कोल्हापूराने सर्वांचा छळ सुरू केला. ब्रह्मदेवादी देवांनाही तो ऐकेना असे होता होता.. शंभर वर्षे झाली. ‘महालक्ष्मी’ परत आली. तिचे व कोल्हापुरचे युद्ध झाले. देवीने कोल्हापूरला ठार मारले व त्याच्याच इच्छेप्रमाणे करवीर शहराचे नाव ‘कोल्हापूर’ ठेवले,” अशी आख्यायिका आहे.
सांस्कृतिक नोंदी
महालक्ष्मी, कोल्हापूरची
महालक्ष्मी आणि कोल्हापूर यांचं अतूट नातं आहे. कोल्हापूरकरांच्या मनातली महालक्ष्मीची भक्ती, प्रेम ना कधी कमी झाले ना कधी त्यांचे या मंदिराचे आकर्षण. तेथील अंबाबाईचे सुरेख, ऐतिहासिक मंदिर वाढत्या गर्दीच्या लोंढ्यांनी न भ्रष्ट होवो-न त्याचे सौंदर्य घटो याची चिंता मात्र कोल्हापूरकरांच्या मनाला सतावत आहे, एवढी मंदिरातील गर्दी वाढत चालली आहे!
नवरात्रोत्सव काळात मंदिराच्या प्रांगणातील सात दीपमाळा रोज रात्री प्रकाशाच्या तेजाने झळाळून उठतात. मंदिराच्या गरूड मंडपात अत्तराचे सुगंधी वातावरण दरवळून टाकतात, लखलखत्या दिव्यांचे झगमगाट डोळे दिपवतात, रेशमी वस्त्रातील सौंदर्यवतींची गडबड, हास्यविनोदाची कारंजी, कार्यक्रमाची उत्सुकता रोजच्या प्रत्येक ‘माळे’गणिक वाढत जात असते. पुरूषांचे दिमाखदार पोषाखातील रुबाबदार वागणे एकीकडे तर स्त्रियांची कुजबूज त्यांची डोलणारी केशभूषा, कर्णभूषणे, भरजरी पदरांचे सरकणे अन् सावरणे दुसरीकडे अशा उत्साही वातावरणात सुरू होणारा गायनाचा कार्यक्रम….
स्टेजवर आणखी झगमगाट, गायक, वादक-वाद्ये, मागे पडद्यावर चमचमणारी चंदेरी अक्षरे…. मग पसरत जाते शांतता. ही शांतता सुरेलपणे भंग करत वातावरणात उमटतात मंद स्वर, वाढत्या लयीबरोबर वाढत जातात उत्कट भाव, विशिष्ट रागदारीचे बहरलेले क्षण. त्यात मन आनंदाने ओसंडून वाहत स्थळकाळाचे भान हरपून झडतात नवरात्रोत्सवातील भक्तिरस गायनाच्या मैफली. गाण्याच्या मैफिली हे कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.
देवीच्या साडेतीन पीठांपैकी कोल्हापूरची अंबाबाई हे एक आद्यपीठ आहे. अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर भव्य व भक्कम आहे. मंदिरात जाण्यासाठी चारी दिशांना दारे आहेत; पण पश्चिमेला असेलेल दार मुख्य आहे. त्याला ‘महाद्वार’ असे म्हणतात. मंदिराच्या गाभार्यात देवीची मूर्ती आहे. देवीचे तोंड पश्चिमेला आहे. तिला चार हात आहेत. गदा, ढाल व पानपात्र हा आयुधे तिने हातांत घेतली आहेत.
या देवीची कथा अशी…. इंद्र व महिषासूर यांचे युद्ध सुरू झाले. ते शंभर वर्षे चालू होते. शेवटी इंद्राचा पराभव झाला. महिषासूर स्वर्गाचा राजा झाला. शंकराला हे समजले तेव्हा तो संतापला. त्याच्या डोळ्यांतून अग्नी बाहेर पडू लागला. त्यातून देवी प्रगट झाली. सर्व देवांनी तिची प्रार्थना केली. तिला शस्त्रे दिली. मग देवीने भय़ंकर गर्जना केली. त्यामुळे पर्वत डळमळले. देवीचे व महिषासुराचे युद्ध झाले देवीने महिषासुराला व इतर राक्षसांना ठार मारले. तीच ही महालक्ष्मी.
ब्रह्मदेवाचा मानस पुत्र कोल्हापूर. त्याच्या मुलाचे नाव ‘करवीर.’ करवीरने लोकांचा छळ सुरू केला. मंदिरे तोडून टाकली. शेवटी शंकराने करवीरला ठार मारले. याचे स्मरण म्हणून त्या गावाला नाव ठेवले ‘करवीर’ आपल्या मुलाच्या मृत्यूला कारण महालक्ष्मीच आहे, असे कोल्हापूरला वाटते.
त्याने देवीची प्रार्थना केली, “तू शंभर वर्षे हे स्थान सोडून जा…’ देवी निघून गेली. मग कोल्हापूराने सर्वांचा छळ सुरू केला. ब्रह्मदेवादी देवांनाही तो ऐकेना असे होता होता.. शंभर वर्षे झाली. ‘महालक्ष्मी’ परत आली. तिचे व कोल्हापुरचे युद्ध झाले. देवीने कोल्हापूरला ठार मारले व त्याच्याच इच्छेप्रमाणे करवीर शहराचे नाव ‘कोल्हापूर’ ठेवले,” अशी आख्यायिका आहे.
आठव्या शतकात भूकंपामुळे मंदिर खचले होते. नवव्या शतकात राजा गडवादीक्षाने मंदिराचा विस्तार केला. दररोजच्या पाद्यपूजा, महापूजा या कृत्यामुळे मूर्तीची झीज होऊ लागली. त्यामुळे १९५४ साली वज्रलेप करून मूर्तीची पुन्हा स्थापना करण्यात आली.
मंदिराच्या आतील बाजूला विचित्र पद्धतीने उभ्या असलेल्या मंदिराच्या लहान लहान कपर्या १९६० साली काढून त्या एका रांगेत सिमेंट काँक्रिटच्या ओतीव कामात बांधण्यात आल्या. त्यामुळे आवाराला भव्यता आली. महालक्ष्मी प्रांगणात व अवतीभवती सुमारे अडीचशे मंदिरे आहेत. कोल्हापूर शहरात एकूण तीन हजार मंदिरे आहेत.
– अशोक मेहता
प्लॉट नं. २७, पत्रकारनगर
एसन्टी, स्टॅंडमागे,
सांगली – 416416
भ्रमणध्वनी : 988165835