मतिमंदांचे घरकूल

3
56
carasole

मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या ‘खोणी’ या गावातील अमेय पालक संघटना. त्यांचे तेथे ‘घरकुल’ या नावाने वसतिगृह आहे. मतिमंदांसाठी आणखीदेखील वसतिगृहे चालवली जातात, परंतु ‘घरकुल’ एकमेव आहे याचा प्रत्यय तेथे गेल्यावर येतो. तेथील जिव्हाळा, स्नेहार्द्रता अन्यत्र, कोठे आढळणार नाही आणि त्यामागील प्रेरणास्रोत अविनाश बर्वे आहेत.
काही पालक मंडळी स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी एकत्र आली. त्या सर्वांनी अमुक एका रकमेचे बंधन न घालता, सुरुवातीस दर महिन्याला जितकी जमेल तितकी रक्कम शिल्लक टाकण्याचे सुरू केले आणि ‘अमेय पालक संघटना’ १९९१ मध्ये स्थापन झाली. ‘घरकुल’ची इमारत १९९५ मध्ये नांदती झाली. ‘घरकुल’च्या नवीन छान वास्तूचे उद्धाटन २०१० सालच्या आरंभी झाले.
‘घरकुल’चा पाया रचला गेला तो मूळ डोंबिवलीतील ‘अस्तित्व’ या संस्थेमधून आणि प्रामुख्याने सुधा काळे व त्यांचे पती कै. मेजर ग.कृ. काळे या सेवाभावी दांपत्याकडून. बापू शेणोलीकर आणि ‘घरकुला’त बारा वर्षे कार्यरत राहिलेल्या  कै. उषा जोशी यांचा सहभागदेखील महत्त्वाचा. त्यामुळे संस्थेचा पाया पक्का झाला, संस्कारांची, शिस्तीची दिशा ठरून गेली.
नंतर त्या कार्यात पुढाकार घेतला तो शिक्षक दांपत्य असलेल्या नंदिनी व अविनाश बर्वे यांनी. त्यांच्या कौस्तुभ या मतिमंद मुलामुळे त्यांचा कार्याशी परिचय झाला. कौस्तुभचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. बर्वे यांनी ‘घरकुल’ची जबाबदारी अनेक वर्षे निष्ठेने व सेवातत्परतेने पार पाडली व त्यांनी वर्षापूर्वी ती डोंबिवलीमधील डॉक्टर सुनील शहाणे यांच्या शिरावर २०१२ सालापासून सोपवली आहे.
हवेशीर व प्रशस्त विश्रामधाम, जेवणाची घरगुती चव, व्यायामाची शिस्त, बागकाम इत्यादी विरंगुळ्याची माध्यमे व ज्यांची इच्छा आहे अशा परिचितांपैकी विवाहाचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस, तसेच काही शाळा व इतर संस्थांमधील व्यक्तींनी-मुलांनी सामाजिक दृष्टिकोन जोपासावा म्हणून ‘घरकुल’ला दिलेल्या व देत असलेल्या प्रत्यक्ष भेटी, यांद्वारे ‘घरकुल’ चा  प्रेममय परिसर सतत विस्तारत असतो. दर आठादिवशी तेथे एकतरी नवी व्यक्ती व संस्था येऊन स्वत:ला जोडून घेते.  अशी महती ‘घरकुल’ला लाभली आहे.
बर्वे यांनी ‘घरकुल’च्या कामात काही संकेत निर्माण केले. “पावती पुस्तक घेऊन कोणाकडे मदतीची याचना करायची नाही आणि सरकारी मदत घ्यायची नाही” हा बर्वे यांचा तत्त्वाग्रह; तरी ‘घरकुल’साठी गेल्या आठ वर्षांत एक कोटी रुपये जमा झाले, संस्थेविषयीचा सद्-भाव एवढा वाढला आहे की फेब्रुवारी २०१० मध्ये साज-या झालेल्या ‘कृतज्ञता दिवसा’च्या वेळी काही तासांत येणा-या मंडळींकडून जी रक्कम जमा झाली, ती होती एक लाख रुपये! बर्वे यांची पद्धत अशी आहे, की ते कोणाही व्यक्तीला प्रथम संस्था पाहायला बोलावतात. ती व्यक्ती आली की त्या कामाच्या प्रेमात पडते, कारण त्या कामात करुणा आहे आणि कार्यकर्त्यांचा नेटकेपणा व शिस्त.
