हिंदकेसरी गणपत आंदळकर - महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्मपितामह
महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंदकेसरी गणपत आंधळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे. लोक त्यांना आबा म्हणून हाक मारत. तीन बटणांचा चमकदार ढगळ कुर्ता, पांढरे-शुभ्र धोतर, पायात कोल्हापूरी पायताण आणि डोक्याला तुऱ्याचा सुंदर फेटा... अशा वेशात भारदस्त पिळदार मिशांच्या रुबाबाने तरुणांनाही लाजवेल असे तेजस्वी गोरेपान देखणे रूप, तब्बल सहा फूट उंचीचा, बुरुजबंध ताकदीचा आणि पहाडासारखा दिसणारा माणूस!
आबा मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून दाखल झाले, की कुस्तीशौकिन मंडळींच्या नजरा त्यांच्याकडे वळायच्या. फडात सुरू असणार्या पैलवानांच्या लढती सोडून सर्वजण आबांकडे पाहत बसायचे. त्यांना त्यांच्या तेजस्वी बलदंड रूपात जणू प्रती हनुमान दिसायचा! मैदानात हलगी वाजायची, आबांचा हारतुऱ्यांनी सत्कार-सन्मान व्हायचा आणि आबा त्यांचे दोन्ही हात उंचावत कुस्तीशौकिनांना अभिवादन करायचे, की प्रेक्षकांमधून आबांच्या सन्मानार्थ टाळ्याचा कडकडाट व्हायचाच.