माडिया मुलांसाठी इंग्रजी शाळा
प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’ची आगळीवेगळी एक शाळा नेलगुंडाला आहे. नेलगुंडा हे छोटेसे आदिवासी खेडे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या पुढे सत्तावीस किलोमीटरवर आहे. त्या शाळेच्या प्रथमदर्शनी भिंतीवर लिहिले आहे, “चुकते कई बातल आयो”. त्याचा अर्थ- चुकले तर चुकले, काळजी नको!
हेमलकसा ते नेलगुंडा हे अंतर फार नसले तरी रस्ता फार खडतर आहे. मी समीक्षा आमटे यांच्याबरोबर तेथे जात होतो. समीक्षा ही बाबा-साधना आमटे यांची नातसून, प्रकाश- मंदाकिनी आमटे यांची सून, तर अनिकेत आमटे यांची पत्नी. माहेरचे आडनाव गोडसे. समीक्षा यांनी गाडी अचानक एका ठिकाणी थांबवली आणि एक दृश्य दाखवले. एका झाडाला वानर टांगलेले दिसले. ते पेंढा भरलेले होते. माडिया, गोंड लोक अशुभनिवारण म्हणून ते अशा प्रकारे झाडावर टांगतात. त्या अनुषंगाने, माझे व समीक्षा यांचे बोलणे आदिवासींच्या प्रथा-परंपरा, लोककला, लोकगीते-लोककथा यांविषयी होत होते. त्या मला मुंग्यांची वारूळे, झाडाझाडांतून सूर मारणारे विविध पक्षी यांची ओळख करून देत होत्या.
बाबा आमटे यांनी वरोरा येथील महारोगी सेवा संस्था कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी व पुनर्वसनासाठी स्थापन केली. हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प हा त्याच ट्रस्टचा एक भाग. प्रकाश आणि मंदा आमटे यांनी हेमलकसाच्या प्रकल्पाची पन्नास वर्षांपूर्वी जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या आरोग्यसेवेतून तेथील लहान मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले. त्या भागात मुलांच्या शिक्षणाच्या सोयी फार नव्हत्या, म्हणून त्यांनी लोकबिरादरी शाळा सुरू केली. त्या शाळेतून बाहेर पडलेले काही माडिया विद्यार्थी खूप पुढे गेले आहेत. अहेरी येथे आरोग्यसेवा देत असलेले डॉ. कन्ना मडावी हे त्यांतील एक उदाहरण.
प्रकाश आमटे यांच्या दोन्ही मुलांनी – डॉ. दिगंत आणि अनिकेत आमटे यांनी हेमलकसापासून दूरवर असलेले खेडे म्हणून नेलगुंडा या गावी आगळीवेगळी एक शाळा 3 ऑगस्ट 2015 रोजी सुरू केली. आदिवासी भागात खोलवर शिक्षण न्यावे ही मुख्य भावना. त्या शाळेची जबाबदारी समीक्षा आमटे यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. आजुबाजूच्या दहा-बारा गावांतील मुले त्या शाळेत येतात. सगळ्या वाटा जंगलातून आहेत, त्यामुळे जंगली प्राण्यांची भीती असते. एकदा मुलांच्या मागे अस्वल लागले होते! आता त्यांच्यासाठी सायकली घेतल्या आहेत.
नेलगुंडाची शाळा चालवताना, आमटे कुटुंबीयांनी घेतलेल्या भूमिकेला दोन पदर आहेत. ‘शिक्षण’ ही स्वतंत्र गोष्ट नाही. राज्यशासनाने स्वत:ची प्रणाली अध्यापन आणि मूल्यांकन यासाठी निर्माण केली आहे. नेलगुंडाची शाळा स्वायत्त नाही, पण स्वतंत्र आहे. ते एक प्रकारे राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हानच आहे! दुसरीकडे, आदिवासींपर्यंत त्यांच्या सामाजिक व भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊन शिक्षण नेणे, ही गोष्ट आहे. मला दुसरी गोष्ट महत्त्वाची वाटते. त्यात उदारमतवाद आणि बहुसांस्कृतिकता आहे. त्या त्या समूहाचे भाषिक आणि सांस्कृतिक अस्तित्व मान्य करणे हे आहे. तो प्रवास लोकशाहीच्या शुद्ध रूपाकडे जाणारा आहे. सर्वाना शिक्षणाच्या एकाच मध्यवर्ती साच्यात कोंबण्यापेक्षा, शेवटच्या स्तरावरील समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणताना त्याचे सत्त्व जपण्याची ती मौलिक भूमिका रवीन्द्रनाथ टागोर यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे.
