Home साहित्य पुस्‍तक परिचय जंगलगाथा – हृदयस्थ कवीचा आर्त हुंकार

जंगलगाथा – हृदयस्थ कवीचा आर्त हुंकार

2

‘जंगलगाथा’ ही, कवी रमेश सावंत यांची जंगल आणि आततायी प्रवृत्तीचा मानव यांच्यातील संघर्षाचे आशयसूत्र पकडून लिहिलेली मालिका कविता आहे. ती सर्वार्थांनी अभिनव अशी काव्यकलाकृती आहे. महत्त्वाचा आशयविषय असलेली नाविन्यपूर्ण अशी ती कलाकृती मराठी साहित्यात मोलाचा ठसा उमटवील असा विश्वास मला वाटतो.

मी व कवी रमेश सावंत असे आम्ही दोघे अधुनमधून भेटत असतो. साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, सालस व मृदुभाषी असे ते व्यक्तिमत्त्व आहे. दुसऱ्याचा आदर करणे हा त्यांचा स्वभावधर्म. त्यांनी माणसांबद्दलची आत्मीयता जणू काळीजगुंफेत कोरून ठेवली आहे! साहजिकच, त्यांनी प्रेमळ नात्याने जोडलेली माणसे अनेक आहेत.

कवी रमेश सावंत यांचा पहिला कवितासंग्रह ‘गहिवर’ 2012 साली प्रसिद्ध झाला. त्या संग्रहाला राज्यस्तरीय पाच पुरस्कार प्राप्त झाले. पुढे, 2014 ते 2016 या दोन वर्षांत, त्यांचे चार संग्रह प्रसिद्ध झाले : ‘ती चिनारची झाडे’ – जून 2014, (हिंदी कवितांचा मराठी अनुवाद), ‘ओस की बूंद’ – डिसेंबर 2014, (बाळ राणे यांच्या मराठी हायकूंचा हिंदी अनुवाद), ‘एकांतातील कविता’ – 2016, ‘सूर गजलेचे’ – 2016. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहांचा कालावधी लक्षात घेता, त्यांच्या काव्यलेखनाला त्या काळात उत्स्फूर्तपणे बहर आला असावा. तो त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

‘जंगलगाथा’ हा त्यांचा सहावा कवितासंग्रह. तो आशयाच्या दृष्टीने कवीच्या आणि वाचकांच्याही जिव्हाळ्याचा आहे. त्यांना जी आत्मीयता माणसांबद्दलची, तीच आत्मीयता प्राणी, झाडेझुडुपे, एकंदरीत सर्व जीवसृष्टीबद्दलची आहे आणि ती ‘जंगलगाथा’च्या पानोपानी कवितचे रूप घेऊन उमटलेली आहे.

मला कवीची तीन वैशिष्ट्ये जाणवली. ती म्हणजे –

  • आदरपूर्वक उद्धृत केलेला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग
  • कवीची समर्पक अर्पणपत्रिका आणि पृष्ठ 76 वरील ‘जीवनदाता’ ही कविता.

सोळाव्या शतकात, संत तुकारामांनी संदेश दिलेला आहे, की वृक्षवल्ली, वनचरे, पक्षी (जंगलात सहवास/वावर करणारी जीवसृष्टी) हे आपले सगेसोयरे आहेत. त्यांचे जतन/संरक्षण केले तर मानवी जीवनही समृद्ध होईल.

  • जगभरात अनेकजण वनश्रीवर, प्राणिमात्रांवर अतीव प्रेम करणारे आहेत, ते सारेजण वन/प्राणीप्रेमी त्यांच्या त्यांच्या परीने वृक्षांचे संवर्धन करत असतात, एकंदरीत सर्व जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी त्यांचे जीवन समर्पित करतात, अशा जगातील सर्व जंगलप्रेमींना, कवीने त्याचा कवितासंग्रह समर्पित केलेला आहे. ही कवीची भावना उदात्त, उत्कट आणि हृदयस्पर्शी आहे. ‘जीवनदाता’ ही कविता, कवीने त्याचे आजोबा ‘ताता’ यांच्या स्मृतीस स्मरून लिहिलेली आहे,

धोतराचा घट्ट खोचा मारून
रोज शिरायचा तो घनदाट जंगलात
 काठीसारखं सडसडीत उघडं अंग घेऊन
लवलवत जायचा झाडापेडांतून
तेव्हा भिरभिरत असायची
त्याची शोधक नजर
आजूबाजूच्या झुडुपांवर
डोक्यात मात्र वळवळत असायचा
वनौषधी शोधण्याचा किडा

_Jangalgatha_2.jpgती कविता वाचताना, आजोबांच्या वेळचे घनदाट जंगल, आजोबा त्या दाट जंगलातून वनौषधी शोधून, गावातील लोकांना आजारमुक्त करायचे. कवीच्या तातांचे झाडापेडांशी आपुलकीचे नाते होते, त्यांचे झाडापेडांशी वनौषधीसाठी ऋणानुबंध होते. त्यांचा झाडपाला औषधापुरता घ्यायचा, झाडापेडांना ओरबाडायचे नाही; हा स्वभावगुणधर्म कवीला आनुवंशिकतेने लाभलेला असावा. म्हणूनच की काय, कोकणात, तातांच्या सावलीत आणि झाडापेडांच्या कुशीत वाढलेल्या कवीचे झाडापेडांशी, एकंदरीत निसर्गाशी अतूट असा ऋणानुबंध जडलेला आहे.

