स्वामी निगमानंद सरस्वती यांचा एकशेसोळा दिवसांच्या उपोषणानंतर मृत्यू झाला. निगमानंदांनी गंगेच्या खोर्यातील खाणकामाविरुध्द उपोषण आरंभले होते. उपोषण करता करता प्रकृती बिघडल्यामुळे सत्तेचाळीस दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात हलवले. रामदेवबाबांना ज्या रुग्णालयात नेले तेथेच स्वामी निगमानंद होते. परंतु त्यांच्या उपोषणाची, त्यामागच्या पार्श्वभूमीची, त्यांच्या उद्दिष्टांची दखल कोणी घेतली नाही. आपल्या देशातले वास्तव प्रखरपणे मांडणा-या ‘पिपली लाईव्ह’ या सिनेमातील अखेरचा प्रसंग अगदी यासारखाच चितारला आहे…
– दिनकर गांगल
स्वामी निगमानंद सरस्वती यांचा एकशेसोळा दिवसांच्या उपोषणानंतर मृत्यू झाला. त्यासंबधी उलटसुलट प्रवाद असले आणि निगमानंद यांचे गुरू स्वामी शिवानंद व त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये वादंग माजले असले तरी निगमानंदांनी गंगेच्या खोर्यातील खाणकामाविरुध्द उपोषण आरंभले होते. तेव्हा त्यांचे मुळातले म्हणणे काही महत्त्वाचे असणार. कोर्टाचा निर्णय त्यांच्या विरुध्द होता, त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेणे जरुरीचे होते. त्यांचा उपवास चालू राहिला व त्यात त्यांचा मृत्यू ओढवला. त्यांचा ज्या कारणासाठी हा सत्याग्रह झाला त्यातील तपशील, सत्यासत्यता व त्यांचा मृत्यू या संबधातील सविस्तर माहिती सीबीआय चौकशीनंतर कळेल अशी आशा आहे.
तथापी त्यांच्या मृत्यूमुळे आपली समाजस्थिती किती खालावली आहे हे फार प्रकर्षाने लक्षात येते व विषाद वाटतो. निगमानंद हे फक्त चौतीस वर्षांचे होते. त्यांनी सतरा वर्षांपूर्वी संन्यास पत्करला व ते शिवानंदांच्या आश्रमात गेले. कंखाल येथील मैत्रीसदन हे त्यांचे मुक्कामाचे ठिकाण. त्या परिसरात नदीतील वाळू-दगड काढण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. असे पंचेचाळीस ठेकेदार आहेत. त्यांच्याकडून बेकायदा गोष्टी घडतात. त्याविरुध्द शिवानंद व निगमानंद यांचा लढा होता.
निगमानंदांना उपोषण करता करता प्रकृती बिघडल्यामुळे सत्तेचाळीस दिवसांपूर्वी रुग्णालयात हलवले. रामदेवबाबांना ज्या रुग्णालयात नेले तेथेच स्वामी निगमानंद होते. परंतु त्यांच्या उपोषणाची, त्यामागच्या पार्श्वभूमीची, त्यांच्या उद्दिष्टांची दखल कोणी घेतली नाही.
रामदेवबाबांचे नाट्य घडून गेले आणि निगमानंदांचा शोकांत घडून आला! ‘पीपली लाईव्ह’ या सिनेमाने आपल्या देशातले वास्तव प्रखरपणे मांडले. त्यांतील शेवटचा प्रसंग अगदी यासारखाच चितारला आहे. ‘पीपली लाइव्ह’चा हिरो आगीत मृत्यू पडल्याची वार्ता पसरते, सर्वत्र रण माजते, पण प्रत्यक्षात तेथे शोधक पत्रकार मेलेला असतो आणि हिरो बचावला जाऊन दूर शहरात ‘हरवून’ जातो. परंतु त्याचवेळी, त्या खेड्यातील एक दुबळा कामगार विहीर खणताखणता, कुपोषण, अनारोग्य, दारिद्रय यांमुळे मरण पावतो, त्याच्याकडे ना मिडियाचे लक्ष जात, ना कोणी पुढारी त्याबद्दल दु:ख व्यक्त करत आणि त्याची शोकांतिका लोकांपुढे मांडू शकेल असा, समाजसंवेदना जागी असलेला पत्रकार मरून गेलेला असतो!
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.