शाळेच्या भाषामाध्यमाबद्दल समीक्षा आमटे यांची भूमिका पटणारी आहे. तेथील मुलांची बोली मराठी नाही, ती माडिया आहे. त्यांच्यासाठी मराठी असो की इंग्रजी, दोन्ही भाषा परकीयच आहेत! त्या मुलांना शिक्षणक्रमात पुढे इंग्रजीला सामोरे जावे लागणार आहे. लोकबिरादरीच्या हेमलकसा येथील शाळेचा अनुभव पाठीशी आहेच. म्हणून शाळेच्या दैनंदिन व्यवहारात माडिया आणि इंग्रजी यांचा वापर सर्व विद्यार्थी व शिक्षक जाणीवपूर्वक करतात. जैवविविधतेप्रमाणे भाषिक विविधताही मानवी अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे. किंबहुना, कला आणि जीवनमूल्ये यांचा विचार केला, तर भाषिक विविधता अधिक महत्त्वाची ठरते. एखाद्या भाषिक समूहाचे शेकडो पिढ्यांचे ज्ञान त्यांच्या भाषेतच दडलेले असते. ते त्यांच्या जैविक आणि सामाजिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग असते. त्यामुळे माडिया मुलांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मायबोलीच्या कोषाचा आधार कायम असणे गरजेचे असते.
नेलगुंडा शाळेच्या परिसरात प्रवेश करताच ती शाळा आहे असे वाटतच नाही. ते जपानी पॅगोडासारखे सर्व बाजूंनी मोकळे असलेले सुंदर डोम आहेत. भोवतालच्या झाडीमुळे हवेशीर छपराखाली बसताना मुलांना बंदिस्त वर्गात बसल्यासारखे वाटत नाही. काही ठिकाणी पायऱ्या चढून उंचावर वर्गखोली तर एक नुसत्या बांबूपासून बनवलेली सुंदर झोपडी. मुलांना बसण्यासाठी चौरंगासारखी आसने. शिक्षकालाही तसेच. त्याच उंचीवर फळा. मुलांना खेळण्या-बागडण्यास खूप खूप मोकळी जागा सोडली आहे. मुळातील लहानमोठ्या झाडांच्या आधारे जुन्या टायरसारख्या वस्तूंनी झुले बनवलेले दिसतात. विटासिमेंटचे बांधकाम कमी आहे. हिरवेगार दृश्य पहिल्याच पावसाने सगळीकडे होते.
लोकबिरादारी प्रकल्प हा केवळ गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्य व शिक्षण यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो गांधीवादी वृत्तीने सेवाभाव जपणाऱ्या महानगरी तरुण पिढीच्या आदर्शाचा भाग झाला आहे. म्हणूनच नेलगुंडाच्या ‘साधना विद्यालया’त मुलांना शिकवण्यास मुंबई-पुण्याचे हायटेक क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुण सातत्याने तेथे मुक्कामाला असतात. मी गेलो तेव्हा शाळेत ठाण्याचा कल्पेश झुंजारराव आणि डोंबिवलीचा विजय चांगण वर्ग घेताना भेटले. सामाजिक बांधिलकी आणि सेवेचे व्रत यांचा एका शब्दानेही उच्चार न करता ते गुण त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते.
समीक्षा आमटे 7588772861 sam.aqua18@gmail.com
– प्रमोद मुनघाटे, pramodmunghate304@gmail.com
(साधना, 30 जून 2018 वरून उद्धृत, संस्कारित, संपादित)
लेख पूर्ण वाचला आवडला . खूप…
लेख पूर्ण वाचला आवडला . खूप छान वाटले.
Great work
Great work
Comments are closed.