‘जिमखाना’ हा मराठी रोजच्या वापरातील शब्द आहे. जिमखाना म्हणजे ‘व्यायामशाळा’ किंवा विविध खेळ जेथे खेळले जातात अशी जागा, असा अर्थ व्यवहारात घेतला जातो. जिमखाना शब्दाचे ‘जिम’ आणि ‘खाना’ असे दोन भाग आहेत. त्यांतील ‘खाना’ हा मूळ फारसी शब्द. तो हिंदीतही रूढ झाला आहे आणि त्याचा अर्थ खोली, कक्ष किंवा विभाग असा आहे. शब्दाच्या अंती खाना असलेले दवाखाना, फरासखाना, तोफखाना, कबुतरखाना, जिरायतखाना, हथियारखाना, किताबखाना, जनानखाना, हत्तीखाना असे आणखी काही शब्द वाचकांच्या परिचयाचे असतात. हत्तीखान्याला ‘पिलखाना’ असाही शब्द आहे. या सर्व शब्दांचा अर्थही चटकन ध्यानात येतो. विशिष्ट वस्तू ठेवण्याची खोली किंवा विशिष्ट कामाची जागा असा अर्थ त्यातून दिसून येतो.
त्याशिवाय शेवटी खाना असलेले काही अपरिचित शब्दही आढळतात. नंदकिशोर पारिक यांच्या ‘जयपूर जो था’ या जयपूर शहराच्या इतिहासावर आधारलेल्या गाजलेल्या पुस्तकात अनेक मजेशीर गोष्टी वाचनात येतात. महाराजा रामसिंह यांना पतंगबाजीचा छंद होता. त्यांचा ‘पतंगखाना’ ‘पतंगोंकी कोठडी’ या नावाने ओळखला जाई. रामसिंहाचा मुलगा माधोसिंह पुस्तकप्रेमी होता. पहाटे उठल्यावर प्रथम सवत्स धेनूंचे शुभदर्शन होऊन दिवस चांगला जावा, यासाठी त्याच्या सज्जापुढून गाईवासरे नेली जात. त्यासाठी ‘गौळखाना’ असे.
हे सर्व शब्द मुघलांच्या काळात मुघल साम्राज्यात रूढ झाले. उत्तरेकडील हिंदी भाषिक संस्थानांमध्ये त्या नावांचे विभाग असत आणि त्यात काम करणारे अनेक जण असत. कधी कधी, त्या विभागांच्या प्रमुखांची आडनावेही त्यावरून तयार झालेली आढळतात. जसे; तोफखाने, जिरायतखाने, शिकारखाने इत्यादी. एकंदरीत, अंती खाना असलेले शब्द हिंदी भाषेतील आहेत; पण म्हणूनच ‘जिमखाना’ हा शब्द कसा तयार झाला असावा याचे कोडे पडते. कारण ‘जिमखाना’मधील ‘जिम’ हा शब्द हिंदी नसून इंग्रजी आहे. जिम हा शब्द जिम्नॅस्टिक आणि जिम्नॅशियमचे लघुरूप आहे. आधुनिक व्यायामशाळांना नुसते ‘जिम’ असेच म्हटले जाते. शिवाय व्यायामशाळेसाठी ‘तालीमखाना’ हा हिंदी शब्द पूर्वापार वापरात आहे. मग जिमखाना शब्द कसा तयार झाला?
काही तज्ज्ञांच्या मते ‘जिमखाना’ हा शब्द ‘गेंदखाना’ या शब्दापासून तयार झाला आहे. गेंद म्हणजे चेंडू. चेंडू खेळण्याची जागा म्हणजे ‘गेंदखाना’. कालांतराने ब्रिटिश राजवटीत खेळांच्या स्पर्धा जेथे आयोजित केल्या जात, त्याला जिमखाना असे म्हटले जाऊ लागले. अशा तऱ्हेने इंग्रजी आणि हिंदी यांच्या मिश्रणातून तो शब्द तयार झाला आहे.
आजकाल दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हिंदी आणि इंग्रजी यांच्या मिश्रणातून तयार झालेली ‘हिंग्लीश’ भाषा कानांवर पडते. ‘जिमखाना’ हा शब्द त्या हिंग्लीश भाषेच्या शब्दकोशातील आद्य शब्द समजण्यास हरकत नसावी.
– उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in
(मूळ प्रसिद्धी – राजहंस ग्रंथवेध)