Home अवांतर टिपण ‘आचार्य कुला’साठी हाक!

‘आचार्य कुला’साठी हाक!

1

– दिनकर गांगल

     विनोबा भावे यांनी ‘आचार्य कुल’ नावाची संस्था सुरू केली. ‘आचार्य कुल’चा नव्या संदर्भात अर्थ स्पष्ट करणे शक्य आहे. ‘थिंक महाराष्ट्र’चा एक उद्देश समाजातील बुद्धिवंतांचा, प्रतिभावंतांचा ‘प्रेशर ग्रूप’ तयार व्हावा असा आहे. मनुष्यमात्राची अवनत अवस्था पाहत आहोत. त्या अवस्थेतून वर येण्याचा काही मार्ग नाही? कदाचित ‘आचार्य कुला’सारखी काही व्यवस्था सध्याच्या दुरवस्थेबाबत सखोल विचारचिंतन करून मनुष्यमात्राचे जे खालावलेले रूप आपण पाहत आहोत त्यावर तोडगा सुचवू शकेल. त्यात बुध्दिवंत, प्रतिभावंत यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.


– दिनकर गांगल

     ‘आदर्श’ गृहनिर्माण घोटाळ्यात मुख्यमंत्रीपद सोडावे लागलेले अशोक चव्हाण चौकशी आयोगापुढे काय निवेदन करतात याबद्दल औत्सुक्य होते- ते निमाले. त्यांनी अपेक्षेप्रमाणे विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अंगुलीनिदेंश केला. ‘मुंबई सकाळ’ने या बातमीस झकास शीर्षक दिले आहे!

                                      विलासराव म्हणतात, अशोकराव;

                                      अशोकराव म्हणतात, विलासराव

                                     खरा ‘आदर्श’ कोण? सुशीलकुमारांकडेही अंगुलीनिर्देश!

     दुसरीकडे, कनीमोळी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला. त्यामुळे टुजी आणि थ्रीजी घोटाळ्यात पुढील कारवाई सुरू झाली असे गृहीत धरायचे.

     आपण सर्वांनी वर्तमानपत्रांमध्ये या बातम्या वाचल्या, टेलिव्हिजनवर पाहिल्या असणार. रोज अशा नवनव्या बातम्या येत असतात; त्यांचे पुढे काही घडत नाही हे आपल्याला माहीत असते आणि म्हणूनच, राजकीय घटनांच्या बातम्या हीदेखील करमणूक झाली आहे असे आपण म्हणतो.

     तेलगी हे असेच गाजलेले जुने प्रकरण. त्यात तेलगी यांना शिक्षा तरी झाली. पण त्यांच्याबरोबर गोवले गेलेले रणजित शर्मा, वगळ हे उच्च अधिकारी व अन्य अनेक पोलीस दहा वर्षांनंतर निर्दोष सुटले! त्यांना जामीनच सहा-सात वर्षांनंतर मिळाला. म्हणजे तेवढी वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. माणसांची काय ही दयनीय अवस्था! बातमीत उल्लेख होता, की वगळसाहेब ज्येष्ठतेप्रमाणे पोलिसदलाचे प्रमुख होणार! काय ही व्यवस्था! या दुर्व्यवस्थेमध्ये आपण निवांत जगत राहायचे!

     विनोबा भावे यांनी ‘आचार्य कुल’ नावाची संस्था सुरू केली. विनोबा आणीबाणीस ‘अनुशासन पर्व’ असे म्हणाल्यामुळे ते ‘कुल’ बदनाम झाले. राम शेवाळकर नंतर बरीच वर्षे ‘आचार्य कुला’चे प्रमुख होते. ‘आचार्य कुल’चा नव्या संदर्भात अर्थ स्पष्ट करणे शक्य आहे. ‘थिंक महाराष्ट्र’चा एक उद्देश समाजातील बुद्धिवंतांचा, प्रतिभावंतांचा ‘प्रेशर ग्रूप’ तयार व्हावा असा आहे. मनुष्यमात्राची अवनत अवस्था पाहत आहोत. त्या अवस्थेतून वर येण्याचा काही मार्ग नाही? कदाचित ‘आचार्य कुला’सारखी काही व्यवस्था सध्याच्या दुरवस्थेबाबत सखोल विचारचिंतन करून मनुष्यमात्राचे जे खालावलेले रूप आपण पाहत आहोत त्यावर तोडगा सुचवू शकेल. त्यात बुध्दिवंत, प्रतिभावंत यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.

दिनकर गांगल – thinkm2010@gamil.com

दिनांक – 21/06/2011

{jcomments on}

About Post Author

Previous article‘बालगंधर्व’ आणि ‘नटरंग’ (Balgandharva And Natrang)
Next articleधुआँ उडाताही चला……….
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version