‘कोऱ्या कॅनव्हास’चे इंगित असे, की त्या निर्विकारी रिकामेपणात एक प्रश्नचिन्ह तरळत असते. त्यामागील प्रश्न असा, की ते रितेपण, ती पोकळी, तो अवकाश काय आहे? तो वरवर दिसतो तसा रिकामा आहे की त्यात आणखी काही आहे? तो प्रश्न चित्रकाराला विचारून कॅनव्हास अबोल होतो आणि हळूहळू, त्या अबोध रितेपणाच्या सीमा विस्तारू लागतात; स्थलकालाची, लांबीरुंदीची परिचित अशी परिमाणे बदलू लागतात. चौकटीतील पांढऱ्या रंगाची खोली वाढू लागते. कॅनव्हासचा प्रथम जाणवणारा पोत अदृश्य होत होत तेथे अभ्राच्छादित आकाश निर्माण होते.
कॅनव्हासवर पडलेला प्रकाश व अतिसूक्ष्म सावल्या, चौकटीच्या आसपास आलेले डाळीच्या आकाराएवढे फुगवटे, कॅनव्हासच्या विणीत आलेला जाड धागा किंवा कडेकडेने जाणारी एखादी मुंगी, कॅनव्हासच्या धाग्यांतील मधूनच जाणवणारे सूक्ष्म तंतू हे सर्व घटक विलक्षण आकार-अर्थ धारण करू लागतात आणि मग, मन त्या सर्वांमध्ये न गुंतता आणखी खोलावरील पायऱ्या भरभर उतरू लागते.
माणूस पाहत असलेल्या प्रत्येक वस्तूला, पदार्थाला, पदार्थांच्या समूहाला; एवढेच काय, पण आकाशाला, पाण्याला विशिष्ट आकार असतो आणि त्या आकारांमुळे त्या त्या वस्तूचे किंवा पदार्थाचे आकाररूप ज्ञान होते. तो झाला त्या आकाराचा नेहमीचा अर्थ. असंख्य आकार सभोवती सारखे दिसत असतात, परंतु माणसाला त्यांची केवळ आकार म्हणून जाणीव होत नाही. चित्रकाराला मात्र त्याच्या सभोवती असलेल्या आकारविश्वाची जाणीव सतत होत असते. ती जाणीव कधी कधी इतकी तीव्र बनते, की त्याला एकाच आकारात समाविष्ट असलेले अनेक लहान लहान आकार दिसू लागतात आणि त्या लहान आकारांतून आणखी सूक्ष्मतर आकार जाणवू लागतात. त्याला त्याच्या डोळ्यांच्या क्षमतेइतके लहान आकार दिसू शकतात आणि चित्रकार त्या सर्व आकारांकडे तटस्थतेने, केवळ आकार म्हणून पाहू शकतो.
आकाशात ढग जमू लागले, की प्रथम ढगांचे आकार, ढग सोडून उरलेल्या आकाशाचे आकार, ढगांचे क्षणाक्षणाला बदलणारे आकार; नंतर त्या ढगांतील वेगवेगळ्या रंगांचे आकार, वाऱ्याने पिंजलेल्या ढगांच्या पुंजक्यांचे आकार अशी आकारमालिका सुरू होते. रात्री आकाशात पाहिले तर ताऱ्यांच्या समूहाचे आकार, त्या ताऱ्यांना अदृश्य रेषांनी जोडून मनात तयार होणारे आकार, ताऱ्यांच्या कंपनामुळे तयार होणारे आकार… असे अनेक आकार मनात केंद्रित होत असतात. चित्रकाराला त्या सर्व आकारांचा एक विशिष्ट अर्थ साहजिकच अभिप्रेत असतो. तो अर्थ नेहमीच्या अर्थापेक्षा निराळा असतो. चित्रकार त्या आकारांच्या परस्परसंबधाला आणि ते सर्व किंवा त्यांपैकी काही आकार एकत्र येऊन बनणाऱ्या आकृतीला, त्या त्या आकाराच्या पार्श्वभूमीशी असलेल्या नात्याला; तितकेच काय तर त्यावेळी त्याच्या मनात असलेल्या अमूर्त चित्रसंदर्भात असणाऱ्या वरील आकारांच्या नात्याला विशेष महत्त्व देत असतो; आणि त्यामुळेच, त्याला अभिप्रेत असलेला अर्थ आकारांच्या रूढ अर्थापेक्षा पूर्णतः वेगळा असू शकतो.