विकासाच्या नावाखाली होणारे खेड्यापाड्यांचे शहरीकरण आणि त्याकरता विकासाआड येणाऱ्या झाडापेडांची अमानुषपणे होणारी कत्तल, सरकारी नियोजित प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त होणारी गावे, त्या गावांबरोबर उद्ध्वस्त होणारी आजूबाजूची जंगले…  आणि मानवासहित जंगलातील जीवसृष्टी व प्राणिमात्र यांचा अपरिमित नाश पाहून संवेदनशील कवीचे हृदय हेलावते. तो आंतरिक सल त्याच्या मनाला अहोरात्र टोचत राहतो. सजीव पण मुक्या जीवसृष्टीच्या वेदना, व्यथा कवी त्याच्या धारदार परखड शब्दांतून व्यक्त करतो. तमाम जीवसृष्टीची हृदयद्रावक व्यथा ही निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्या कवीचीच व्यथा आहे. ती व्यथा, वेदना शब्दाशब्दांतील आर्त हुंकारांतून प्रतिबिंबित झालेली आहे. कवी ‘वाचायला हवं जंगल!’ या पहिल्याच कवितेत लिहितो –

म्हणूनच हृदयाचे डोळे उघडून
बघायला हवी निरखून
सृष्टीच्या कुंचल्यातून घडलेली
निःशब्द पण हृदयंगम कविता
आणि ‘वाचायला’ हवे जंगल
निसर्गाच्या पाटीवर लिहिलेल्या
एखाद्या बहारदार पुस्तकासारखे!

कवी रमेश सावंत यांना जीवसृष्टीचे भावविश्व हे त्यांचे भावविश्व आहे असे वाटते आणि कवीला जीवसृष्टीचे ते भावविश्व उद्ध्वस्त होताना, पर्यावरणाचा समतोल ढासळताना पाहून मानसिक यातना होतात. कवी विकासाच्या नावाखाली जंगलपरिसर उजाड करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांबद्दलची चीड ‘फौज गिधाडांची’ या कवितेत व्यक्त करतो –

मरण स्वस्त झालं
तेव्हापासून दिसू लागलीय
मस्तवाल गिधाडांची फौज
जिवंत माणसांच्या रुपात
अधाशीपणे वर्दळताना (पृष्ठ 17)

काही अपवादात्मक वृक्ष तोडले तर मुळापासून मरून जातात, पण बहुतांश झाडपेड बुंध्यापासून तोडली तरी बुंध्यांना पुन्हा पालवी येते. त्यांची झपाट्याने वाढ होत असते. कवी ‘जंगल पाहिजे जंगल’ या कवितेत लिहितो –

कितीही तोडा, कसेही झोडा
पुन्हा रुजून येतेच
एक नवे हिरवेगार जंगल
निर्घृणपणे कापलेल्या चिवट खोडातून (पृष्ठ 86)

कवीने ‘धुक्यात दडलेली वाट’, ‘ध्यानस्थ जंगल’, ‘वृक्षगान’, ‘जंगल- गावातलं, मनातलं’, ‘जंगलवेडा’ अशा काही कवितांतून जंगलाच्या महतीचे आणि अपूर्वाईचे वर्णनही केले आहे. कवीचे झाडापेडांबद्दलचे ममत्व सजग आहे.

आपण मानवप्राणी किती स्वार्थी आहोत ते पाहा. आंबा, काजू, फणस अशा रसाळ फळ देणाऱ्या काही झाडांना जंगली न समजता ती त्याच्या दारची आहेत, असे समजून तो त्यांचे जतन जीवापाड करतो. मग त्याने जंगलातील वृक्षरायीचे जतन त्याच न्यायाने का करू नये! पण इतकी सजगता, समज येण्यासाठी मुळात निःस्वार्थीपणाची गरज, भान असायला हवे. त्याचीच वानवा आहे. तेच कवीचे दुःख मोठे आहे. निसर्गदत्त जंगलात खास वृक्षारोपण करण्याची गरज नाही. पक्षी-प्राणी त्यांच्या संचाराबरोबरच वृक्षांचे बी-बियाणे जंगल परिसरात पेरत असतात. ते बी-बियाणे रुजते, जोमाने तरारून येते, वाढते. माणसाने त्यांचे फक्त जतन करण्यास हवे.

कवी त्याच्या मनोगतात लिहितो, “एक निसर्गप्रेमी म्हणून खारीचा वाटा असलेल्या माझ्या लेखनप्रपंचामुळे जंगल आणि तेथील जीवसृष्टी यांबद्दल वाचकांमध्ये काही प्रमाणात जरी उत्सुकता आणि जिव्हाळा निर्माण झाला तरी माझ्यासारख्या कवीला त्याच्या प्रयत्नाचे सार्थक झाल्याचा अतीव आनंद होईल.” कवीची ती प्रेमळ साद अगदी रास्त आहे. वाचकांनी त्याच्या सादेला मनापासून सकारात्मक प्रतिसाद द्यावा. कवी/चित्रकार रामदास खरे यांनी चितारलेले मुखपृष्ठ आणि रेखाटने समर्पक आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन.

‘जंगलगाथा’
कवी : रमेश नागेश सावंत (9821262767, rameshns12@gmail.com)
संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठ : 88,

मूल्य 125 रुपये

– श्याम पेंढारी, shampen@ymail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. जीवसृष्टी यांबद्दल …
    जीवसृष्टी यांबद्दल पहिल्यांदाच कविता वाचतोय .. ….अभिनंदन सावंत सर.

  2. नेमक्या शब्दात सुंदर परीक्षण…
    नेमक्या शब्दात सुंदर परीक्षण..अभिनंदन

Leave a Reply to SHRIKANT PETKAR Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version