Home आरोग्य बालकल्याण कर्णबधिरांसाठी – व्‍हॉईस आफ व्‍हॉईसलेस

कर्णबधिरांसाठी – व्‍हॉईस आफ व्‍हॉईसलेस

5
carasole

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावाच्या योगेश व जयप्रदा भांगे या दाम्पत्याने त्यांच्या कर्णबधिर मुलाला बोलायला तर शिकवलेच; पण इतर कर्णबधिर मुलांना व त्यांच्या पालकांना मदत करून नवी दिशा दाखवली! ‘कानानं बहिरा मुका परी नाही…’ ही जाहिरात नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर लागायची. कानाने बहिरे असलेले मुलही बोलू शकते, अशा अर्थाचे ते गाणे. कानाने एकू न येणाऱ्या मुलांना बोलता येतच नाही, असा समज अजून रूढ आहे. ‘स्पीच थेरपी’बद्दल बोलले बरेच जात असले तरी ती थेरपी सर्वसामान्यापर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे पालक त्यांचे मुल बोलावे यासाठी कुठलेच प्रयत्न न करता केवळ उसासे सोडताना दिसतात.

योगेश भांगे कर्णबधिर मुलांसाठी ‘व्हाईस ऑफ व्हाईसलेस’ ही संस्था चालवतात. ऐकू न येणारी बहुसंख्य  मुले बोलू शकत नाहीत, कारण त्यांच्या कानावर शब्दच पडत नाहीत! त्यांचे स्वरयंत्र व्यवस्थित व कार्यक्षम असते. तशी मुले हातवारे, खाणा-खुणांच्या आधारे इतरांशी संवाद साधत असतात. तशी ‘साइन लँग्वेज’देखील आहे. परंतु ऐकू न येणारी मुले एक-दीड वर्षांची असताना त्यांचे व्यंग ओळखता आले व त्यावेळी त्यांना बोलण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले तर बहिरी मुलेही चांगली बोलू शकतात. हे सिद्ध करून दाखवले आहे योगेश भांगे यांनी.

कर्णबधिर मुलाला बोलता यावे, याकरता करण्यात येणाऱ्या ‘काँक्लिअर इम्प्लांट’सारख्या उपाययोजना खर्चिक असतात. गरजू लोकांना बऱ्याच वेळा पैशाअभावी त्यांचा लाभ घेता येत नाही. साहजिकच; ती मुले ‘मुकी’ म्हणून हिणवली जातात. मात्र योगेश भांगे यांनी त्यांच्या कर्णबधिर मुलाला बोलते तर केलेच पण त्या निमित्ताने त्या संबंधात अभ्यास करून, कार्य करून जिल्ह्यामधील पंचावन्न कर्णबधिर मुलांना शोधून काढले. भांगे त्या मुलांना स्पीच थेरपीद्वारे बोलण्याचे धडे देत आहेत.

योगेश भांगे सांगतात, ”आमच्या मुलाचा, प्रसूनचा जन्म 2000 साली झाला. तो दीड-दोन वर्षाचा होईपर्यंत प्रसूनला ऐकू येत नसल्याचे आमच्या लक्षात आले नव्हते. आम्हाला प्रसून आवाजाला प्रतिसाद का देत नाही, याची काळजी वाटू लागली. वर्षभरानंतर मुले आई, बाबा, दादा असे सोपे शब्द उच्चारू लागतात. प्रसून ते शब्दही बोलत नव्हता. त्यामुळे प्रसूनला तपासणीसाठी पुण्याला घेऊन गेलो. तेथे त्याची ‘बेरा टेस्ट’ झाली नि आमची भीती खरी ठरली! प्रसूनला ऐकू येत नव्हते. तो बहिरा होता.”

