Home लक्षणीय नदीची संस्कृती, प्रकृती आणि मानवाने केलेली तिची विकृती

नदीची संस्कृती, प्रकृती आणि मानवाने केलेली तिची विकृती

_NadichiSanskruti_Prakruti_1.jpg

मराठवाड्यातील बीड जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील गणेशी नदीकाठी वसलेले खडकी घाट हे माझे आजोळ. त्या नदीचा व माझा माझ्या जन्मापासून संबंध. आई म्हणत असे, की नदीवरून आणलेली पाण्याची घागर घरात ठेवली आणि तुझा जन्म झाला! ती त्या दिवसापासून माझी दुसरी आई झाली. मी आजोबांच्याबरोबर पहाटे नदीवर जात असे. पूजेसाठी स्वच्छ पाणी आणि पात्राच्या कडेस असलेली कण्हेरीची मुबलक फुले आणणे हा माझा प्रत्येक सुट्टीमधील दैनंदिन उपक्रम. नदीने दहावी इयत्ता पास होईपर्यंत मला खूप माया लावली. हिवाळा आणि उन्हाळा यांमधील संथ स्वच्छ वाहते पाणी, किनाऱ्याच्या दोन्ही बाजूंस नदीपात्रापेक्षाही मोठा रूपेरी वाळूचा किनारा, त्यास लागून घनदाट वृक्ष… पिंपळ, उंबर, आंबे तर मुबलकच होते! वाटीने वाळू बाजूला केली, की खाली स्वच्छ पाण्याचा झरा मिळत असे. पाण्याची घागर लहान वाटीने भरून देताना नदीने मला प्रत्येक थेंबाचे महत्त्व शिकवले. मी नदीची सोबत उच्च शिक्षणाच्या शिड्या चढत असताना प्रत्येक पायरीवर ठेवली होती. मला पुन्हा आजोळी जाता आले नाही, पण जेव्हा गेलो तेव्हा तो नदीचा भाग उजाड झाला होता! विलायती बाभळीचे मोठे वनच तेथे तयार झाले होते. माझे वड, पिंपळ, उंबर कोठेच दिसत नव्हते, वाळूचा कणही नव्हता. डोळ्यांत अश्रू जमा झाले. कोठे असेल माझी आई? कोणीतरी उत्तरले, येथे मोठे धरण होत आहे. गाव धरणाखाली गेले आहे. एका सुंदर नदीचे अस्तित्व इतक्या सहजासहजी पुसले जाऊ शकते? नदीकाठच्या संस्कृतीचा, शेतीचा, वाळूचा, वृक्षश्रीमंतीचा हजारो वर्षांचा भूतकाळ तयार झाला! समोरचा भूगोल हे प्रखर वास्तव होते.

महाराष्ट्रामधील हजारो नद्यांच्या नशिबी अशाच भूगोलांचे सत्य लिहिले आहे! शेतकरी आणि त्यांची शेती उध्वस्त होण्याच्या मागे त्यांच्या भागामधील नद्यांचे मिटलेले अस्तित्व हे आहे. प्रत्येक नदीचे आयुष्य तिच्या पात्रामध्ये असलेली वाळू आणि दोन्ही किनाऱ्यांवर असलेली वृक्षांची प्रभावळ ठरवत असते. मला आठवते, मृगाचा पाऊस वेळेवर पडत असे, त्यानंतरची नक्षत्रेसुद्धा कोरडी जात नसत. श्रावणात तर कायम रिमझिम असे. मात्र नदीला पूर जेमतेम दोन-तीन वेळा येई. आजोबा म्हणत, उन्हाळ्यात नदी वाहत असली तरी तिचा परिसर तहानलेला असतो आणि तो पावसाची वाट आतुरतेने पाहत राहतो. सुरुवातीचा पाऊस नदीच्या पात्रात, वाळूच्या किनाऱ्यात पूर्ण मुरून जातो. त्याची साठवण क्षमता संपते आणि वर पुन्हा पावसाची रिपरिप चालू होते, तेव्हाच नदीला पूर येतो. किनाऱ्यावरील वाळू आणि दोन्ही बाजूंचे वृक्ष त्या पुराला शांत करत असतात. पावसाळा संपला, वाळूमध्ये खोल मुरलेले पावसाचे पाणी हळुहळू पृष्ठभागावर येऊ लागते आणि तेच स्वच्छ सुंदर जल पुन्हा वाहू लागते. त्याला प्रवाह म्हणतात. नदीचा वाहता प्रवाह पहिल्या पावसापर्यंत तसाच सुरू राहतो. नदीकाठची झाडी तोडणे, पात्रातील वाळू काढणे म्हणजे नदीच्या मृत्यूची घंटाच होय! तशा हजारो नद्यांच्या काठावर कोठेही वृक्ष दिसत नाहीत, दिसते ती रासायनिक शेती जी थोड्या पावसातही मातीसह नदीच्या पुरात मिसळते. नदीत दिसते ती फक्त माती आणि गाळ, वाळूचा एक कणही दिसत नाही.

