मी सर्वसाधारण रसिक प्रेक्षक आहे. माझ्या रसिकतेचा अपमान करणारे दोन प्रसंग माझ्या वाट्याला आले. एक – जुन्या नाटकाचे अभद्र रूप व दोन – जुन्या अभंगाचे विकृत सादरीकरण.
कै. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाचे २०१६ शतकमहोत्सवी वर्ष असल्याची पर्वणी साधून ‘प्रशांत दामले फॅन फाउंडेशन’ने ते नाटक रंगभूमीवर आणले होते. मी नाटकाचा प्रयोग पाहिला.
नव्या ‘संशयकल्लोळ’मध्ये राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले हे दोघे प्रमुख भूमिकांत असणार असे जाहीर झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. राहुल देशपांडे हे सध्याचे महाराष्ट्रातील लोकप्रिय रंगभूमी गायक कलाकार. दामले यांनी तर लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले आहेत. त्यांनी या अगोदर सौभद्र या आणखी एका लोकप्रिय संगीत नाटकाचे प्रयोग केले होते.
त्यावेळचे तंत्र वापरूनच हा नवीन प्रयोग बसवण्यात आला. मूळ संशयकल्लोळ हे पाच अंकी नाटक होते. त्यात अनेक प्रवेश आहेत. ‘संशयकल्लोळ’ नाटकातील पदांची संख्या ‘सौभद्र’/‘स्वयंवर’/‘मानापमान’ या जुन्या नाटकांच्या तुलनेने खूपच कमी म्हणजे फक्त तीस एवढी आहे. त्यांपैकी अठरा पदे पहिल्या दोन अंकात आहेत. अश्विनशेठ, रेवती आणि फाल्गुनराव (हो. हो. मूळ नाटकात त्यालाही पाच पदे आहेत) यांच्या तोंडी एकूण सत्तावीस पदे येतात. ‘हृदयी धरा हा बोध खरा’ हे पद दोनदा आहे.
नवा प्रयोग ‘सुटसुटीत’ करण्याचे ठरल्यावर पदांची संख्या घटणे स्वाभाविक होते. पण ती एक तृतीयांशने कमी झाली याचे जरा आश्चर्य वाटले. फाल्गुनरावांच्या तोंडून या नव्या प्रयोगात एकही पद गायले गेले नाही. प्रशांत दामले हे कसलेले गायक नसले तरी त्यांचे गाण्यातील प्राविण्य लोकांना माहीत आहे. मग अशा वेळी फाल्गुनराव ‘गद्य’ स्वरूपात राखण्याचा हेतू काय? प्रशांत दामले यांनी गायनसंन्यास तर घेतलेला नाही. मालिकांवरील इव्हेंट कार्यक्रमात ते हौसेने गात असतात.
‘संगीत संशयकल्लोळ’ हा फार्स आहे आणि फार्सची रंगत कायम ठेवण्यासाठी त्याला वेग असावा लागतो. जर पदांची संख्या वाढली तर घटनांचा वेग कमी होतो आणि रंगत उणावते, म्हणून पदे गाळली गेली असावीत. परंतु ‘संशयकल्लोळ’ची संहिता वाचली तर पदे गाळण्याचे ते कारण दिसत नाही. फाल्गुराव काही नायक नाही, त्यामुळे त्याने गायले नाही तरी फारसे बिघडत नाही असे कोणी म्हणू शकेल, परंतु ते योग्य वाटत नाही.
खरे तर, ‘संशयकल्लोळ’मध्ये खरा नायक – केंद्रवर्ती भूमिका – ‘संशय’ ही वृत्ती आहे. ती स्थायिभाव असलेली व्यक्तिरेखा नायक नाही हे म्हणणे योग्य होईल का?
प्रशांत दामले यांची पदे ‘गद्य’ करणे हा मुद्दा बाजूला ठेवून बघितले तर पहिल्या अंकातील दुसऱ्या प्रवेशातील रेवतीचे पद ‘मंगलदिनी तनमन धन दान पदी करते’ हे गाळले गेले. दुसऱ्या अंकातील रेवती आणि तिची मैत्रीण अनुराधा यांचा प्रवेश गाळला गेला. त्यामुळे त्या प्रवेशातील तीन पदे मूक झाली. तिसऱ्या अंकातील तिसऱ्या प्रवेशातील रेवतीच्या तोंडचे ‘भोळी खुळी गवसती जी धनिक बाळे’ हे पद गाळले गेले.