बहिरी व्यक्ती मुकीही असते असे म्हटले जाते. ती शारिरीक असक्षम आहे असा समज असतो.  ते खरेच असावे असे योगेश व त्यांच्या पत्नी जयप्रदा यांनाही वाटू लागले. प्रसून मुका होणार तर मग त्याच्या शिक्षणाचे, सामाजिक व्यवहार-उदरनिर्वाहाचे काय? या प्रश्नांनी ते हतबल झाले. प्रसून बोलावा यासाठी अनेकांनी अनेक उपाय सांगितले. कोणी सांगायचे त्याला पोपटाचा उष्टा पेरू खायला द्या तर कोणी म्हणायचे तबला-पखवाजसाठी मळलेल्या कणकेची चपाती त्याला खाऊ घाला. गावातील लोक अंधश्रद्धाळू असल्याने व्रतवैकल्ये, नवसाचे उपायही सांगून झाले. तज्ज्ञ म्हणवून घेणारे डॉक्टरही, चार-पाच वर्षांनी प्रसून बोलेल असे सांगत होते. भांगे पतिपत्नींना काय करावे ते सुचत नव्हते. मार्गदर्शन करणारेही कोणी नव्हते. त्यातच आशेचा किरण दिसला. पुण्यातील ऑडिओलॉजिस्ट अरुणा सांगेकर यांनी त्यांना प्रभात रोडवरील अलका हुदलीकर यांचा पत्ता दिला.

हुदलीकरांकडे कानाने ऐकू न येणारी मुले येत होती, पण ती बोलू शकत होती. योगेश व जयप्रदाच्या मनावरचा ताण थोडा हलका झाला. भारतात दर हजारी सात बालके कर्णबधिर जन्माला येत असल्याचे हुदलीकरांनी योगेशला सांगितले. त्यांनी भांगे दांपत्याने रडत बसण्यापेक्षा प्रयत्न केले तर त्‍यांचा मुलगा बोलू शकेल असा विश्वास दिला. त्यांनी योगेश व जयप्रदा यांना स्पीच थेरपीचे धडे दिले. अरुणा सांगेकर यांनी श्रवणयंत्राबाबत मार्गदर्शन केले आणि योगेश व जयप्रदा यांच्या प्रयत्नांना अकरा महिन्यांनी यश आले. प्रसून आवाजाला, सूचनेला प्रतिसाद देऊ लागला होता.

प्रसून एकदा खेळता खेळता पडला आणि त्याच्या तोंडून ‘आई’ हा शब्द बाहेर पडला! तेव्हा तर आमच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. आम्हाला त्याच्या ‘आई’ बोलण्याने उमेद मिळाली. आम्ही उत्साहाने कामास सुरूवात केली. तो 2004-05 पासून व्यवस्थित बोलू लागला. प्रसून आठवीत आहे. इतर मुलांसारखीच त्याची मस्ती, बोलणे सुरू असते. त्याला पाहून त्यांचे श्रम, पैसा सार्थकी लागल्याचे समाधान मिळत असल्याचे, योगेश भांगे सांगतात.

ते म्हणतात, “आम्ही ‘व्हाईस ऑफ व्हाईसलेस’ची स्थापना 2009 मध्ये केली. तरी आमचे प्रत्यक्ष काम 2005 पासूनच सुरू झाले. गावातील बायका ‘तुमचा मुलगा बोलू कसा लागला’ अशा जयप्रदाकडे चौकशी करायच्या. आम्ही विचार केला, ”आमच्याकडे दोन पैसे अधिक होते म्हणून आम्ही पुणे गाठू शकलो. गरीब मोलमजुरी करून जगणाऱ्यांचे काय? पैसा नाही म्हणून त्यांची मुले बोलणारच नाहीत की काय? हा विचार आम्हाला स्वस्थ बसू देईना. शेवटी आमच्या गावामधील, गावाजवळील बधिर मुलांना शोधण्याचे काम सुरू केले. त्यांच्या पालकांना स्पीच थेरपीचे धडे दिले व त्यांच्या मुलांना शिकवण्यास सुरूवात केली.”

भांगे दांपत्य त्यासोबत कर्णबधिरांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती पालकांना देणे, समाजातील दानशूरांच्या मदतीने गरजू बालकांना श्रवणयंत्रे पुरवणे असेही काम करू लागले.

काही वर्षांपासून योगेश यांना त्या कामी मुंबईच्या ‘कोरो’ संस्थेची मदत मिळत आहे. योगेश त्यांच्या कामाला ‘कोरो’मुळे वेगळी दिशा मिळाल्याचे नमूद करतात. “कर्णबधिर मुलांना ऐकू येत नसल्याचे अगदी कमी वयात समजले तर त्यांना बोलते करून, त्यांच्या शिक्षणाचा व समाजातील पुनर्वसनाचा प्रश्न सुटू शकतो हे त्या संघटनेमुळे जाणवले आणि आम्ही त्याच कामाला लागलो.” योगेश सांगतात.

