आसारामबापू यांनी नागपूर व नवी मुंबई या ठिकाणी पाण्याची उधळपट्टी केल्यामुळे टीकेची झोड उठली व ती रास्तच आहे. होळीचे निमित्त करून सार्वजनिक ठिकाणी या तर्हेचे प्रदर्शन करत लोकप्रियतेचा दिमाख दाखवणे हे शक्तिप्रदर्शनच होय आणि भक्तीच्या व्यवहारात शक्ती संभवत नाही.
आसारामबापूंच्या या दुष्कृत्याची वर्णने करताना व त्यांचा समाचार घेताना टीव्ही वाहिन्यांमध्ये अहमहमिका लागली होती. त्या बिचार्या (!) दरदिवशी काही तरी सनसनाटी शोधत असतात. त्याप्रमाणे त्या दिवशी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान, वेगवेगळ्या शीर्षकाखाली घडणार्या चर्चांमध्ये समाजातील मान्यवर पुरुष स्त्रिया सामील झाल्या. स्त्रियांचे प्रमाण त्यामध्ये कमी जाणवले. चर्चांमध्ये पहिल्या दहा वाक्यांनंतर आपोआप खंड तयार होई, कारण दुष्कृत्याचे वर्णन हे कोळसा उगाळल्यासारखे होणार! त्यामध्ये सर्वात प्रभावी वाटले ते जितेंद्र आव्हाड. त्यांनी आसारामबापूंच्या या लीलांविरुद्ध आवाज उठवण्यात कमी पडलो याबद्दल माफी मागतो असे म्हटले व कार्यक्रम संपताच बापूंविरुद्ध कारवाई करण्याचे साकडे गृहमंत्र्यांना घालतो असेही सांगितले. आव्हाडांचा तो प्रांजळपणा कौतुकास्पद वाटला. ते त्यांच्या आश्वासनाचा पाठपुरावा करतील आणि संबंधित वाहिनी (एबीपी माझा) त्याचा पाठपुरावा ठेवतील अशी अपेक्षा आहे.
मुद्दा वेगळा आहे, की दुष्काळात (वा एरवीही) पाण्याची नासाडी थांबवणे जेवढे महत्त्वाचे तेवढे पाणी निर्माण करणे व पाण्याचे वाटप नियोजनपूर्वक करणे महत्त्वाचे होय. किंबहुना तातडीच्या काळात दुसर्या बाबीस अधिकच महत्त्व प्राप्त होते. सगळे पर्यावरणवादी व जलसंवर्धक हे मुद्दे वारंवार व ठासून सांगत असतात. माधवराव चितळे यांच्यापासून विश्वंभर चौधरी यांच्यापर्यंतच्या व्यक्तींनी वेळोवेळी किंवा वारंवार उच्चारलेल्या या प्रकारच्या वचनांचा अतिरेकदेखील आसारामबापूंच्या जलवर्षावाइतकाच फुकाचा व अन्याय्य वाटतो.
महाराष्ट्रातील काही खेड्यांनी त्यांचा जलसाठा गेल्या चाळीस वर्षांत वाढवल्याची उदाहरणे आहेत. विजय बोराडे, अण्णा हजारे यांच्यापासून ती नामावली सुरू होते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत सुरेश खानापूरकर यांचे शिरपूर पॅटर्न एकदम प्रकाशात आले आहे, त्यांनी तेथील सूतगिरणीच्या अर्थसाहाय्याने वीस खेडी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केली. अभिजित घोरपडे पासूनच्या चिकित्सक अभ्यासकांनी त्यांचे गुणवर्णन केले आहे. खानापूरकर भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. ते मराठी विज्ञान परिषदेच्या गेल्या बारामती विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष होते.
झी चोवीस तास या वाहिनीला उदय निरगुडकर यांनी गेल्या वर्षभरात विधायक व समाजसंस्कृतीला धार्जिणे वळण दिले आहे. ते स्वत: बर्याच चर्चा ‘रोखठोक’ तरीही पॉझिटिव्ह पद्धतीने व माहितीपूर्ण रीत्या घडवून आणतात. त्यांच्या ‘हार्ट टू हार्ट’ या मुलाखती तर मुद्दाम पाहव्या अशा असतात. त्यांनी या आठवड्यात खानापूरकर यांची मुलाखत घेतली आहे. तिचे ‘प्रोमोज’ बातम्यांमध्ये दाखवले गेले. ते ऐकूनच थक्क व्हायला होते. जालन्याची कुंडलिका नदी एका वर्षात पाण्याने भरून टाकण्याचे आणि सांगली जिल्हा पुढच्या वर्षी पाणी निर्यात करू लागेल अशा शक्यता नि:शंक शब्दांमध्ये त्यांच्याकडून व्यक्त झाल्या. दोन्हीचा खर्च वीस कोटी रुपयांच्या आसपास, फक्त!
आसारामबापूंच्या पाण्याच्या विध्वंसाच्या काळातच खानापूरकरांची ही वचने प्रकट झाली. त्यांच्या वचनांवर का बरे हे तज्ज्ञ अहमहमिकेने कौतुक व्यक्त करत तुटून पडले नाहीत? की त्यांनी फक्त भाष्य करायचे? आणि कृतिकार्यक्रमाकडे दुर्लक्ष करायचे? टेलिव्हिजन वाहिन्यांवरील चर्चा व त्यांत नियमित ठेक्याने भाग घेणारे तज्ज्ञ यांचाही वीट आला आहे. ‘झी चोवीस तास ’ने पुढे आणलेल्या खानापूरकर मोहिमेला सर्व वर्तमानपत्रांनी आणि टीव्ही वाहिन्यांनी उचलून धरावे. ती माध्यमांची समाजाप्रती खरी कामगिरी ठरेल.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.
the channels do not pay the channels do not pay attention to constructive work as it does not boost their t.r.p. are we mature and bold enough to forget channel discussions at prime time? let us do it. we need to follow gandhiji on this point.
the channels do not pay
the channels do not pay attention to constructive work as it does not boost their t.r.p. are we mature and bold enough to forget channel discussions at prime time? let us do it. we need to follow gandhiji on this point.
Comments are closed.