Home साहित्य पुस्‍तक परिचय चिमुटभर रूढीबाज आभाळ

चिमुटभर रूढीबाज आभाळ

carasole

राजन खान यांची ‘चिमुटभर रूढीबाज आभाळ’ ही कादंबरी अस्वस्थता निर्माण करते. मानवी जगण्याची एकूण व्याप्ती पाहता रूढी-परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा; किंबहुना तो तेवढाच असतो, पण मानवी मन रूढी-परंपरांना कुरवाळत राहते आणि ते मनच माणसाचे जगणे आभाळाएवढे मुश्किल करून टाकते. मानवी जगण्याचे हे सार म्हणजे ही कादंबरी.

भारतीय समाजाची जडणघडण बऱ्यावाईट परंपरांच्या, जातीपातींच्या, उच्चनीचतेच्या तथाकथित संकल्पनेच्या पोटातून होत गेली आहे आणि कळत-नकळत, त्याचे संस्कार घेत पिढ्या दर पिढ्या घडत आल्या आहेत. त्यामुळे पिढ्या दर पिढ्या प्रेम, संसार, प्रेमाचे दुश्मन वगैरे साग्रसंगीत आळवतच राहतात. तशाच अर्थाने चित्रपटापासून ते कथा-कादंबऱ्यांपर्यंत प्रेम हा विषय व्यक्त झालेला असतो. काही वेळा लोकांनी त्यांच्या आसपासही काही प्रेमकहाण्या फुलताना, विझताना पाहिलेल्या असतात – मुख्यत्वेकरून विझताना, संपतानाच ! लोकांना त्यामध्ये ‘एक प्रेमकहाणी संपली’ इतकाच विषय भासतो. प्रेमीजीव काही दिवस झुरतील अन् पुन्हा सगळे सुरळित होईल. मुलीच्या बाबतीत तर तिचे लग्न लावून दिले, की कुटुंबीयांना कर्तव्यपूर्तीचा केवढा तरी आनंद वाटतो! मात्र त्या सगळ्यात प्रेमभंगानंतर किंवा व्यक्तीने स्वत:च प्रेमात कच खाल्ल्यानंतर एखाद्या स्त्रीची मनोवस्था कशी होईल? परंपरांच्या कलेने जाणाऱ्या, प्रेम हवे असणाऱ्या पण चौकटी मोडू न पाहणाऱ्या स्त्रीची अवस्था कशी असेल? हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे राजन खान यांची ‘चिमुटभर रूढीबाज आभाळ’ ही कादंबरी. सर्वसामान्य मुलींसाठी प्रेम करताना भीती आणि लग्न झाल्यानंतरही होऊन गेलेल्या प्रेमाची हकिकत कळू नये याची भीती. कादंबरीत तर तिच्या दृष्टीने सारी भीती. आठवणी झिरझिरीत झाल्या आहेत असे वाटत असतानाच नायक परततो आणि ‘दुसऱ्या दिवशी एक वाजता भेटायला ये. नाही आलीस, तर मी दोन वाजता घरात येईन’ असे बजावून वादळासारखा निघून जातो. लेखकाने त्या एका वाक्यात तिचे लपलेले दडपण, तिची अस्वस्थता, उलघाल, उलथापालथ, भीती तरल सूक्ष्म रीत्या आणि वास्तववादी पद्धतीने टिपली आहे.

मुळात, भारतीय पालकांना अपत्यांवर मालकी हक्क वाटत राहतो आणि त्याच संस्कारांनी, मुलांनाही त्यांना पालकांनी जगात आणून त्यांच्यावर उपकार केले आहेत असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदर किंवा त्यांचा जाच सहन करणे हाही त्या उपकाराच्या परतफेडीचाच भाग वाटत राहतो. तशा परिस्थितीत पालकांना मुलांविषयी काळजी वाटणे आणि मुलांना पालकांविषयी आदर वाटणे असे जे भाव तयार होतात त्यांतील काळजी अन् आदर या शब्दांचे खरे अर्थच भिन्न होऊन जातात. ही समाजरचनाच तशी आहे अन् तितकीच नाही. बाकी अनेक प्रकारचे रंग त्यात आहेत. जातींचे, धर्माचे, लिंगभेदाचे, आर्थिकतेचे. त्यातही पुन्हा एकेक पदर उलगडत आणखी नव्या नव्या चौकटी. अशा रीती-नीतीच्या भारतीय समाजात, प्रेम करणे ही सर्वसामान्य स्त्रीसाठी केवढी अवघड, घाणेरडी अवस्था आहे ! लफडे करणे सोपे पण प्रेम करणे सोपे नाही.