अपंगत्वाचे सहा प्रकार मानले जातात. त्यांपैकी हा एकच प्रकार असा आहे, की ज्याचे निदान लवकर होत नाही. कारण पालकांना त्यांच्या मुलाला ऐकू येत नाही हे लवकर कळतच नाही. नवजात बालकांच्या कानाची तपासणी लवकर केली गेली व कर्णबधिर बालकांना श्रवणयंत्रे लाभली तर ती बालके हमखास बोलू शकतील! ते काम विशेषतः गरीब वर्गासाठी सरकारी पातळीवर हाती घेतले जावे, यासाठी योगेश प्रयत्न करत आहेत.

सरकारची या कामी मदत मिळावी यासाठी योगेश भांगे यांनी सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू केले. पहिले सर्वेक्षण केले ते जिल्हा परिषदेतील आरोग्य यंत्रणेचे. त्याअंतर्गत त्यांनी सर्व डॉक्टरांना एकवीस प्रश्न विचारले. मुकेपणा म्हणजे नेमके काय? त्यावर काय उपाययोजना केली जाते? कोणती तपासणी करणे आवश्यक असते? खर्च काय असतो वगैरे. या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती त्यांच्यासमोर आली. एकोणपन्नास टक्के डॉक्टरांना मुकेपणाबद्दल काहीच माहिती नव्हती. एकावन्न टक्के डॉक्टरांनी समाधानकारक उत्तरे दिली. पण त्यांपैकी केवळ दोन टक्के डॉक्टरांना मुकेपणाचे निदान कसे केले जाते, उपाययोजना कोणत्या कराव्यात, त्यासाठीचा खर्च यासंदर्भात पूर्ण माहिती होती.

त्यांनी पुढचे सर्वेक्षण केले ते पंढरपूर तालुक्यात. तेथील कर्णबधिर मुलांच्या पालकांना पंचावन्न प्रश्न विचारण्यात आले. मुलांची कोणती तपासणी केली? फायदा झाला का? शासनसुविधांबाबत माहिती आहे का? या सर्वेक्षणातही गंभीर माहिती त्यांच्यासमोर आली. पालकांना त्यांचे मूल मुकेबहिरे आहे, हे मान्यच नसायचे. ते पाच वर्षांपर्यंत बोलू लागेल, असाच सर्वांचा भरवसा असायचा. पुढील तपासणी, शासनसुविधा याबाबत तर ते पूर्णच अनभिज्ञ. तिसरे सर्वेक्षण केले ते अंगणवाडी शिक्षिकांमध्ये. त्यांनाही त्याच स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले. ”तुमच्याकडे येणारे मुल मुकेबहिरे आहे हे तुम्हाला कसे कळते? ते शोधण्याची काही पद्धत, यंत्रणा त्यांच्याकडे आहे का?” त्याेवर उत्तर सर्वत्र ‘नाही’, असेच मिळाले.

पुढे जिल्हा परिषदेतही सर्व विभाग-खात्यांमध्ये तसेच सर्वेक्षण झाले. पण हाती काही लागले नाही. सगळ्या खात्यांमध्ये उल्हास होता. एकमेकांकडे बोटे दाखवण्यापलीकडे कोणी काही करत नव्हते. योगेश यांनी भारतात, जगात बधिरपणाविषयी काय माहिती उपलब्ध आहे? संशोधन कसे केले गेले आहे ते अभ्यासले. त्यातून त्यांच्या लक्षात आले, की मुले दोन वर्षांच्या आत अडीच हजारापर्यंत शब्द शिकतात. असे असताना महाराष्ट्रायत मुले सहा वर्ष झाल्यानंतर त्याच्यासाठी राबवले जाणारे शासन धोरण काय कामाचे, योगेश प्रश्न उपस्थित करतात. मुलाची भाषा पाच वर्षांच्या आत विकसित होते. त्यामुळे नवजात बालकांमधून कर्णबधिर मुले शोधून काढण्याची मोहीम व्यापक स्तरावर राबवण्याचे काम सरकारच करू शकते, असेही ते नमूद करतात.