आकाराचा अर्थ बराचसा त्याच्या संदर्भावर अवलंबून असतो. एखादा आकार त्याच्या संदर्भातून वेगळा केला किंवा त्याला एका संदर्भातून काढून दुसऱ्या संदर्भात समाविष्ट केले, तर त्या आकाराचा अर्थ लागत नाही. तशा आकाराला अमूर्त आकार म्हटले जाते आणि त्याउलट, जर तसे काही अमूर्त आकार विवक्षित पद्धतीने एकत्र आणले तर त्यांत परिचित असे अर्थपूर्ण आकार होणे शक्य असते. भिंतीवर चालणाऱ्या मुंग्या प्रथम केवळ काळे ठिपके दिसतात; परंतु ते ठिपके चालतात, म्हणून त्यांना मुंग्या म्हटले जाते. कोणत्याही वस्तूची सावली किंवा सावल्या, त्या मूळ वस्तूच्या आकाराशी साधर्म्य साधत असल्या तरी त्या सावल्यांचेच आकार जर निरखले गेले, तर ते अमूर्तच वाटतील. म्हणजे एखाद्या वस्तूची सावली फक्त पाहिली गेली तर त्या सावलीच्या आकाराचा अर्थ जाणवेलच असे नाही.
कधी कधी, दोन किंवा अधिक असे वेगवेगळे आकार एकत्र येऊन त्यांतून नवीन आकार उद्भवतो. तशा वेळेस, त्या त्या आकाराचा मूळ अर्थ नाहीसा होतो किंवा समप्रमाणात नवीन अर्थात सामावतो. आकारातील एकाचे दुसऱ्याशी असलेले प्रमाण बदलले तर चित्रामध्ये त्या आकारांना नवीन अर्थ प्राप्त होतो. जवळ असलेली वस्तू मोठी व दूरची लहान हा दृक्शास्त्राचा नियम बदलल्यास आकारांचा संदर्भ व पर्यायाने अर्थ बदलतो. एका आकारात दुसरा आकार समाविष्ट केल्याने किंवा एकाच आकाराची पुनरावृत्ती अनेकदा केल्याने त्या आकाराचा मूळ अर्थ बदलू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या चित्रात एकाऐवजी अनेक चंद्र उगवलेले पाहिले; म्हणजेच, ताऱ्यांची जागा चंद्रांनी घेतली तर चंद्रविषयक कल्पनेचा अर्थ बदलेल. म्हणजे आकाराच्या मूळ स्वरूपात कोणताही भेद केल्यास, त्याचा रूढ अर्थ बदलून त्याची गणना अमूर्तामध्ये केली जाईल.
आकार आणि अर्थ यांच्यामधील आणखी एक दुवा लक्षात येतो, तो असा: प्रत्येक आकाराचा एखादा आंतराकार किंवा विशिष्ट भाग अमूर्त असतो, पण आकार म्हणून तो स्वतंत्र असतो. कधी कधी, चित्रकाराला तो आंतराकारच जास्त जवळचा व महत्त्वाचा वाटतो. चित्रात तो भाग त्या आकाराचा अर्क ठरतो. शिवाय, त्या आंतराकारातूनच पूर्ण आकार हळुहळू दिसू लागतो आणि त्या आकाराचा रूढ अर्थ समजतो. उदाहरणार्थ, एखाद्या पानावरील डाग, मातीच्या घड्याचा फुटलेला भाग किंवा त्याला गेलेले तडे, कपाळावरील व्रण, पुस्तकाच्या पानावरील मजकुराचा आकार किंवा मजकुरामधील अवकाशाचा आकार… हे आकार स्वतंत्र असतात. म्हणजे ते ज्या पूर्ण आकारात समाविष्ट असतात त्या आकारापासून ते अगदी स्वतंत्र असतात आणि त्याच वेळी, त्यांचे मूळ आकाराशी नातेही अविभाज्य असे असते. आंतराकाराची ती निगूढता हेच त्या आकाराचे मर्म ठरेल.
