बालगंधर्वांच्या जीवनावरील महत्वाकांक्षी मराठी चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. निर्माते नितीन देसाई व अभिनेता सुबोध भावे हे त्या निमित्ताने.
बालगंधर्वांच्या जीवनावरील महत्वाकांक्षी मराठी चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. निर्माते नितीन देसाई व अभिनेता सुबोध भावे हे त्या निमित्ताने युरोप-अमेरिकेच्या दौर्यावरही जाणार आहेत. ही वेळ साधून बालगंधर्वांच्या जीवनातील एका वेगळ्या अंगाकडे लक्ष वेधत आहोत. कर्नाटकच्या गोहराबाई हे बालगंधर्वांच्या जीवनातील वादग्रस्त व्यक्त्तिमत्त्व. त्यांची जन्मशताब्दी गेल्या वर्षी, 2010 साली होऊन गेली. त्यावेळी रहमत तरिकेरी यांनी कन्नडमध्ये लिहिलेल्या लेखाचा अनुवाद प्रशांत कुलकर्णी यांनी केला. तो प्रस्तुत करत आहोत.
बालगंधर्वांच्या या दुसर्या बायकोबद्दल बाळ सामंत यांनी बरेच लिहिले. त्याबाबत त्यांना ‘देवकीनंदन गोपाला’ नियतकालिकाचे संपादक शंकर पापळकर यांनी छेडले असता जो संवाद घडला तोही मूळ लेखापाठोपाठ संदर्भासाठी दिला आहे आणि त्यापुढे उल्लेख आहे तो रवींद्र पिंगे यांनी बालगंधर्वांबाबत ‘माणूस’ साप्ताहिकासाठी केलेल्या लेखनाचा.
वेबसाइटवर प्रस्तुत होत असलेल्या ‘अवांतर’मधील लेखनाचाही मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. इंग्रजी भाषा विरूध्द मातृभाषा असा वाद जोरात असताना, तिकडे दिल्लीजवळ दलित मंडळी इंग्रजी भाषेच्या मूर्ती उभ्या करून देवळे बांधत आहेत आणि मेकॉलेला पितृस्थानी नेऊन बसवत आहेत. या चळवळीबाबतची हकिगत सामाजिक घटना म्हणून विचार करायला लावील.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.