सत्यभामाबाई टिळक – व्रतस्थ सहचारिणी (Satyabhamabai Tilak)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई टिळक यांनी त्यांचा संसार चोख सांभाळला. लोकमान्य यांना संसाराच्या जबाबदाऱ्या जास्त सांभाळाव्या लागल्या नाहीत. टिळक यांना काही वेळा तुरुंगात जाण्याची पाळी आली, पण सत्यभामाबाई यांनी कधीही, कोठल्याही प्रकारची तक्रार किंवा नाखुषी व्यक्त केली नाही.
टिळक इंग्रजी शाळेत असताना, म्हणजे 1871च्या वैशाख महिन्यात त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी कोकणातीलच होती व त्या दोघांचाविवाहसुद्धा कोकणातील चिखलगावी झाला. सत्यभामा यांचे पूर्वाश्रमींचे नाव – ‘तापी’. ते त्यांचे घराणे म्हणजे लाडघर (तालुका दापोली) येथील ‘बाळ’ घराणे. ते घराणे पाहुणचारासाठी प्रसिद्ध होते. ‘बाळ’ घराण्यात दानधर्माला विशेष महत्त्व होते. त्यांच्या गुरुजींनी सांगितलेली जुनी आठवण - कोकणात चोरट्यांचा उपद्रव असल्यामुळे दागदागिने रात्री धान्याच्या डब्यात ठेवून व सकाळी ते आठवणीने बाहेर काढण्याची पद्धत होती. एकदा ‘बाळ’ यांच्या घरी भिकारी आला असता, घरातील एका माणसाने त्याला ओंजळभर तांदूळ घातले. त्यात चुकून सोन्याचा दागिना आला. पण भिक्षेकरता वाढण्यात आलेल्या तांदुळात जे काही निघेल ते दानधर्म समजून तो सोन्याचा दागिना त्या भिकाऱ्याला देण्यात आला!