वास्तविक, या विश्वात असणारे सर्व आकार हे भूमितीच्या मूलभूत आकारांतून जन्मलेले असतात आणि म्हणूनच भोवती वावरणारा प्रत्येक आकार हा वर्तुळ, चौकोन किंवा त्रिकोण ह्या मूलाकारांशी नाते सांगतो. गंमत म्हणजे त्या मूलाकारांना त्यांच्या भूमितीतील चिन्हात्मक अर्थाखेरीज दुसरा अर्थ असत नाही. म्हणजे ते मूलाकार शुद्ध व अमूर्त असे आकार आहेत आणि म्हणूनच, चित्रकार एखाद्या आकाराकडे केवळ आकार म्हणून पाहू शकतो; तो त्या आकाराच्या रूढ किंवा व्यावहारिक अर्थाला विशेष महत्त्व देत नाही.
अर्थ शब्दाला जसा घट्ट चिकटून असतो, तसे आकाराच्या बाबतीत होत नाही. अनेक आकार एकमेकांत सहज एकरूप होऊ शकतात. तसे शब्दांचे होत नाही. चेहऱ्यावर जसे डोळे तसे आकारात आकार गुंफले जातात, सामावले जातात. निराकाराची कल्पना फक्त शब्दांत मांडता येईल, परंतु निराकार आकारातून व्यक्त करणे कठीण आहे. कारण आकार नाहीसा करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी जे उरेल किंवा जे शिल्लक राहील तो पुन्हा आकाराच असेल. म्हणजे अगदी कोरा कॅनव्हास घेतला तरी त्या कॅनव्हासची लांबी, रुंदी व जाडी ही एकत्र येऊन आयताकृती एक आकार उरतोच. आकार बहुरूपी आहे. तो त्याची अनेक रूपे चित्रांमध्ये दाखवत असतो. कधी, त्याला पंख फुटतात व तो आकाशात किंवा अवकाशात उंच उंच उड्डाण करतो. कधी, तो मेणासारखा वितळतो, तर कधी, मोठी शिळा होऊन निश्चल होतो. आकाराच्या ज्वाला होतात. आकार प्रकाश होतो, तर कधी तो पूर्ण अंधार होतो. आकार पाण्यासारखा वाहतो, पतंगासारखा तरंगतो.
आकार स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे. चित्रकलेचा आकार नायक आहे. अर्थ आकाराला स्पर्श करतो, पण तो शब्दासारखा त्याच्या मानगुटीवर बसत नाही. त्यामुळे चित्रामध्ये आकाराचा वावर अगदी मोकळा असतो. आकार हा अर्थाच्या अधीन नाही. आकार हा अर्थाला सहज ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. आकार हा अर्थाच्या खांबाला बांधलेला नाही. आकाराची बांधिलकी फक्त अवकाशाशी आहे.
आकाश आणि अवकाश यांचे नाते खेळीमेळीचे आहे. वास्तविक जो आता आकार आहे, तोच दुसऱ्या संदर्भात अवकाश होतो आणि अवकाशाचा आकार होण्यासही वेळ लागत नाही. अवकाश आणि आकार हे दोन्ही फार गहन आहेत. अवकाशाच्या सीमा म्हणजेच आकार आणि आकारामधील अस्तित्व किंवा भाव म्हणजे अवकाश. आकार आणि अवकाश हे एकमेकांत पूर्णपणे सामावलेले आहेत. त्यांचे काही काळ वेगळे असणे ह्यालाच चित्र म्हणता येईल. म्हणून चित्र हा आभास आहे.
