विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये शालेय जीवनात प्राप्त व्हावी या हेतूने तांदुळवाडी-मंगळापूरच्या श्री कोल्हेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये मोठा प्रयोग सुरू आहे. ते विद्यालय सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यात येते. विद्यालयात 2008-09 मध्ये पहिल्यांदा मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विषय कार्यानुभव या विषयाऐवजी सुरू केला गेला आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात जीवनकौशल्य शिक्षणाचा ‘अरूणोदय’ झाला. प्राचार्य अरुण मानेसरांची जिद्द, चिकाटी व निष्ठापूर्वक प्रयत्न यांमुळे अवघ्या पाच वर्षांत जिल्ह्यातील आयबीटी (Introduction of Basic Technology) शाळांना मार्गदर्शन करणारे सेंटर म्हणून त्या विद्यालयास मान्यता मिळाली. शाळेची ती नवी ओळख केवळ जिल्ह्यात नव्हे तर राज्यात निर्माण झाली.
मानेसरांनी पाबळ (पुणे जिल्हा, शिरूर तालुका) या गावामध्ये विज्ञान आश्रमात जाऊन, तेथे तयार करण्यात आलेल्या व एस.एस.सी.बोर्डाची व्ही-1 (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) म्हणून मान्यता असलेल्या ‘मूलभत तंत्रज्ञानाची ओळख’ या विषयाची माहिती घेतली. त्यांनी ती संस्थेतील सहकाऱ्यांना दिली. अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे व संचालक मंडळ यांनी मानेसरांची कल्पना उचलून धरली. त्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांना विश्वासात घेतले व अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले. अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सत्तर हजार रुपयांची साधने खरेदी करणे गरजेचे होते. संस्था कर्जात असताना, शासनाचे वेतनेतर अनुदान नसताना कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावरील तो अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शिक्षक व सेवक यांनी स्वतःचे योगदान दिले. सर्व साधने खरेदी केली. सरांनी दोन खोल्यांची उपलब्धता करून घेतली. विज्ञान आश्रम आणि जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र कार्यालयांची परवानगी घेऊन सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आठवीच्या वर्गास मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विषय सुरू झाला. अभ्यासक्रम अंमलबजावणीमध्ये विज्ञान आश्रमाचे संचालक योगेश कुलकर्णी व ओंकार बाणार्इत, समन्वयक कैलास जाधव यांचे सहकार्य लाभले. मानेसरांनी व्यायामशाळा व वर्गाचे पार्टिशन करून चार विभागांसाठी चार वर्कशॉप तयार करून दिली. सध्या अभियांत्रिकी विभागासाठी राजेंद्र शिंदे, ऊर्जा व पर्यावरण विभागासाठी सोमनाथ शिंदे, गृह व आरोग्य विभागासाठी सारिका घोरपडे आणि शेती व पशुपालन विभागासाठी मिलिंद माने हे सेवा देत आहेत. निदेशकांचे मानधन व प्रात्यक्षिकांसाठीचा खर्च ही मोठी समस्या होती. परंतु, भारतीयांनीच अमेरिकेत स्थापन केलेल्या ‘लेंड-अ-हॅण्ड इंडिया’ या ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला पहिली तीन वर्षें शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. ‘लेंड-अ-हॅण्ड इंडिया’च्या संस्थापक सुनंदा माने व सहसंस्थापक राज गिल्डा यांनी त्या कामी पुढाकार घेतला.
मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हे अभ्यास विषयाचे नाव बदलण्यात आले असून मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (एम.एस.एफ.सी.) असे करण्यात आले आहे. भारत सरकारने स्किल इंडिया धोरणांतर्गत या विषयासाठी हिंदी किंवा सामाजिक शास्त्रे या विषयाला पर्यायी विषय म्हणून हा विषय इयत्ता नववी व दहावी यांच्या स्तरावर शिकवण्यास मान्यता दिली आहे.(त्यामुळे ह्या विषयाचा अंतर्भाव प्रमुख पाच विषयांमध्ये होणार आहे.)
अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे ‘लेंड-अ-हॅण्ड इंडिया’ ट्रस्टने त्यामागील शाळाचालकांच्या प्रयत्नांची दखल घेऊन विद्यालयात एम.एस.एफ.सी. ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यास सुचवले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एम.एस.एफ.सी. शाळांतील निदेशकांच्या निवासी प्रशिक्षणाची सोय झाली आहे. ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून विविध कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्यामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून वेल्डिंग करणे, कटिंग करणे, थ्रेडिंग करणे, धार लावणे, फेरोसिमेंट शीट तयार करणे, बांधकाम, सुतारकाम इत्यादी प्रात्यक्षिकांद्वारे शाळांतील बाकांची दुरूस्ती, नवीन बेंच तयार करणे, वेल्डिंग करून देणे, थ्रेड पाडून देणे, तिवर्इ, सुपली, चप्पल स्टॅण्ड, सिलेंडर ट्रॉली, पॅड, बुक स्टँड अशा वस्तू तयार करणे शक्य झाले आहे. ती लोकोपयोगी अशीच सेवा आहे.
ऊर्जा व पर्यावरण विभागाच्या माध्यमातून रोधांची एकसर जोडणी, समांतर जोडणी करणे, विद्युत साधनांची ओळख व जोडणी करणे, जिना वायरिंग, हॉस्पिटल वायरिंग, गोडावून वायरिंग, घरगुती जोडणी, अर्थिंग करणे, बायोगॅस संयंत्राचा अभ्यास करणे, प्लेन टेबल सर्वेद्वारे शेतजमीन मोजणे, कंटुर लार्इन्स मार्क करणे या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून घरगुती विद्युत उपकरणांची दुरूस्ती, लार्इटमाळा तयार करणे, बॅटरी तयार करणे अशा प्रकारच्या सेवा लोकांना देण्यात येत आहेत.
गृह व आरोग्य विभागामार्फत पाककला अंतर्गत चिक्की, जॅम, जेली, भडंग तयार करणे, विणकाम व शिवणकाम याअंतर्गत वॉल हँगिंग, शो पीस तयार करणे, स्वेटर विणणे, आरोग्य याअंतर्गत फिनेल, हॅण्डवॉश, सेंट तयार करणे, रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणे, पिण्याच्या पाण्याची तपासणी, मातीपरीक्षण, अन्नातील पोषक द्रव्यांचा अभ्यास इत्यादी सेवा लोकांना उपलब्ध आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2013 रोजी जरेवाडी व मुगाव या गावातील महिलांचे मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
हातांना काम मिळाले, की बुद्धीदेखील चालू लागते असे महात्मा गांधींनी म्हटले आहे. केवळ घोकंपट्टी करून मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्यास अपुरे ठरते. नव्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ काम करणे अपेक्षित नसून एखादे काम करताना किंवा कौशल्य शिकताना त्यामागील तत्त्व, इतिहास जाणून घेणे, नियोजन करणे, गुणवत्तेबाबतची स्पर्धा व अर्थकारण, विक्रीकौशल्य यांचे ज्ञान मिळवणे, उत्पादनक्षमता, कच्च्या मालाची निर्मिती व खर्च, निर्मित वस्तूची किंमत ठरवणे आणि बौद्धिक क्रिया व तयार करायच्या वस्तूचे रेखाचित्र तयार करणे, विविध कोनांतून दिसणारी वस्तूची त्रिमिती चित्रे काढून चित्रकलेची कौशल्ये आत्मसात करणे असे बरेच शिक्षण अभिप्रेत आहे. म्हणजेच या विषयामार्फत विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करणे शक्य होते.
