Home अवांतर टिपण मराठी माणसाच्या कुटुंबाचे पांग

मराठी माणसाच्या कुटुंबाचे पांग

यादवोत्तर काळापासून मराठी समाजाचा विचार करता, हा समाज शतकानुशतके अभावग्रस्त आहे, हे दारुण सत्य आपण नाकारू शकत नाही. अर्ध्या अधिक भारतावर राज्य करूनही मराठी समाज दरिद्रीच राहिला. जी काही थोडीफार (थोडीच! फार नाही, कारण मध्ययुगीन महाराष्ट्र जेव्हा वैभवाच्या शिखरावर होता, तेव्हाही तो इतर प्रांतांच्या आणि समाजाच्या मानाने गरीबच होता.) महाराष्ट्रीय लोकांनी श्रीमंती मिळवली ती एक-दोन टक्के लोकांपुरती मर्यादित राहिली. त्या उलट इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊन प्रचंड संपत्ती मिळवल्याचे असंख्य दाखले देता येतील. जैन, मारवाडी, गुजराती समाजांतील तरुण त्या काळापासून महाराष्ट्रात येऊन स्थिरावले आहेत. महाराष्ट्राच्या लहानसहान खेड्यांमध्ये परप्रांतीय दुकानदार स्थानिकांच्या अरेरावी किंवा टवाळकीला तोंड देत सोशिकपणे, चिवटपणे व्यवसाय करताना दिसतात. तो तरुण दहा-पंधरा वर्षांनंतर तेथील ‘शेठ’ होतो, गावातील प्रतिष्ठितांत जमा होतो आणि कालांतराने, त्याची टवाळकी करणारेच स्थानिक कार्यक्रमासाठी, संस्थांसाठी त्याच्याकडे आर्थिक मदतीसाठी जाऊ लागतात!

समाजाचा सामान्य घटक जेव्हा ही चिकाटी आणि धैर्य (धैर्य हे ‘धीर’ या शब्दाचे समानार्थी भाववाचक आहे हे आपण सहसा विसरतो.) अंगीकारतो तेव्हाच एकूण समाजाची प्रगती होते. ती प्रगती त्यांच्या अटींवर, त्यांच्या सोयीने, ‘असेल माझा हरी…’ या न्यायाने होत नाही. चार भिंतींच्या सुरक्षिततेला चटावलेल्या मराठी माणसाला प्राप्त परिस्थितीने आणि आर्थिक रेट्याने त्याच्या घरातूनच हुसकावल्याची उदाहरणे गिरगाव, दादर, परळसारख्या उपनगरांबरोबर महाराष्ट्राच्या इतर मोठ्या शहरांतूनही हजारोंनी सापडतील! आपले घर राखायचे तर घर सोडावे लागते हा वदतोव्याघात समजून घ्यायला हवा! जुन्या कथा-कहाण्यांमध्ये ‘नशीब काढायला’ निघालेला तरुण त्याचा गाव/ देश सोडून निघायचा यामागे काही तथ्य असेलच!

असामान्य बुद्धीचे आणि कुवतीचे मराठी तरुण देशाबाहेर पडून त्यांची पात्रता नेहमीच सिद्ध करत आले. पण सर्वसामान्यांनी त्यांचा कित्ता गिरवून त्यांच्या कुवतीनुसार धाडस आणि आत्मविश्वासपूर्वक कष्ट केले, तर महाराष्ट्राबाहेर जाऊन आर्थिक सुबत्ता मिळवली तर मराठी समाजाला परप्रांतीयांविषयी तक्रारी करण्याचे कारणच राहणार नाही. पण त्याऐवजी गावातल्या गावात नोकरीवरून यायला उशीर होणाऱ्या बाबाच्या कैफियतीला तोंड, गळे आणि डोळे भरभरून दाद देणारा महाराष्ट्रीय समाज प्राप्त वास्तवाकडे डोळेझाक करू पाहतो. आधुनिक जगातील प्रत्येक प्रगतिशील व्यावसायिक ते सहन करत आहे, तेही आत्मकरुणेला बळी न पडता हे महाराष्ट्रीय माणूस भावनावशतेच्या अतिरेकात विसरतो आणि त्याच्या नव्या पिढीलाही त्याच्यासारखेच मानसिक दौर्बल्याचे बळी बनवतो.

कौटुंबिक नातेसंबंध आणि कुटुंबसंस्था ही मराठी माणसाला मोलाची वाटतात. ती तशी आहेही, पण ती त्याची बलस्थाने त्याची शक्ती व्हायला हवी. त्याऐवजी ती त्याच्या पायतील बेडी ठरत आहे.

कुटुंबाचे पांग फेडणे हे मराठी मुलांचे स्वप्न असते, पण ते फेडण्याचे मार्ग काळानुसार बदलायला हवेत. जगाच्या पाठीवर सर्वदूर नशीब काढण्यास निघालेल्या निधड्या मराठी तरुणांचा कित्ता इतरांनीही गिरवायला हवा, तेव्हाच एक समाज म्हणून मराठी माणूस ताठ मानेने उभा राहू शकेल. अन्यथा महाराष्ट्राच्या राजधानीतच फोफावलेल्या सिनेउद्योगात आणि दूरदर्शन जाहिरातीत मराठी पुरुष हा एक भ्रष्ट किंवा विदुषकी हवालदार आणि मराठी स्त्री एक मोलकरीण म्हणूनच चित्रित होत राहील!

दीपक हणमन्तराव कन्नल

‘हेमांगी दिवाळी अंक २०१३ च्या लेखावरून उद्धृत’

About Post Author

Exit mobile version