेटायला, बुद्धाचा वारसा समजून घ्यायला येथे येते. तिने सारा महाराष्ट्र पालथा घातला आहे. कुठल्या लेण्यांचा काळ कोणता, ती केव्हा आणि कुणी खोदली, ती आज कोणत्या अवस्थेत आहेत याची बिनचूक माहिती तिच्याकडे आहे. अजिंठा, नाशिक, जुन्नर ही ठिकाणे तिच्या खास अभ्यासाची आहेत.
येथील्या अनुभवाबद्दल विचारले असता ती म्हणाली, की येथील खाणे-पिणे तिला आवडते. लोक माहिती देतात. पण तिच्या एका अनुभवाने तिलाच काय पण मलाही बेचैन केले. ती एका लेण्यात सप्तमातृकांच्या मूर्ती पाहायला गेली होती. पाहते तर काय? त्या मूर्तींच्या अंगावर मुले चढत होती, नाचत होती. तीही चक्क बूट-चपला घालून. तिने त्यांच्या आयांना चिडून म्हटले, “मुलांना उतरायला सांगा! काय हो? ह्या मूर्ती पवित्र मानता नां? मग त्यांच्यावर मुलांना बुटांसकट कसे चढू देता?”
त्यावर त्या आया म्हणाल्या, “अहो ती छोटी मुलं आहेत.’’
विदेशी संशोधक येऊन आपल्याला आपल्या वारशाची आठवण करून देते आणि आपल्या तथाकथित शिकलेल्या आईबापांना त्या अमूल्य वारशाच्या जतनाची जाणीवही असू नये?
डॉ. मिहोको हिराओका
masala@dream.com
संजीवनी खेर,
वैशाली अपार्टमेंटस, १७६ अ,
भालचंद्ररोड, हिंदु कॉलनी,
दादर, मुंबई – १४
मोबाईल – ९८२१४११४७२
sanjeevanikher@gmail.com
Very interesting article.
Very interesting article. It gives me lots of information.
Comments are closed.