योगेश यांनी केलेले सर्वेक्षण जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसमोर ठेवले. आरोग्य खात्यामार्फत सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. त्यात अंगणवाडी कार्यकर्तीने तिच्या केंद्रात येणाऱ्या मुलांची ताट-वाटी चाचणी घ्यायचे ठरले. त्या चाचणी संदर्भात जिल्ह्याच्या सोळा विभागांतील चार हजार दोनशेअठ्ठ्याऐंशी अंगणवाडी कार्यकर्तींना प्रशिक्षण देण्यात आले. परिणामी सोलापूर जिल्ह्यात एकोणनव्वद मुले कर्णबधिर असल्याचे लक्षात आले. या मुलांना श्रवणयंत्रे देऊन स्पीच थेरपीचे धडे देण्याचे काम सुरू आहे. ती मुले 2018-19 पर्यंत म्हणजेच ती तीन ते चार वर्षांची होईपर्यंत बोलू लागतील, असा विश्वास योगेश यांना आहे.

विशेष म्हणजे, त्या मुलांना स्पीच थेरपीचे धडे देण्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक आहे. याबाबत योगेश सांगतात, की “आम्ही ज्या कर्णबधिर मुलांच्या पालकांना शिकवले आहे. त्यांनाच आम्ही मदतीला घेतले आहे. ते पालक नव्या पालकांना व त्यांच्या मुलांना शिकवतील. मग नवे पालकही आमच्यासोबत आमच्या कामात सहभागी होतील. आम्ही ही एक साखळी तयार केली आहे. ती पुढेही वाढत जावी व त्या अनुषंगाने अधिकाधिक कर्णबधिर मुलांना बोलते करण्यात आम्हाला यश यावे, ही अपेक्षा आहे.”

योगेश ‘व्हाईस ऑफ व्हाईसलेस’ ही संस्था आणखी पाच वर्षांनी बंद करणार असल्याचे सांगतात. त्यांचा आग्रह आहे, की ”या संस्थेमार्फत सुरू असणारे काम सरकारने करावे. आम्ही संस्थेच्या माध्यमातून कोणतेही दुकान थाटू इच्छित नाही. केवळ कोणतेही बाळ मुके म्हणून हिणवले जाऊ नये, इतरांसारखे त्यानेही हसतखेळत-बोलत जगावे, असे आम्हाला वाटते. त्यासाठी राज्य सरकारने हे प्रोजेक्ट राबवावे, याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत.

– अर्चना राणे

About Post Author

Previous articleमराठीतील ‘साडे’ शब्दांची यादी
Next articleसोलापूरचे पक्षिवैभव
अर्चना राणे यांनी 'दैनिक प्रहार'मध्‍ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यांनी 'लोकमत' वृत्तपत्रात शैक्षणिक तसेच साहित्य आणि सांस्कृतिक बीटसंदर्भात काम केले. राणे यांनी पर्यावरण बीटवर काम करत असताना मुंबई, ठाणे, रायगड येथील खाड्यांची स्थिती आणि तेथील जैवविविधतेवर आधारित 'बाराखाडी' ही वृत्तमालिका लिहिली होती. त्‍यांना त्‍याकरता 2013 मध्ये 'चौथा स्तंभ' पुरस्कार देण्‍यात आला. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या 'नॉलेज एक्सप्लोरर' या शैक्षणिक मासिकाच्‍या कमात त्‍यांचा सहभाग होता. याशिवाय पुण्यातील प्रबोधन माध्यम या न्यूज एजन्सीसाठीही त्‍या कार्यरत होत्या. पर्यावरण बीटवरील उत्कृष्ट कामगिरीकरता 'दिना बामा पाटील प्रतिष्ठान'चा तर शैक्षणिक बीटवरील उत्कृष्ट कामगिरी करता 'सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट'मार्फत 2012 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला होता. त्‍यांना बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संसदतर्फेही शैक्षणिक बीटवरील स्पेशल स्टोरीजसाठी 2010 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्‍यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले 'झाडे लावूया' हे गोष्टीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9820847339

5 COMMENTS

  1. फारच छान कार्य आहे।आपण असेच
    फारच छान कार्य आहे. आपण असेच पुढे जा.

  2. दैदिप्यमान कार्य अभिवादन
    दैदिप्यमान कार्य. अभिवादन.

Comments are closed.

Exit mobile version