भ्रष्टाचार, स्वार्थी वृत्ती, बोकाळलेला वास्तुवाद आणि ढासळणारी जीवनमूल्ये यांमध्ये अंधारमय निराशा सर्वत्र पसरतअसताना, काही दैदीप्यमान माणसे हातात आशेचे दीप घेऊन आजही कार्यरत आहेत. अशाच एक मेधा पाटकर.
मेधा पाटकरांचा जन्म १ डिसेंबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील वसंत खानोलकर हे स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य लढवय्ये सैनिक आणि अनुभवी, प्रसिध्द कामगार संघटक (ट्रेड युनिअनिस्ट). त्यांनी पुढे ‘प्रजा समाजवादी पक्ष’ कार्यरत केला. मेधाताईंच्या आई इंदू खानोलकर हे एक प्रसन्न व्यक्तिमत्व. त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रत्येक प्रसंगात न चुकता येतात.
‘मेधा पाटकर म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन’ असे समीकरणच आहे. शिवाय, त्या मुंबईत ‘स्वाधार’ नावाची महिलांची संघटनाही चालवतात.
मेधा ट्रेड युनिअनिझम आणि सामाजिक न्याय या वातावरणात वाढल्या. त्यामुळे त्यांचे जीवितकार्य जणू ठरुन गेले. पण या सामाजिक बंधामुळे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. जबरदस्त वचनबध्दतेसाठी, त्यांना ऐन तारुण्यात घटस्फोटाला सामोरे जावे लागले. जणू, त्यांनी निवडलेल्या जीवनमार्गाचा हा एक परिणाम होता.
विद्यार्थिदशेपासून मेधा नाटकांपासून ते वक्तृत्व स्पर्धेपर्यत प्रत्येक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग असे. बहुधा, घरातली उदारमतवादी पार्श्र्वभूमी याला कारणीभूत असावी. त्यामुळे मेधाना त्यांची दृष्टी नि मन सतत खुले ठेवायला शिकवले गेले. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास होत गेला आणि त्यांच्यातील नेतृत्वाच्या गुणाला आकार मिळत गेला. मेधा ह्या शाळा-महाविद्यालयीन जीवनात ‘अभ्यासात हुशार विद्यार्थिनी’ असा नावलौकिक होता. तिला सर्वसामान्य जनांची सेवा करायला डॉक्टर व्हायचे होते. पण दुर्दैवाने, थोडया मार्कांच्या कमतरतेमुळे त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकला नाही. पण त्या निराश झाल्या नाहीत. असामान्य माणसे आपल्या आयुष्याला स्वत:हून कलाटणी देतात. मेधानीही तेच केले. त्यांनी ‘समाजकार्य’ हे डोळयांसमोर ठेवलेले ध्येय ढळू दिले नाही. त्यांनी सामाजिक कार्य हा विषय घेऊन टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशँलिअल्ट सायन्स येथून एम. ए. केले त्यानंतर त्यांनी सेवाभावी संघटनांमधून मुंबईच्या झोपडपट्टयांमध्ये पाच वर्ष कार्य केले. तसेच, गुजरातच्या नैॠत्य भागात मागासलेल्या जमातींमध्ये दोन वर्षे काम केले.
त्यांनी जेव्हा महाराष्ट्रातल्या काही जमातींसाठी आणि शेतक-यांच्या हक्कांसाठी काम सुरू केलं तेव्हा त्यांना TISS मधील विद्याशाखेतले स्वत:चे पद आणि पीएच.डी. अर्धवट सोडून द्यावे लागले. त्यांनी मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये ‘नर्मदा बचाव आंदोलन’ संघटित केले. ‘नर्मदा खोरे विकास प्रकल्प’, ‘सरदार सरोवर धरणां’ मुळे निर्वासित होणा-या लाखो लोकांचे पुनर्वसन आणि नर्मदा नदीवर बांधल्या जाणा-या मोठया धरणांमुळे निर्माण होणा-या समस्यांवर ‘नर्मदा बचाव आंदोलना’ ने कार्य करण्यास सुरुवात केली.
मेधाताईंनी १९८५ सालापासून आपलं सगळं आयुष्य ‘नर्मदा बचाव’ आंदोलनात झोकून दिलं. त्या नुसतं आंदोलन करुन थांबल्या नाहीत, तर त्यांनी त्यातून पुढे वर्तवलेल्या (सरकारने) विकासप्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. आंदोलन सर्वसामान्य जनमानसापर्यंत जाण्यासाठी त्यांनी हाडाची काडं केली. चर्चा, व्याख्याने, पथनाटय, व्हिडिओ कॅसेट, सभा यांतून त्यांनी जनजागृती केली तर सत्याग्रह, उपोषण, मोर्चा, मेळावे करुन सतत अन्यायाला वाचा फोडली.
