Home संस्था अनाथांचा नाथ

अनाथांचा नाथ

विश्वास नांगरेपाटील यांनीही सावलीला भेट दिली होतीनितेश बनसोडे हा मूळचा राजूरचा (ता. अकोले.) त्याच्या लहानपणी त्याच्या आईचं निधन झालं. वडिलांनी आणि काकांनी त्याला वाढवलं पण आई नाही म्हणून नितेशकडे कायम दयेच्या भावनेतून बघितलं गेलं; हे नेमकं नितेशला खटकत होते. मुलाला आई नसणे किंवा आई-वडील दोघेही नसणे ही काही त्याचा गुन्हा नाही. पण समान सतत, पदोपदीच्या लेकरांना ती आठवण करुन देतो. याला आई नाही, त्याला बाप नाही अशी त्या लेकराची ओळखही करुन दिली जाते. त्यातून लेकरांना कमजोर बनवले जाते.

कोण देणार त्यांना मायेचा ओलावा? देणार आपण स्वत: का असू नये? हा विचार नितेशच्या मनात डोकावला आणि 'चॅरिटी बिग्निन्स अँड होम' या न्यायाने नितेशने 2001 साली 'सावली' चे रोपटे लावले. नितेशचे त्यावेळी वय होते केवळ तेवीस वर्षे.

त्याने स्वत:च्या घरी तीन मुलांना आणून त्यांना आधार दिला. त्यांच्या उजाड अशा आयुष्यात, तो त्यांची 'सावली' बनला. आई वडिलांची माया त्यांनी देऊ लागला. घरुन येणा-या तुटपुंज्या पैशांत स्वत:चा व त्या तीन मुलांचा खर्च कसाबसा भागवू लागला. पैसे कमी पडत होते म्हणून एक कामचलाऊ नोकरी करु लागला. एक वर्षभर नितेशने या मुलांना सांभाळले. या मुलांच्या आईवडिलांपैकी एकाला एडस् झालेला. नितेशने एकवर्षांनतर त्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे पोचवले. या एक वर्षांच्या काळात लोकांना समजले की हा नितेश मुलांना सांभाळतो, म्हणून त्यांच्याकडे अनाथ मुले येऊ लागली व नितेश त्यांना प्रेमाने सांभाळू ही लागला.
 'सावलीं’त आलेली मुले कुपोषित त्वचा रोगाने ग्रस्त अशी होती त्यामुळे त्यांची स्वच्छता, जखमा रोजच्या रोज साफ करणे, त्यांवर औषधे लावणे हे सर्व काही नितेश स्वत: अगदी आईच्या मायेने करत असे त्याचबरोबर त्या मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत असे.

हळुहळू 'सावली'तील मुलांची संख्या वाढत गेली, मुलांना आंघोळ घालणे, त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणे, त्यांना खाऊ घालणे, शाळेत पाठवणे, रात्री अंगाई गीत म्हणून त्यांना झोपवणे हे सर्व नितेश स्वत: करतो मुलांची शाळा, घराच्या जवळ आहे. त्यातल्या त्यात मोठी मुले, आपल्या बरोबरच्या लहान मुलांची काळजी घेतात- धाकट्या भावंडांप्रमाणे, हाही संस्काराचाच एक भाग.

 'सावली'त एक ट्यूशन टिचर ही येतो. तो मुलांना शाळेत काही समजले नसेल तर त्यांच्या शंकांचे निरसन करतो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती होते. 'सावली'मध्ये असणा-या मुलांना सर्वसाधारणपणे साठ ते ऐंशी  टक्‍क्‍यांच्या दरम्यान मार्कस् मिळतात. तेथे टीव्ही आहे, काँप्युटरही आहे. त्यांचा उपयोग करमणूक व ज्ञानसंवर्धन अशा दोन्ही कारणांसाठी होतो. इऩडोअर व आऊटडोअर गेम्स खेळण्याची संधीही मुलांना दिली जाते. मुलांना कराटे शिकवले जातात. त्याचा नियमित सरावही केला जातो. मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले जाते. मानसिक शांतता राखण्यासाठी मुलांना प्राणायाम शिकवला जातो. महिन्यातून एकदा एक डॉक्टरांची 'सावली'ला व्हिजिट असते. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जाते.
 या मुलांना मनाचे श्लोक म्हणायला शिकवले जाते. त्याशिवाय देशभक्तीवर गीतेही शिकविली जातात. "हम होंगे कामयाब" ही 'सावली'ची प्रार्थना आहे.