भारतात एक काळ असा होता, की लोकांच्या सर्व गरजा खेड्यातील खेड्यातच पूर्ण होत. लहानमोठे हस्तकला उद्योग खेड्यातून चालत. कला-कसबांचे हस्तांतर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होई. त्यामुळे खेड्यातच रोजगार उपलब्ध होऊन लोकांना चरितार्थासाठी स्थलांतराची गरज राहत नसे. ते टाळले जात होते. ब्रिटिश राजवटीत आधुनिक उद्योग आले आणि खेड्यांचे स्वावलंबित्व नष्ट झाले. म्हणून महात्मा गांधी यांचा पुकारा होता, ‘खेडयाकडे चला’, पण औद्योगिकीकरणाच्या रेट्यापुढे परिस्थिती बदलणे शक्य नव्हते. तेव्हा गांधी यांनी मुलोद्योगी शिक्षणाची संकल्पना मांडली. संकल्पना चांगली असूनही अंमलात येऊ शकली नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबनातून शिक्षण ही संकल्पना ‘कमवा व शिका’ योजनेद्वारे राबवली. पण प्रत्यक्ष शिक्षणातून मात्र श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, कौशल्यांचा विकास व कृतिशीलता दूरच राहिली. पुस्तकी ज्ञान विस्तारले. मानेसरांची दृष्टी मोठी होती. त्यांनी शिक्षणाची ही दुरवस्था हेरली. त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्याना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये प्राप्त व्हावीत, त्यांचा आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांच्यात व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त व्हावी या दृष्टीने कायम विनाअनुदान तत्त्वावरील तसा विषय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मानेसरांचा शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन, व्यवसायाबद्दलची तळमळ, त्यांची जिद्द व त्यांचे कर्तृत्व यांमधून आयबीटीची प्रभावी अंमलबजावणी झाली. त्यामुळे तांदुळवाडीच्या माळरानावर फुललेल्या जीवनकौशल्ये शिकवणाऱ्या या विद्यालयास गोवा, छत्तीसगढ, हरियाणा, कर्नाटक, बिहार या राज्यांतील शिक्षणसंस्थांचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक अभ्यासभेटी देत असतात.
त्याखेरीज राज्यभरातील अनेक शिक्षणसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी शाळेला भेट देऊन विविध उपक्रम जाणून घेतले आहेत. शाळांत जाणारे देशांतील केवळ तेरा टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोचत असताना देशातील उर्वरित विद्यार्थी एकतर शिक्षणप्रक्रियेतून नापासाचा शिक्का मारून बाहेर काढले जातात किंवा परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. युवकांची शक्ती देशविकासासाठी वापरायची असेल तर मानेसरांनी ज्या तळमळीतून हा वसा हाती घेतला आहे त्यास सर्वांचे हातभार लागले व असे अभ्यासक्रम सर्व शाळामधून सुरू झाले तर भारतास महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करण्यातील तो एक मोठा टप्पा होईल. माने सर 2013 ला सेवानिवृत्त झाले. सध्या जी.ए. वाघ हे मुख्याध्यापक आहेत. ते पूर्वी या उपक्रमाचे समन्वयक होते. त्यामुळे त्यांना त्या प्रकल्पाची चांगलीच जाण आहे.
– शत्रुघ्न माधव मोहिते, latikamohite45@gmail.com
श्री कोल्हेश्वर विद्यालय व ज्यनिअर कॉलेज ऑफ आर्टस तांदुळवाडी – मंगळापूर, ता.कोरेगाव जि. सातारा
Very Very good Program Best…
Very Very good Program Best Luck:-(+_+)
उपक्रम खूपच छान! आमच्याही…
उपक्रम खूपच छान! आमच्याही Helpers of the handicapped Kolhapur संस्थेच्या समर्थ विद्यालय उंचगाव कोल्हापूर या शाळेने नुकताच विज्ञान आश्रम पाबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत हा उपक्रम सुरु केला आहे. कृपया आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. आम्हाला आपल्या शाळेस भेट द्यावयाची आहे.
अत्यंत सुंदर उपक्रम आहे
अत्यंत सुंदर उपक्रम आहे
Comments are closed.