आकार आणि अवकाश अनेक संभ्रम निर्माण करत असतात- जसे, समुद्रामधील खडक की खडकांमधील समुद्र, उंच आकाशात गेलेल्या वृक्षांची पाने की पानापानांमधून ठिबकणारे आकाश, पांढऱ्या घुमटावर हजारोंच्या संख्येने विसावणारे हिरवे पक्षी की त्या हिरव्या रंगातून दिसणारे घुमटाचे पांढरे तुकडे, काळ्या डांबरी रस्त्यावर ओढलेले पांढरे पट्टे की त्या पट्ट्यांमधून दिसणारा काळा रस्ता. त्यांतील आकार कोणता आणि अवकाश कोणता? सुख आणि दुःख ही जशी एकाच वेदनेची दोन रूपे आहेत; तसेच, आकार आणि अवकाश ही एकाच सत्याची दोन नावे आहेत.
चित्रामधील आकाराची गतिशीलता ही अवकाशाच्या तटस्थपणावर अवलंबून असते. अवकाशाची खोली आकाराच्या सान्निध्यामुळे जाणवते. आकाराची घनता, तर अवकाशाचे द्रवरूप किंवा वायुरूप. अवकाश जेव्हा घन होतो तेव्हा आकाराचा पारा होतो. अवकाश जर प्रकाशमय असेल तर साहजिकच आकाराचा अंधार होतो. कधी कधी, आकाराचे हलके पीस अवकाशाच्या वाऱ्यावर अलगद तरंगत राहते. पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग, पूर्व दिशेला पसरणारा तांबूस प्रकाश, डोळ्यांतून व्यक्त होणारा प्रसन्न भाव हे मात्र आकार आणि अवकाश यांच्यामधील द्वैत दूर करतात.
ह्या सबंध विश्वाच्या सीमा काय आहेत? हे विश्व कोठपर्यंत पसरलेले आहे? ह्या प्रचंड आणि क्षणोक्षणी बदलणाऱ्या विश्वाचा परीघ किती मोठा असेल?, माणूस जर त्याची कल्पना करू शकला, विश्वाच्या सीमा जर ठरवू शकला, म्हणजे या विश्वाचा आकार कल्पू शकला तर तो महाप्रचंड असा एक आकार निर्माण होईल! पण माणसाला त्या आकाराची कल्पनासुद्धा करता येत नाही. कोट्यवधी मैल पसरलेला तो अवकाश, त्यातील अगणित आकाशगंगा, आणि त्या आकाशगंगांमधील कोट्यवधी सूर्य आणि त्यांच्याभोवती फिरणारे असंख्य ग्रह व त्यांचे उपग्रह… हा सर्व प्रचंड पसारा कशामध्ये सामावलेला आहे आणि त्या अवकाशाच्या सीमा कोठपर्यंत विस्तारलेल्या आहेत, याची कल्पना करणे अशक्य असले तरी त्याची जाणीव मात्र माणसाला होऊ शकते.
तसे पाहिले तर असीम अवकाशाच्या संदर्भात आकाराचे अस्तित्व नगण्य मानावे लागेल. तरीही मानवी देह आकाररूपात असल्यामुळे आणि त्याचा संबंध त्याच्या श्वासोच्छवासातून अंतर्बाह्य अवकाशाशी येत असल्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचे आकलन मानवी मनाला होऊ शकते. मी आणि माझ्या सभोवती असलेले जग हा एक आकार-अवकाश संदर्भ असू शकतो. म्हणजे मी हा आकार होऊन माझ्या व्यतिरिक्त इतर सर्व जग हा अवकाश होतो. परंतु मी म्हणजे माझ्यामधील अवकाश अशी कल्पना केली, तर त्या अवकाशाभोवती असलेले शरीराचे वेष्टन हा आकार होतो. अशाच तऱ्हेने आणखी पुढे जाऊन मन आणि त्याची क्रियाशक्ती यांचा विचार केल्यास, मनाच्या अवकाशात विचाररूपी आकार कसे उद्भवतात आणि विचारांच्या अवकाशातून मनाचे अस्तित्व कसे जाणवते याचे मर्म कळते.
