‘अॅमेझॉन डॉट कॉम’च्या धर्तीवर भारतीय पुस्तके ऑन लाइन विकण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम अमेरिकेतील ‘मायविश्व’ कंपनीचे मालक मंदार जोगळेकर यांनी या आठवड्यात सुरू केला. त्याचे रीतसर उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व संशोधक-समीक्षक डॉ. अरुण टिकेकर यांच्या हस्ते झाले. या वेबसाईटचे नाव आहे ‘बुकगंगा डॉट कॉम’. जोगळेकरांनी कागदी पुस्तके विकण्याबरोबरच E पुस्तकेदेखील विकणे सुरू केले आहे. अॅपलच्या आयपॅडवर ही पुस्तके किती सुगमतेने वाचता येतात याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले तेव्हा डॉ. टिकेकर उत्स्फूर्तपणे उद्गारले, की लोकांना पुस्तक न वाचण्यास आता कोणतीही सबब राहिलेली नाही. कारण आयपॅडवर आडवे-उभे, टाइप मोठा करून, संदर्भ ठेवून.. कसेही वाचता येऊ शकते. स्लेटपाटी आकाराच्या आयपॅडमध्ये सर्वसाधारण आकाराची दहा हजार पुस्तके मावतात. आयपॅ़ड सहजपणे कोठेही नेता-आणता येते. त्यामुळे ‘आपल्याबरोबर फिरणारे हे ग्रंथ संग्रहालयच होय’ असे डॉ. टिकेकर यांनी त्याचे वर्णन केले.
जोगळेकर म्हणाले, की आयपॅडची अमेरिकेतील किंमत पाचशे डॉलर आहे. भारतात ते पंचवीस-तीस हजार रूपयांत मिळू शकेल. हळुहळू, त्याच्या किंमती कमी होत जातील.
आयपॅडवर इ-बुक स्वरूपातील मराठी पुस्तके भरण्याचे तंत्र जोगळेकर यांनी विकसित केले आहे. ही इ-बुक्स बरीच स्वस्त असतील. साधारण शंभर डॉलरमध्ये पंचवीस पुस्तके मिळू शकतील व ‘आयपॅड’मध्ये ती तहहयात राहतील. अमेय व मेहता या प्रकाशकांनी त्यांची निवडक टायटल्स ‘इ-बुक’साठी जोगळेकरांच्या स्वाधीन केलीदेखील.
‘बुकगंगा डॉट कॉम’बद्दल जोगळेकर म्हणाले, की फक्त भारतीय भाषांतील व भारतात निर्माण झालेली इंग्रजी पुस्तके या साइटवर मिळू शकतील. सध्याची ऑनलाइन विक्री अधिकतर परदेशी पुस्तकांसाठी उपलब्ध आहे. फक्त भारतीय भाषांसाठी ही सोय प्रथमच होत आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक पेमेंट फार सुकर नसल्याने बॅंकेमार्फत व्यवहार करण्याचाही बेत आहे.
धडाडीचा मराठी तरुण जगातील मोठ्या ग्रंथव्यवहाराला टक्कर देण्यास निघाला आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी रुइया कॉलेजच्या हॉलमध्ये मराठी प्रकाशक, लेखक व पत्रकार हजर होते.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.