वास्तविक, रेवती आणि अनुराधा यांचा प्रवेश गाळला गेल्यामुळे रेवतीची मनोवृत्ती तत्कालीन गणिकांच्या तत्त्वज्ञानापेक्षा किती वेगळी होती हे प्रकर्षाने प्रेक्षकांसमोर आलेच नाही! श्रावणशेठच्या नोकराचे संवाद फाल्गुनरावाच्या नोकराच्या तोंडी घातले गेले (नाटकात पात्रे कमी – सुटसुटीतपणा अधिक? शिवाय खर्च कमी?).
मूळ नाटकात, स्वातीने बुरखा घालून आमराईत यावे असा निरोप भादव्याने तिला सांगावा यासाठी फाल्गुनराव त्याला सूचना देत असता, त्याने तत्संबंधात गुप्तता राखावी म्हणून ‘बक्षीस’ देण्याचे संवाद नाहीत. प्रशांत दामले यांनी येथे लोकनाट्यात सोंगाड्या जसे आयत्या वेळी पदरचे संवाद घालतो तसे घातले गेले आणि तशाच धाटणीने म्हटले गेले.
नाटक त्याच्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे काही प्रश्न निर्माण होतात.
१. एखादे नाटक – विशेषत: संगीत – पुन्हा रंगभूमीवर आणताना त्यात काटछाट का करायची? केवळ वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी?
२. मूळ संहितेमधील सर्व पैलू राखून ते सादर करण्याची जबाबदारी प्रयोग करणाऱ्यांनी बाळगणे हे आवश्यक आहे की नाही?
३. नाटकात अनावश्यक संवाद घुसडणे हा सांस्कृतिक गुन्हा मानून प्रेक्षकांनी कलाकारांना शिक्षा करणे प्रेक्षकांच्या सांस्कृतिक जबाबदारीचा भाग आहे की नाही?
४. एखादे पुस्तक नव्याने प्रकाशित होताना त्या पुस्तकासंबंधी मूळ संहितेचा साधकबाधक विचार करून, काही विवेचन करणारे संपादक प्रकाशकाला साहाय्य करत असतात. नाटक नव्याने रंगभूमीवर आणताना तसा संपादकीय सल्लागारांचा विचार निर्मात्याने घेतला पाहिजे असे त्यांना वाटत नाही का?
याहून तीव्र दु:खद असा प्रकार १० जुलै रोजी झाला. तो सांस्कृतिक गुन्हाच होता. प्रेक्षकांना टीव्ही माध्यमाने किती अवलेखायचे? त्याची काही सीमा? ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर ‘अवघा रंग एक झाला’ या शीर्षकाखाली काही अभंग (बहुधा आषाढी एकादशी जवळ असल्यामुळे) सादर केले गेले.
गेल्या काही वर्षांत प्रथितयश कलाकारांनी तिकिट लावूनअसे भक्तिरसाचे गुऱ्हाळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुळात अभंग गायन व त्याचा आस्वाद ही सामुहिक कृती होऊ शकते का हा विवादास्पद मुद्दा बाजूला ठेवला तरी मंचीय सादरीकरणात विकृत काही सादर होऊ नये अशी अपेक्षा असते.
‘खेळ मांडियेला’ हा लता मंगेशकर यांच्या आवाजातील अभंग ऐकवला जात असताना जे नृत्य सादर केले गेले ते हिंदी सिनेमातील ‘आयटेम साँग’च्या धर्तीवर होते. मुख्य नाचणाऱ्या स्त्रीला समुहातील एका पुरुषाने उचलून पुन्हा खाली ठेवले!
‘खेळ मांडियेला’ हा अभंग, त्यातील भाव आणि वरील सादरीकरण यांचा संबंध असलाच तर विळ्याभोपळ्यासारखा आहे. निर्मात्याने काय उद्देशाने असले नाच या कार्यक्रमात दाखवले?
– मुकुंद वझे
लेख छान आहे, व्यक्त केलेल्या
लेख छान आहे, व्यक्त केलेल्या भावनांशी पूर्णपणे सहमत। असाच प्रकार झी टिव्हीने सादर केलेल्या पंडित सत्यशील देशपांडे ह्यांच्या गप्पांच्या कार्यक्रमाबाबतीत झाला। सुमारे दीड तास चाललेल्या ह्या उत्कृष्ट कार्यक्रमाची मोडतोड करून फक्त वीस मिनिटांचा अंश दाखविला गेला। ह्यात कुठलेही संपादकीय भान राखण्यात आले नव्हते। अश्या निर्बुद्ध काटछाटीमुळे एका विद्वान कलाकाराचा आणि लोकसत्ता सारख्या प्रतिष्ठीत व्यासपीठाचा अधिक्षेप होतो हे झी टीव्ही च्या खिजगणतीतही नसावे।
Ekdam parkhad mat. Khoop
Ekdam parkhad mat. Khoop chhan
Comments are closed.