Home लक्षणीय कृतीचे आकृतीत रूपांतर!

कृतीचे आकृतीत रूपांतर!

मी त्या मुलाने चौकटीची घडी घालून दिलेला तो कागद उघडला. त्यावर चारच ओळी लिहिल्या होत्या- “बाई, तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही जशा सुंदर आहात; तसेच, तुमचे मनही सुंदर आहे. मला मोठेपणी तुमच्यासारखे व्हायचे आहे…” माझे मन त्याच्या त्या बोलांनी काही काळ भूतकाळात जाऊन बसले… कोण होते मी आणि काय झाले मी? हा प्रश्न मनात आला. शाळेचा तो विद्यार्थी मला पुन्हा एकदा माझ्या शाळेच्या दिवसांत घेऊन गेला. मला विद्यार्थिदशेतील फारसे काही आता आठवत नाही-अमूक एका वर्गातील मुले हुशार आणि अमूक वर्गातील मुले ‘ढ’ इतकाच फरक काय तो त्यावेळी माहीत असायचा, कळायचा. ती एक प्रकारची दरीच! ते जमीन-अस्मान वगैरे काय म्हणतात, तसले काहीसे. खाकी दप्तर, शाई संपत येईपर्यंत वापरता येणारा पेन, मागूनपुढून तासलेली टोकदार पेन्सील. केजी, सिनियर केजीच्या बाकी आठवणी तर कधीच पुसल्या गेल्या आहेत! त्या काळचे फोटो वगैरे कोणी काढून ठेवलेले नाहीत. कारण सहज हाताशी कॅमेरे नव्हते आणि त्यामुळे ‘सेल्फीमोह’देखील नव्हता. काही चित्रे मात्र मनःपटलावर अगदी पक्की ठाण मांडून बसली आहेत. ती पुसणे कठीण. नकळत्या वयातून कळत्या वयात शिरताना आलेले ते शहाणपण, ते कसे अधोरेखित करणार? पण, शाळेने माया लावली. शिस्त लावली. आई-वडील आणि कुटुंब यानंतर दिसते ती शाळाच!

माझे पुन्हा शाळेत वारंवार येणेजाणे होऊ लागलेले आहे ते मी पालकशिक्षक संघाच्या सहसचिवपदी असल्याने. मी शाळेत जाताना प्रत्येक वेळी आठवण्याचा प्रयत्न करते- मला माया नेमक्या कोणत्या वर्गाने अधिक दिली? पण, नाही सापडत. काही वेळा तर मी वर्गा वर्गात जाऊन बेंच ‘चेक’ करते. कर्कटकने कोरलेले काही सापडेल या आशेने पुढे सरकते. स्वतः धुळीचा कण होऊन त्या कोरलेल्या जागेत जाऊन बसावेसे वाटते. तेथे शोधते मी स्वतःला. मी माझे आजचे अस्तित्व नेमके कशामुळे सिद्ध झाले याचा शोध घेते. तेव्हा आठवते, भोजनेसरांची वेताची छडी. त्या छडीच्या माराचा सपापणारा आवाज. त्यामागून येणारा अस्पष्ट हुंदका आणि थोपवण्याचाही आटोकाट प्रयत्न करून बाहेर येणारा अश्रूंचा गलका. वर्गातील तो वावरही नजरेआड करता येत नाही. तेव्हाची गणितातील बेरीज, वजाबाकी आणि भूमितीतील काटकोन-त्रिकोण तितके जमले नाहीत; पण आयुष्याची बेरीज-वजाबाकी मात्र नीट जमली. जगण्यातील काटकोन-त्रिकोण छान जोडले गेले. अगदी मापात… सर्व विद्यार्थ्यांचे पुस्तकाच्या अभ्यासापेक्षा जगण्यातील अनुभवाचे दालन अधिक समृद्ध होते असे म्हणण्यास हरकत नाही.

बुद्धीचे मापदंड सारखे असतात हे कधी पटले नाही. बुद्धी वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त होते. बुद्धीसंबंधित एक किस्सा आठवतो. माझी निवड खारच्या ‘अनुयोग शिक्षण संस्थे’च्या ‘विरसा’ विभागातर्फे वाङ्मय विभागाच्या अध्यक्षपदी झाली होती. मला त्या अंतर्गत होणाऱ्या साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काम करण्याची संधी लाभली. अनुयोग विद्यालय म्हणजे कलेचे, संस्कृतीचे आगरच म्हणा! आजुबाजूला झोपडवस्ती आहे. शाळेत एक प्रकारचे मांगल्य अनुभवण्यास मिळते. जणू त्या शाळेला सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे. माझा ‘विरसा’ उपक्रमाआधीदेखील त्या शाळेशी संपर्क होता. मी त्या शाळेत प्रमुख पाहुणी किंवा वक्ता म्हणून गेले होते. त्यामुळे काही विद्यार्थी ओळखीचे आणि सुहृद झाले आहेत. एकदा सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरता काव्यवाचनाचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम उत्तम झाला. मुलांची समज पाहून आश्चर्य वाटले. त्यात काही टारगट मुलेही होती. शिक्षकांनी त्यांना हेरून पुढील बाकांवर बसवले होते. त्यामुळे वर्गात टाईमपास म्हणून बेंच वाजवणारी मुले काही कवितांना ‘तबल्या’चा ताल जोडत होती. त्यातील एक मुलगा तर कंपासपेटी विशिष्ट पद्धतीने वाजवत होता. त्याचे कौतुक वाटले.