केवळ भारत सरकारला निवेदनं करुन मेधाताई थांबल्या नाहीत तर त्यांनी आतंरराष्ट्रीयस्तरावरदेखील आपला आवाज पोचवला. जगातल्या बंधू-भगिनींना मानवतेच्या हक्कासाठी आर्त हाक मारली. यासंबधी घनघोर न्यायालयीन लढाई त्यांनी जारी ठेवली आहेच, पण प्रसंगी स्वत: जलसमाधी घेण्याची तयारीही मेधाताईंनी दाखवली आहे. जेव्हा भारत सरकार त्यांना जुमानेना तेव्हा ताई स्वत: मृत्यूला कवटाळायला पाण्यात उभ्या राहिल्या आणि त्यांनी आत्मसमर्पणाची घोषणा केली. या त्यांच्या असीम त्यागामुळे नर्मदेच्या विस्थापित लोकांना ताई देवताच वाटू लागल्या.
हे आंदोलन सुरु असतानाच कोकणात दाभोळ येथे एन्रॉन वीज प्रकल्पाचे काम जोरात सुरु झाले. मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी लाख मोलाचं पर्यावरण बळी पडणार होतं. आधुनिकतेचा आव आणून आपली तुंबडी भरु पाहणारे राजकारणी आणि प्रकल्प सुरु झाल्यानंतर त्याखाली भरडली जाणारी कोकण परिसरातली सर्वसामान्य जनता यांमध्ये संघर्ष सुरु झाला. तेव्हाही मेधाताई जनतेची कढ घेऊन त्यांच्या मदतीला धावून गेल्या. पण त्यांना पोलिसांनी प्रकल्पाच्या ठिकाणी पोचू दिले नाही. नागोठणे परिसरात IPCC ची उभारणी झाली. पण तेव्हाही विस्थापिताविरुध्द होणाऱ्या अन्यायाविरुध्द मेधाने लढयाचे नेतृत्व केले.
२००४ साली मुंबईत अचानक झोपडपट्टीवासीयांवर सरकारचा नांगर फिरला. तेव्हाही मेधाताई मातेच्या सहदय अंत:करणाने झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळावा यासाठी धावून गेल्या. झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन ही मुंबईचीच नव्हे, तर जगातील एक गंभीर समस्या. ती त्याचं समुळ उच्चाटन करुन सुटणार नाही. त्यासाठी विधायक प्रयत्न शासनाला करावे लागतील अशी भूमिका मेधातार्इंनी मांडली; आणि त्या आझाद मैदानावर झोपडी बांधून राहिल्या, त्यांनी आंदोलनकर्त्यांना प्रेरणा दिली.
त्याचवेळी बारबाला प्रकरण उफाळून आले. लेडीज बारवर सरकारणे बंदी घातल्यामुळे हजारो बारबाला अक्षरश: बेकरीच्या खाईत लोटल्या गेल्या. त्याचे मोर्च आझाद मैदानावर धडकू लागले. तेव्हा त्यांच्या आंदोलनाला मार्गदर्शन आणि दिलासा देण्याचे काम मेधातार्इंनी केले.
अशा या मेधाताई पाटकर. जिथे-जिथे अन्याय आपलं डोकं वर काढेल तिथे-तिथे अन्यायाचा नायनाट करायला ताई कालीमातेसारख्या धावून जातात. कार्याबद्दल असलेली विलक्षण बांधिलकी, सकारात्मक दृष्टिकोन, सातत्याने पध्दतशीर प्रयास करत राहण्याची वृत्ती, सत्य आणि न्याय यासाठी अविश्रांत झगडण्याचे मनोधैर्य, गरीब-दबलेल्या जनांबद्दल हदयात अतीव सहानुभूती असे अनेक पैलू असणारं मेधाताईचं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व. पण दुदैवाने त्यांना अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. तरीही त्या थांबलेल्या नाहीत. त्यांचा कार्ययज्ञ अखंड धगधगतोय. अर्थात याची दखल भारतापेक्षा भारताबाहेर घेतली गेलीय. त्याच्या नावाचं मॅगसेसे पुरस्कारासाठी भारतातून नामांकन झालंय. अर्थात, अशी कर्तृत्वान माणसं पुरस्कारांसाठी कधीच काम करत नसतात. तरी अशा जगतकल्याणाच्या वेडानं पछाडलेल्या प्रत्येकाची दखल आपण घेतलीच पाहिजे. त्याचं स्थान आपल्या मनात आपण जाणीवपूर्वक निर्माण करायला हवं.कारण हेच महामानव आजच्या वर्तमानाचे नि उद्याच्या भविष्याचे आदर्श दीपस्तंभ आहेत. अगदी सच्चे आणि म्हणून वंदनीय.
