समोर लक्ष्य, उद्दिष्ट ठेवून त्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी विरळा असतात, त्यात परिस्थिती प्रतिकूल असेल तर? फारच अवघड कामगिरी ती. तशा एका मुलीची ही प्रेरणादायी गोष्ट. विनय आठवलेसरांचे खासगी शिक्षणवर्ग अकरावी-बारावीसाठी पुण्यात आहेत. अनामिका दळवी गेल्या वर्षी, अकरावीचे क्लास सुरू झाल्यानंतर, एके दिवशी आठवलेसरांना भेटण्यास आली. आली ती रडायलाच लागली! म्हणाली, “सर, माझ्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे मला फी लगेच भरता येणार नाही. पण मला शिकायचे आहे, तर तुम्ही मला प्लीज क्लासला बसू द्याल का?” तिला सरांनी शांत केले, समजावले व ‘आईवडिलांना भेटण्यास घेऊन ये’ म्हणून सांगितले.
दुस-या दिवशी, तिची आई भेटण्यास आल्यावर कळाले, की त्या धुणीभांडी व स्वयंपाकाची कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. म्हणाल्या, “माझी मुलगी हुशार आहे. मला तिला शिकवून मोठी करायचे आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजे. तिच्यावर माझ्यासारखी लोकांकडे कामे करण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुमची फी मी जमेल तशी थोडी थोडी देत जाईन.”
सरांनी त्या बार्इंना फीची सवलत दिली व सांगितले, की “तुमच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आमची. तिने शिकले पाहिजे. फीची काळजी तुम्ही करू नका.”
अनामिका अभ्यासू व कष्टाळू खरीच असल्याचे सरांच्या लक्षात आले. तिचे वर्गात शिकवण्याकडे पूर्ण लक्ष असायचे. तिचे होमवर्क पूर्ण असायचे. क्लासच्या परीक्षेतही तिला चांगले मार्क असायचे. ब-याचदा, ती जास्तीची गणिते सोडवण्यासाठी क्लासवर थांबायची.
अनामिकाचा वाढदिवस होता, म्हणून तिने सरांना नमस्कार केला व घरी जेवण्यास बोलावले. सर त्या वेळी नाही, पण परीक्षा झाल्यावर सुट्टीमध्ये एका संध्याकाळी अनामिकाकडे जेवायला गेले. सोबत मीही होते. आम्ही दोघे घरात पाऊल टाकताच एकमेकांकडे पाहू लागलो. जेमतेम 10×10 ची खोली होती. त्यात ओटा, लहान मोरी, सामानाचा रॅक, पलंग आणि शोकेसवजा एक कपाट असे सारे सामान तेथे होते. त्यातून मध्ये 4×4 चा एक चौकोन मोकळा होता. त्या खोलीत अनामिका तिचे आईवडील व भाऊ यांच्याबरोबर राहत होती. मागच्या खोलीत वडिलांचे गॅरेज होते. त्यात त्यांना फारशी आर्थिक कमाई नव्हती व दारूचे व्यसन होते. पण त्या सगळ्यात आमच्या नजरेत एक महत्त्वाची गोष्ट भरली. तिने कपाटाच्या काचेवर ‘सीओईपी’चे (College of Engineering, Pune) गेल्या वर्षीचे ‘कट ऑफ मार्कस्’ लिहिले होते, त्यावर लिहिले होते – TARGET ! अनामिका रोज सकाळी उठल्यावर प्रथम ते बघत असे. ती सिन्सिअरली अभ्यास करून ‘CEOP’त इंजिनीयरिंगला अॅडमिशन मिळवण्याची जिद्द तशा सगळ्या वातावरणातही बाळगून होती.