पुढे, तोच टारगट मुलगा माझा लाडका झाला. अभ्यासात साधारण बुद्धीचा; आणि त्याचा अभ्यासाशी काही संबंध नसावा असे वाटावे असा. पण, मला त्याचा आगाऊपणा हा ‘स्मार्टनेस’ वाटू लागला. तो टवाळ दुसऱ्यांसाठी असला तरी मला त्याच्यात स्पार्क दिसत असे. त्याने कार्यक्रम संपल्यावर माझ्यासोबत फोटोला उभे राहणे, पाया पडणे हे नित्याचे झाले होते. मात्र, एकदा त्याने चक्क रडवले. निमित्त होते विंदांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे. त्याने त्या कार्यक्रमात हट्टाने त्याला त्याची कविता ‘बोलायची आहे’ असे सांगितले. त्याने स्वतः ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही’ या गाण्याच्या चालीवर लिहिलेल्या आईविषयीच्या भावना कवितेतून सादर केल्या. माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आले! कोठे त्याचा तो टवाळपणा आणि कोठे आताचा समंजसपणा! तो मोठा होत होता. कार्यक्रम संपल्यावर त्याला म्हटले, “खूप छान लिहिलीस कविता. असेच लिहीत राहा. खूप वाचत जा”. मी तसे बोलून निघाले. तो धावत माझ्यामागे आला. एक कागद हाती देऊन धूम पळाला. क्षणभर कळलेच नाही की काय हे! तो चौकटीतील कागद उघडला. त्यावर लिहिले होते. “बाई, तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही जशा सुंदर आहात तसेच तुमचे मनही सुंदर आहे. मला मोठेपणी तुमच्यासारखे व्हायचे आहे.” काय स्नेहबंध आहे माझा त्याच्याशी? काय केले होते मी त्याच्यासाठी? पण आपुलकीचे एक नाते निर्माण झाले होते.

_Kruti_Aakruti_2.jpgमला पुन्हा एकदा त्याच अनुयोग शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणी म्हणून जाण्याचा योग आला. स्वागत ‘एक दो, एक दो, एक – दो- तीन’ अशा ठेक्यावर टाळ्या वाजवून धमाल झाले. कार्यक्रमाची रंगत वाढवणारे कथाकथन, काव्यवाचन, अभिनय-नृत्य-गायन हे सारे म्हणजे पर्वणीच! त्या कार्यक्रमात राहून राहून समोर खुर्चीत बसलेल्या एका मुलाचे अप्रूप वाटत होते. तो इतरांप्रमाणे खाली बसला नव्हता; पण चुळबुळ मात्र खाली बसलेल्या मुलांइतकीच करत होता. गाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, तसा तो गोगलगाय बनला. त्याने गाणे म्हटले आणि मी थक्क! सुंदर आवाज, हरखून टाकणारे माधुर्य, सफेद कुर्ता आणि पायजमा घातलेला. गाणे संपताच, शिक्षकांनी त्याची ओळख करून दिली. त्याचे नाव केतन पांचाळ. तो स्मरणात राहिला. तो अपंग आहे ते त्या कुर्ता पायजम्यात कळलेच नाही. त्याला जन्मतः साठ टक्के अपंगत्व आहे. मी कार्यक्रमानंतर त्याला भेटले. तो लाजरा-बुजरा वाटला. नंतर तो सांगू लागला, की अपंगत्वामुळे कोणतीच शाळा त्याला प्रवेश देत नव्हती. पण, अनुयोग शाळेने त्याला नुसता प्रवेश दिला नाही. तर त्याला प्रोत्साहन दिले, संधी दिली, मार्गदर्शन केले. शिक्षकांनी त्याला तो अपंग नाही तर सक्षम असल्याची जाणीव करून दिली होती.

ती जाणीवच किती महत्त्वाची असते! शाळेतील शिक्षक मानवता टिकवून असतील तर कंबरेखालचेच काय कोठलेही अपंगत्व असो ते जगण्याआड येऊ शकत नाही! माणसाने जगण्याच्या जाणिवा प्रगल्भ ठेवल्या तर त्याची एक कृतीही आकृतीत बदलून जाते. शिक्षक, विद्यार्थी यांचे संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. पूर्वी शिक्षकांना गुरू मानले जाई. पण, आता शिक्षकी पेशाचे शुल्क मिळते, म्हणून त्याकडे केवळ ‘जॉब’ म्हणूनच पाहिले जाते. शिक्षकांना जितका पोर्शन तितकेच पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना देणे आणि अतिरिक्त सारा वेळ व बुद्धी खर्ची न घालणे धकाधकीच्या जीवनात रास्त वाटते.

माझ्या लहानपणी शाळेतील शिक्षकांचा धाक वाटे. अभ्यास पूर्ण करून घेण्याकडे कल असे. उगाच, बाबांना शाळेत बोलावले तर नालस्ती होईल अशी भीती वाटे. मी अभ्यास बेंचखाली वही धरून पूर्ण केल्याचे आठवते. ते शिक्षक खूप कळकळीने शिकवायचे. पण मला शिकता आले नाही. खडू फेकून मारणारे शिक्षक मारकुटे वाटत. पण, त्याच शिक्षकांना गुरुपौर्णिमेला वाडीतील गुलाबाचे फूल नेऊन देण्यात कोण आनंद असायचा!… तो स्नेहबंध वेगळाच असे. राग-लोभालाही प्रेमाचे अस्तर असे… त्या सगळ्याला ‘आर्टिफिशियल लुक’ आलाय का? माझे वेळेचे गणित चुकत आहे, की जगण्याचे काटे स्थिर नाहीत? कृतीचे रूपांतर आकृतीत करणाऱ्या शिक्षकांची वानवा जाणवते. आता उरल्या आहेत त्या फक्त कृती…

– डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे

About Post Author

3 COMMENTS

  1. अप्रतिम, सुंदर फारच छान लेख…
    अप्रतिम, सुंदर फारच छान लेख आहे

Comments are closed.

Exit mobile version