सोमवारी सकाळी १० ची वेळ… अनंतचतुर्थीनिमित्त रविवारी सुरू झालेली गणपती विसर्जनाची मिरवणूक अद्याप सुरू होती. वास्तविक श्री गणेशाचे विसर्जन अनंतचतुर्थीच्या दिवशीच पूर्ण व्हावे असे शास्त्र सांगते. नंतर सुरु होणारा पितृपंधरवडा अशुभ मानतात, पण त्याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते. सगळे डीजेच्या ठेक्यांवर तल्लिन होऊन नाचत होते. काही कार्यकर्त्यांच्या हातात दारूची बाटली बघितली. आपण सारे यातून काय मिळवितो? समाधान? शांती? आराधना? भक्ति? की नुसतीच नशा?
– सुभाष इनामदार
सोमवारी सकाळी १० ची वेळ… अनंतचतुर्थीनिमित्त रविवारी सुरू झालेली गणपती विसर्जनाची मिरवणूक अद्याप सुरू होती. मी टिळक रोडवरील स्पीकरच्या भिंतींनी हादरून गेलो. लांब उभे राहून नुसती नजर टाकली तर मिरवणुकीतील सजावटीच्या मखरात बसलेला श्री मंगलमूर्ती शांतपणे मांडी घालून ठामपणे बसलेला दिसला. माझ्या हाती काही नाही. कार्यकर्ते नेतील तसा मी पुढे सरकतो आहे, असे तो सांगत असावा.
अनेकांना ऑफिस गाठायची घाई. कुणाला दुकान सुरू करायची, तर कुणाला काही… पण या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याचे काय? प्रत्येक गणपती मंडळाच्या ट्रॅक्टरमागे विजपुरठा करणारे जनरेटर लावलेले होते. एका गाडीत डीजे गाण्य़ांची निवड करून ठोका असणारी गाणी निवडत होते. लय आणि तालात धुंद होऊन मंडळी नाचत होती. अंगविक्षेप करीत होती. अंगात बळ आल्यासारखे त्यांचे अंग तालावर जणू थिरकत होते.
सा-या वातावरणाचा ताबाच जणू या मंडळाच्या कर्णकर्कश्य आवाजाने घेतला होता. वास्तविक श्री गणेशाचे विसर्जन अनंतचतुर्थीच्या दिवशीच पूर्ण व्हावे असे शास्त्र सांगते. नंतर सुरु होतो पितृपंधरवडा. तो अशुभ मानतात, पण त्याचे कोणाला सोयरसुतक नव्हते. आपल्याच मस्तीत नाचणारे इतके मश्गुल असतात की ठेका हेच त्यांचे लक्ष्य असते आणि अंगाला हिसके देऊन नाचणे हा त्यांचा धर्म. ‘‘गणपती बाप्पा मोरया…’’ च्या निनादात बुध्दीचे हे आराध्य दैवत स्पिकरच्या भिंतीत अडकून गेले होते. इथे नशा दिसते ती केवळ आवाजाची. भक्तिची नाही!
मी तर टिळक रोडवर चाललेल्या एका ट्रॅक्टरच्या मागे काही कार्यकर्त्यांच्या हातात दारूची बाटली बघितली. ते सर्वजण आणि त्यांचा डीजेही ठेक्यांच्या आस्वादात मग्न होता. काही मंडळी इतर कार्यकर्त्यांना आत बोलावित होती. आता खरी नशा चालू होती. तसे पाहिले तर नाचणा-या तरूणांच्या डोळ्य़ात धुंदी कशाची आहे ते दिसत होते. त्यांचे पाय थिरकतच होते… अंग वळतच होते… पण हे सारे कशासाठी? का ही संधी साधून हे सारे भक्त आपल्या दैवतासमोर हा आगळा खेळ करण्यातच धन्यता मानतात?
पोलिसांचे एक पथक या मंडळींना पुढे येण्यासाठी सतत सांगत होते.. पण ते तात्पुरते ऐकत. पोलिस पुढे गेले की पुन्हा संथता आलीच. एक चौकात पोलिस डीजेला स्पीकरचा आवाज कमी करायला सांगत होता. थोडा वेळ गेला, की डीजे पुन्हा आवाजाची बटने वाढविताना दिसत होते.
खरंच…आपण सारे यातून काय मिळवितो? समाधान? शांती? आराधना? भक्ति? की नुसतीच नशा?
(सुभाष इनामदार यांच्या ‘निमित्त’ या ब्लॉगवरून साभार)
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.