मदतीची याचना पावती पुस्तकांद्वारे करायची नाही हा बर्वे यांचा अभिमान जरी ताठपणाचा द्योतक असला, तरी त्यांनीच विद्यार्थिजीवनापासून सामाजिक कृतज्ञतेची ओढ निर्माण झाली पाहिजे, ह्या उद्देशाने शाळा-शाळांमधून विद्यार्थ्यांद्वारे घरोघरी जाऊन ‘घरकुल’साठी मदत मागण्याचे व्रत दरवर्षी न चुकता सांभाळले आहे! अर्थात त्यामागचा सामाजिक उद्देश मोठा आहे. शिवाय, संस्थेसाठी उपयुक्त ठरावे म्हणून दरवर्षी नाट्य व वाङमय क्षेत्रामधील तसेच न्यायाधीश, ख्यातनाम डॉक्टर व समाजधुरीण इत्यादी सेलिब्रिटिजना मुद्दामहून आमंत्रित केले जाते. त्याचा फायदा देणग्या मिळण्यासाठी होतोच!
”स्वत:च्या मतिमंद मुलांसाठी पण इतरांचा विश्वास संपादन करून ‘घरकुल’चे कार्य सुरळीत सुरू आहे, ते आम्ही पेशानं शिक्षक असल्यामुळे.” निवृत्त झालेले शिक्षक दांपत्य श्री. व सौ. बर्वे याबाबत अभिमानानं  सांगतात. पण ‘घरकुल’ची टीम केवळ अशा अभिमानावर संतुष्ट नाही. त्याचे प्रत्यंतर ‘घरकुल’च्या प्रवेशद्वाराजवळ पोचल्याक्षणी प्रत्ययास येते. ‘घरकुल’च्या कमानीतून प्रवेश करताच घुम्या, अबोल व्यक्तीचेही मन क्षणात प्रसन्न होईल असा तेथील झाडे-पाने-फुलांचा निसर्ग! तो जोपासण्यात व अधिक घडवण्यात कार्यकर्ते मग्न असतात. मतिमंदांची मानसिकता फुलवणे हा महत्त्वाचा पायाभूत गाभा ‘खोणी’त असा विविध त-हांनी जोपासला जातो.
‘घरकुला’त प्रवेश करताना, तेथे वावरताना भेटकर्त्याच्या मनातली जळमटे निघून जातात!
तेथील प्रत्येक खोलीत डोकावून पाहावे, भिंतींची रंगसंगती पाहवी. स्वच्छता हा कुठेही अडसर नाही. अशा रम्य वातावरणात आपणही राहवे असे भेटकर्त्या प्रत्येकास वाटणे हेच ‘घरकुल’चे यश आहे.
मतिमंदांसाठी काही खेळ, कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता म्हणून दरवर्षीचा कौतुक सोहळा इत्यादी बाबी ह्या-त्या अनुषंगाने येतात. पण आपण मात्र खोणीला जाऊन, मतिमंदांसाठी किंबहुना वृध्दाश्रमासाठी देखील कार्य उभारताना वैचारिकता व प्रत्यक्ष फिल्डवर्कसाठी मार्गदर्शन घ्यावे असा खोणीमधील ‘घरकुल’चा लौकिक!
अविनाश बर्वे हा ठाण्यातील धडपडया माणूस. ते व नंदिनी, दोघांनी मिळून अनेक विविध गुणसंपन्न विद्यार्थी तयार केले आहेत. त्या दांपत्याचा स्निग्ध जिव्हाळा व उत्कट सेवाभाव ही त्यांची ताकद आहे. त्यामधून ‘घरकुल’ला, तेथील कार्यपध्दतीला सद् भाव लाभला आहे. बर्वे ह्यांनी मतिमंदांच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला आहे. ते स्वत: कार्यकर्ते असल्याने त्यांनी देशभरातील असे प्रयत्न पाहिले आहेत. ते म्हणतात, की ”मतिमंदांसाठी खरी गरज आहे ती निवासी व्यवस्थेची. उलट, सरकारी मदत मिळत असल्याने ठिकठिकाणी मतिमंदांसाठी दिवसा चार तास वर्ग चालवले जातात. मतिमंद मुलांची अडचण अशी असते, की ह्या वर्गांतून ती फार काही शिकू शकत नाहीत. मतिमंदत्व आणि अन्य त-हेचं शारीरिक अपंगत्व यांतील फरक जाणला पाहिजे.”

– अविनाश बर्वे ९८६९२२७२५०, ०२२ २५३३ ७२५०

About Post Author

3 COMMENTS

  1. i wish to see the gharkul.
    i wish to see the gharkul. let me know the address & tele phone number pl.

    • अविनाश बर्वे

      अविनाश बर्वे
      ९८६९२२७२५०, ०२२ २५३३ ७२५०

  2. can you send me the bank…
    can you send me the bank account details where i can donate. Thanks

Comments are closed.