‘पर्यायी विकासनीतीचा’ (मेधाचाच शब्द प्रयोग) राजकीय लढा त्या उभारु शकल्या नाहीत हे मात्र खरे! त्यांचा लढा अपरिहार्यपण नर्मदा घाटीपुरताच मर्यादीत झाला आहे. नर्मदा बचाव आंदोलन आणि समर्थक संघटनांत आंदोलनाची संघटनात्मक विभागणी झाली आहे.
संघटनात्मक धोरणांचे नियम नर्मदा बचाव आंदोलनच घेते. देशातील अन्य लढे व आंदोलने सुटे सुटे विखुरले गेले आहेत. मेधाचे आंदोलन संघटनेपेक्षाही त्यांच्याभोवतीच फिरते आहे.असं व्यक्तिमाहात्म्य संघटनेच्या दृष्टीने हितकारक नसते. एका व्यक्तिच्या झेंडयाखाली एखादी संघटना फार काळ तग धरु शकत नाही. आत्मत्याग, जलसमाधी अशा आततायी टोकापर्यंत मेधाची भूमिका जाऊ पाहते. आपल्या भाषणांतील मांडणी प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेलं राजकीय संघटनेचं हत्यार त्या निर्माण करु शकल्या नाहीत.
१) मेधाताई शालेय वयातच राष्ट्र सेवा दलात रुजू झाल्या. त्यांचे आईवडीलही राष्ट्र सेवा दलाचेच कार्यकर्ते होते.
२) वडिल वसंतराव खानोलकर स्वातंत्र्यसैनिक, कामगार चळवळीतले धडाडीचे कार्यकर्ते. हिंद मजदूर सभेत पदाधिकारी होते. शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. हेच बाळकडू पीत मेधाताईंची समाजसेवेची वाटचाल सुरु झाली. त्यांची समाजसेवेची सुरुवात श्रमशिबिरातून, प्रकल्प अधिकारी, युनिसेफची कार्यकर्ती अशी झाली. घरी येणाऱ्या ‘साधना’ सारख्या साप्ताहिकातून त्यांच्यात ‘मास लीडरशिप’ची संकल्पना रुजली.
३) मेधाताईंनी एकेकाळी कविता केल्या, ‘मणिपुरी’ नृत्यप्रकार शिकल्या. त्यांना बॅरि.नाथ पै, गोल्डमन पर्यावरण पारितोषिक, राइट लाइलीहूड अवॉर्ड, ग्रीन रेव्हरी अॅवॉर्ड इत्यादी पुरस्कार मिळाले आहे.
४) TISS मधून बाहेर पडल्यावर गरिब व आदिवासींसाठी काहीतरी करण्याचे मेधाताईंना योजले होते. मग फंडिंग एजन्सीजसाठी भांडूपसारख्या वस्त्यांमध्ये त्यांनी काम केले. तिथे त्यांना फंडिंग एजन्सीजचे सामर्थ्य व मर्यादा कळून चुकल्या.
५) कार्यकर्त्यांच्या चंगळवादाला पराकोटीचा विरोध करतानाच त्यांच्यात व्यावसायिकता यावी याबाबतही मेधाताई आग्रही असतात. शेतमजुरांच्या प्रनांवर देशभरातील समविचारी लोकांनी एकत्र यावं असं त्या म्हणतात.
६) जे आधुनिक तंत्रज्ञान माणसाचं माणूसपणच संपवून टाकतं असं त्यांचं आग्रही मत आहे.
७) मानवता व मानवी मूल्यांना महत्व देणारी व्यवस्था उभारण्यासाठी विविध दबावगटांनी एकत्र यायला हवे. त्यांनी राजकारणात जाऊ नये, या बाबत त्या ठाम आहेत.
८) अन्यायाविरुध्द लढा देताना मेधाला अमानुष मारहाणही सहन करावी लागली. नॅशनल अलायन्स पीपल मूव्हमेंट फेडरेशनच्या वतीने तिने देशभरात चळवळी उभारल्या आहेत.
संदीप गीध
३०१ ए, मातंगी निवास, एन.बी.क्रॉस रोड,
सोमवार बाजार, मालाड (पश्चिम), मुंबई – ४०००६४
फोन : (निवास) : २८८०६८१५
(मोबाईल) : ९८२१७२११८७