कांदबरीत एके ठिकाणी ती तिच्या मन मारत जगण्याचा, कोंडवाडा झालेल्या आयुष्याचा, बदनामीच्या भीतीचा आणि बिंग फुटले तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करत असते. त्यावेळेस तिच्या लक्षात येते, की प्रेम केल्याची शिक्षा फक्त तिला मिळते. त्याचे नाव पेपरात येते, टीव्हीवर दिसते, म्हणजे त्याचे प्रेमाशिवाय सुरू असलेले आयुष्य सुरेख सुरू आहेच की ! त्यात तो पुढेही गेलेला आहे. मग कोंडवाडा तिलाच का? हा प्रश्न वाचकालाही अस्वस्थ करतो. त्या प्रश्नाचे उत्तर सामाजिक व्यवस्थेत कधी मिळेल हे सांगणे अवघडच.

कादंबरीतील मुख्य दोन पात्रांना नावे नाहीत. तिचे पात्र ती म्हणून येते अन् त्याचे पात्र तो म्हणून, अन् बाकीचेसुद्धा तिचा भाऊ, त्याची आई, बहिणी, नवरा, दीर अशाच स्वरूपात. असे उल्लेख मला विशेष चांगले वाटले, कारण ती कोणाही तिची आणि कोणाही त्याची गोष्ट आहे. अमूक तमूक समाजातच नव्हे तर एकूण भारतीय समाजात सर्व धर्मांमध्ये प्रेमाच्या कहाण्या तशाच रीतीने जातात. त्यामुळे पात्रे बिननावी आहेत, हे चांगलेच आहे. पुस्तकाचे गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी केलेले मुखपृष्ठही चांगले झाले आहे. कांदबरी वाचनीय आहे, पण संवादांच्या वा स्वगताच्या ठिकाणी कोठेच अवतरण चिन्हे नाहीत. अक्षरजुळणीतील ती गोष्ट खटकते. ती दुरूस्त झाल्यास संवाद अधिक प्रभावी वाटतील.

पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट जाणवत राहिली, समाज नियमांना त्याच्या अनुवांशिक पद्धतीने जगताना, प्रेम करणे जसे अवघड आहे तसेच केलेले प्रेम विसरणेही अवघडच. केलेल्या प्रेमाची भुते जेव्हा वर्तमानात येऊन नाचू लागतात तेव्हाही त्या भूतांसह जगणे अवघड होते. त्यालाही अर्थात कारण बेड्याघालू समाज हेच.

‘चिमूटभर रूढीबाज आभाळा’ला धुत्कारून प्रेम करता आले पाहिजे; आणि त्यासह जगताही!

प्रेम ही किती तरल भावना आहे! त्याची व्याख्या करणे तसे अवघडच शिवाय व्यक्तीसापेक्षही. पण एखाद्याविषयीची ओढ, प्रेमाची भावना व्यक्तीला सुखी, आनंदी, छान असे काहीतरी वाटू देत राहते. ते तसेच असते असेही नाही. त्यात राग, लोभ, रूसवाफुगवा वगैरे कालांतराने मिसळत जातात हेही खरे. पण प्रेम करणे हे काही सोपे काम नाही. प्रेम करण्यास आणि मग ते पुन्हा आपल्या मनाशी मान्य करण्यास व्यक्तीमध्ये हिम्मत असावी लागते. त्या पुढे जाऊन व्यक्तीने प्रेमाच्या पाठीशीच उभे राहण्याचे ठरवले असेल तर तिला सगळी जिगरच पणाला लावावी लागते.

पण काही वेळा प्रेम करूनही, हिंमत गोळा करता येत नाही. रूढीबाज जगणे इतके अंगवळणी पडलेले असते, की त्या ठरलेल्या, आखीव-रेखीव चौकटीच्या बाहेर पाऊल टाकवले जात नाही. पुन्हा पुन्हा रूढी-परंपरांच्या, नियम निकषांच्या रेषांवर व्यक्ती खेळत राहतात. एखादा नियम मोडण्यापेक्षा मन मारणे सोपे वाटते. पण ते तितकेसे सोपे असते का? मन मारताना होणाऱ्या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता; त्याचे काय करायचे? त्यांना कसे डील करायचे?

चिमुटभर रूढीबाज आभाळ
लेखक -राजन खान
अक्षर मानव प्रकाशन
किंमत – १५० रुपये

– हिनाकौसर खान-पिंजार

Last Updated On – 24th Dec 2016

About Post Author

Previous articleसुरंजन खंडाळकर – गाणारा मुलगा
Next articleधनत्रयोदशी – राष्ट्रीय आयुर्वेद दिन
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version