माणसास त्याच्याभोवती असणार्या अमर्याद अवकाशाची जाणीव जशी होते, तशीच त्याला त्याच्या अंतर्मनात वसत असलेला असीम अवकाश व त्या अवकाशात होणाऱ्या अतिसूक्ष्म हालचाली यांची जाणीव कधी कधी होते. मला तर नेहमी असे वाटते, की त्याच्या अंतर्मनातील अवकाशात बाह्य अवकाशविश्वातील सर्व आकार व त्यांचे प्रकार तर आहेतच; परंतु त्याशिवाय, त्याने कधीही न पाहिलेले, कधीही न अनुभवलेले, ज्यांची तो एरवी कल्पनाही करू शकत नाही असे आणखी अतर्क्य, अनिर्बंध, गूढ आकार त्याच्या अंतर्मनात वसत असतात. चित्रकार जेव्हा चित्रावकाशाशी तद्रूप होतो तेव्हा त्याला अंतर्मनातील त्या अफाट विश्वाचा प्रत्यय येतो.
कोणत्याही आकाराची रचना एका विशिष्ट तऱ्हेने, म्हणजे आकाराचे आंतराकार एका विवक्षित पद्धतीने एकमेकांत बांधून, सांधून किंवा रचून तयार होते. ढग, वृक्ष, माणूस, नदी, समुद्र व इतर नानाविध वस्तू अशा अनेक आकार-प्रकारांची रचना, निरनिराळ्या पद्धतीने त्यांचे आंतराकार एकत्र येऊन होत असते. परंतु अवकाशाचे तसे नाही. कारण अवकाशाची रचना ही पूर्णपणे अमूर्त स्वरूपाची असल्यामुळे त्या रचनेची कल्पना चटकन येत नाही, पण जाणीव मात्र होते. अवकाशकण अतिसूक्ष्म आणि एकमेकांभोवती फिरणारे असतात. प्रत्येक कण स्वतंत्र व प्रत्येक कणाची हालचाल स्वतंत्र असल्यामुळे अवकाशाची रचना एखाद्या आकाराच्या रचनेप्रमाणे सीमित असत नाही. म्हणून अमूर्त अवकाश आणि मूर्त आकार असे त्यांचे एक नाते तयार होते. मानवाला श्वासोच्छवास करण्यासाठी जशी मोकळी जागा लागते, तशीच आकारालाही चित्रावकाशात जागा लागते आणि म्हणूनच, एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आकार एकत्र आले तर त्यांची गर्दी होऊन ते चित्र गुदमरल्यासारखे वाटेल. त्याउलट, जर अवकाशाच्या संदर्भात आकार एकुलता एक व लहान असेल तर बराचसा अवकाश उगाचच मोकळा राहिल्यासारखा वाटेल, म्हणजे त्या जागेत आणखी काही तरी असावेसे वाटू लागेल. त्याचाच अर्थ असा, की चित्रामध्ये आकार आणि अवकाश यांचा समतोल साधला गेला पाहिजे. तसा समतोल अनेक तर्हांनी साधता येतो.
आकाराचे क्षेत्र, त्याचे रंगानुसार वजन, आकाराच्या कडा, आकाराची दिशा, त्याचा रंग, चित्रार्थ आणि त्याचे इतर आकारांबरोबर असलेले नाते ह्या सर्व अंगांचा विचार करूनच एक किंवा अनेक आकार आणि चित्रातील अवकाश यांचा समतोल साधता येतो. ते सर्व करत असताना अवकाशाचा रंग, त्यातील विविध छटा यांचाही विचार करावा लागतो. कोणत्याही चित्रावकाशाचा मध्य आणि त्याची बाहेरील सीमा ह्या दोहोंमध्ये आकाराचे भ्रमण होऊ शकते. आकार जेव्हा मध्याजवळ असतो तेव्हा त्याचे महत्त्व साहजिकच वाढते, कारण त्याला ऐसपैस असा अवकाश आजूबाजूला मिळतो. आकार जसजसा चित्राच्या कडेजवळ येतो तसतशी त्याची भूमिका बदलू लागते.
– (प्रभाकर बरवे लिखित व ‘मौज’ प्रकाशित ‘कोरा कॅनव्हास’ पुस्तकातून उद्धृत)