आम्ही पलंगावर बसलो. अनामिकेने ताट वाढून समोर ठेवले. पांढरा रस्सा, चिकन, फिश, भाजी, पोळी सर्व काही होते. आम्ही चकितच झालो. आम्ही अनामिकाला ‘अगदी साधे जेवण कर’ असे बजावले होते. आम्ही ‘एवढे प्रकार कशाला केलेत’ असे विचारल्यावर तिची आई म्हणाली, “सर, तुम्ही येणार म्हणजे आम्हाला घरात दिवाळी असल्यासारखेच वाटतेय. तुम्हाला आवडते म्हणून मुद्दाम नॉनव्हेज केले आहे.” जेवताना आमच्या गप्पा चालू होत्या. आई लेकीचे कौतुक करत होती – “आम्हाला तिला कधी सांगावे लागत नाही. ती टीव्ही बघत नाही. तिच्याकडे मोबाईल नाही. तिचा अभ्यास ती मनापासून करते.” वगैरे.
अनामिकाच्या आईने मनापासून बनवलेले, चविष्ट जेवण आम्हाला खरोखरीच तृप्त करून गेले होते. तो सगळा अनुभवच आम्हाला खूप काही शिकवणारा होता. आमच्या मुलांनाही घेऊन यायला हवे होते असे वाटू लागले. अपार कष्ट करणारी आई, हुशार, सिन्सिअर, शिक्षणाची आवड असणारी मुलगी. घरातल्यांचा साधेपणा, आपुलकीने, आग्रहाने वाढलेले जेवण हे सगळे खूप श्रीमंत, बंगलेवाल्यांच्या घरातील पंचपक्वानांनी भरलेल्या, चांदीच्या ताटातील जेवणापेक्षाही कैकपटींनी मनाला भिडणारे होते.
सरांनी अनामिकाला सांगितले, की तू इंजिनीयर तर होशीलच, ते काही खूप अवघड नाही. तिचे आईवडील म्हणाले, “सर, त्याची फी आम्हाला परवडणारी नाही.” आम्ही सांगितले, “हल्ली आर्थिक मदत करणारे खूप लोक असतात. स्कॉलरशिप्स मिळतात, आम्ही पण मदत करू. तुम्ही त्याची काही काळजी करू नका.”
“पण अनामिका, खरे टार्गेट आता वेगळेच ठेवायचे आहे. इंजिनीयर होऊन आपल्याला गप्प बसायचे नाही. तू एम.एस. करण्यासाठी अमेरिकेत जाशील. तेथेच नोकरी करून डॉलर्स कमावायचे आणि आपल्या देशात पाठवायचे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक दिवस विमानात बसवून तुझ्या आईलाही अमेरिकेत फिरवून आणायचे. तेच तुझे टार्गेट! ते CEO पेक्षा भारी आहे हे लक्षात ठेव. आई तुझ्यासाठी इतके कष्ट करत आहे, तिचे पांग तुला फेडायचे आहेत, हे विसरू नकोस. तू आईला घेऊन अमेरिकेला जाशील तीच माझ्यासाठी खरी गुरुदक्षिणा असेल.” ते ऐकताच त्या मायलेकींच्या डोळ्यांत पाणी आले.
बारावीच्या रिझल्टमध्ये (2016) अनामिकाला बोर्डात गणितात 94/100 व CET ला 124/200 मार्क मिळाले व तिला इंजिनीयरिंगला अॅडमिशनही मिळाली!
तिला आर्थिक सहाय्य विविध मार्गांनी मिळणार आहे.
(अनामिकाची ही कहाणी तिचे गुरु विनायक आठवले यांनी ‘थिंक महारष्ट्र’च्या You Tube Channel वर प्रत्यक्षात सांगितली आहे.)
– रोहिणी आठवले
आनामिका तुझ्या जिद्दीला सलाम…
आनामिका तुझ्या जिद्दीला सलाम तसेच मा.आठवले सराचे अभिनंदन आणि हा लेख थिंक महाराष्ट्रचे माध्यमातून वाचका पर्यत पोहोचले बद्दल रोहीणीताईचे आभार
Comments are closed.