मुंबईचे नवीन काळे यांनी आपल्या दोन-तीन मित्रांसमवेत 'सावली'ला भेट दिली – नितेश बनसोडे यांच्या मुलांशी गप्पा मारण्याच्या हेतूने त्यांनी तेथील खेळीमेळीचे आनंदी वातावरण पाहिले. ती निरागस मुले पाहिली आणि नवीनला असे वाटले, की या मुलांना मुंबई म्हणजे काय ? ती कशी आहे? हे दाखवावे. त्याप्रमाणे नवीन व त्याचे मित्र यांनी 'सावली'तील वीस मुलांना मुंबईला आणले. त्यांना नेहरु तारांगण , मस्त्यालय, म्युझियम अशी काही महत्त्वाची ठिकाणे दाखविली. विमानही दाखविले या सर्व गोष्टी, ती मुले प्रथमच पाहत होती. सर्वात शेवटी त्यांना जुहू बीचवर नेले, समुद्र म्हणजे काय? हे मुलांना माहीतच नव्हते! ती हरखून गेली, समुद्रावर गेल्यावर! त्यानंतर नवीनने त्यांना 'शेव बटाटा पुरी' खायला दिली. तेव्हा "हे काय आहे?" असे त्यांनी विचारले. नवीनने त्यांना सांगितले व खा असे म्हणाला. सर्वांना काय करावे ही मुलांनी? ती सर्वजण गोल करुन वाळूवर बसली. हात जोडून सर्वांनी मिळून 'वदनी कवळ घेता' ही प्रार्थना म्हटली व त्यानंतर त्यानी ती शेव बटाटापुरी खाल्ली!
 त्यानंतर थोड्या वेळाने, "चला, आता सात वाजायला आले, आपण परत जाऊ या" असे नवीनने सांगताच,"ही आमची प्राणायाम करायची वेळ" असे मुलांनी सांगितले व सर्व मुलांनी वाळूवर बसूनच प्राणायाम केला.
'सावली'तील मुलांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर सर्व गड, किल्ले पाहिले आहेत. बाबासाहेबांनी या मुलांना आपल्या मांडीवर बसवून घेऊन किल्ल्यांची माहिती सांगितलेली आहे. समाजातील अनेक ज्येष्ठ व प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे 'सावली'ला भेट देऊन गेलेली आहेत.
डॉ. जयंत नारळीकर , प्रविण दवणे, संजय उपाध्ये, विश्वास नांगरेपाटील इ. "जेथे जातो तेथे" या लेखात, श्री. प्रविण दवणेंनी, नितेश बनसोडेच्या सावली प्रकल्पाचा उल्लेख केला व त्याविषयी चार-पाच ओळीत लिहिल्या असतील. परंतु त्यांचे ते शब्दच नितेशचे आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरले. संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ नितेशकडे आला. अंदाजे एक लाख रुपये जमा झाले. त्याशिवाय तीन लोकांनी, प्रत्येकी एका मुलांच्या संपूर्ण वर्षांच्या खर्चाचा भार उचलला.

 'सावली'च्या आजुबाजूच्या परिसरातील शाळांमधील मुलांनाही फायदा व्हावा, यासाठी संकल्प प्रतिष्ठान क्रीडा, पर्यावरण, सांस्कृतिक, युवाकल्याण, आरोग्यसेवा, स्वयंसेवा अशा विविध क्षेत्रांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करते.

 
संपर्क. संकल्प प्रतिष्ठान, 'सावली', प्लॉ. नं. 3, लिंक रोड, भूषणनगर (केडगाव), अहमदनगर,
9890969315
savalee2008@gmail.com 
www.savalee.org

पदमा कर्‍हाडे
9223262029

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version