अशी नदी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कशी वाहणार? महाराष्ट्रामधील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या काही भागांत 2017 च्या पावसाळ्यात दीड-दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर वरुण राजाचे पुनश्च आगमन झाले. पाऊस दोन दिवसांत पन्नास ते दीडशे मिलिमीटर पडला आणि परिसरातील सर्व नद्यांना पूर आले. ते सर्व पाणी पुरामधून वाहून गेले. पाठीमागे उरला तो प्रचंड गाळ. नदीकाठास वृक्षराजी असती आणि नदीची स्वनिर्मित वाळू तिच्याकडे असती तर तेवढा पूर आलाच नसता.

निसर्गानेच पाण्याचे व्यवस्थापन केले असते. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरवण्यात वृक्षांचा सहभाग मोठा असतो. सेंद्रीय शेती मोठ्या प्रमाणावर पाणी पित असते, शेतांना असणारे जैविक बांध त्यासाठी मदत करत असतात. वृक्षांच्या शीतल सावलीमुळे धूप कमी होते, जमिनीमध्ये पाणी टिकून राहते. वृक्षही हरित ग्रहाचे कार्य करत असतो. सर्व लहानमोठ्या नद्यांना एका मोठ्या पावसामध्ये महापूर येणे हे पर्यावरणावरील संकट आहे, कारण ते सर्व पाणी वाया जाते. जे धरणामध्ये जाते ते जाताना भरपूर शेतजमीन घेऊन जाते. अशी भरलेली धरणे नेहमी भासमान असतात आणि त्यांचे आयुष्य इंचा इंचाने कमी होत असते.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग अमृतासारखा करणे असेल तर सर्वप्रथम नद्यांना गाळमुक्त करून वाळूनिर्मितीस प्रोत्साहन देण्यास हवे, वाळू उपसा बंद करून नदी किनाऱ्यावर दाट वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वाळूस मानवनिर्मित पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे! रासायनिक शेती पावसासाठी जास्त संवेदनशील आहे. ती थोड्या जोरदार पावसात सहज वाहून जाते. त्यामुळे उतार तयार होतात. त्यातून ओढेनाले निर्मिती होते आणि तेच ओढेनाले कोणे एके काळच्या कोरड्या नदीस मिळून पूरदर्शक परिस्थिती तयार होते. नदीकिनारी रासायनिक शेती टाळली गेली पाहिजे. नदीला पावसाळ्यात पूर जरूर यावा पण त्यासाठी तिला काठावरच्या वृक्षांची आणि पात्रामधील वाळूची साथ हवी. अशी पूर आलेली नदी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात स्वच्छ पाण्याने वाहत असते आणि परिसरातील जैवविविधतचे संवर्धन करते. माणसांनी मोठमोठ्या नद्या आणि परिसरामधील लहान नद्या व त्यांना येणारे पूर समजून घेतले पाहिजेत, फक्त पावसाळ्यात वाहणारी नदी जिवंत कशी असणार?

गावपरिसरातील नदीला मोसमात पूर येतो. तो कौतुकाने पाहिला जातो. पण जेव्हा तीच नदी उन्हाळ्यात पाहतो तेव्हा तिच्यामध्ये अस्वच्छ नाल्यांचे पाणी असते आणि तेही डबक्यांच्या स्वरूपात! त्यासोबत केरकचरा, मलमूत्र, प्लॅस्टिकचे ढिगारे येतात ते वेगळेच. ‘कोणी नदीला म्हणती माता | कोणी म्हणती पूज्य देवता |’ ही गदिमांनी कृष्णा नदीसाठी लिहिलेली काव्यपंक्ती आहे. ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे सत्य आहे, मात्र गावागावांमधून अशा मोठ्या बहिणीकडे ओढ घेणाऱ्या शेकडो लहान बहिणींची अवस्था आज शोचनीय आहे. त्यांना एका पावसात आलेले पूर खूप काही शिकवून जातात. जल संधारण, जलव्यवस्थापन आणि जलसिंचन या विषयांमधील नापासाची गुणपत्रिकाही हातात पडते तेव्हा मन दु:खी होते!

(जलसंवाद, मार्च 2018 वरून उद्धत)

– नागेश टेकाळे

About Post Author

Exit mobile version