कोपरगाव येथील पेशवेकालीन वाडे
रघुनाथरावांना (राघोबादादा) पेशवाईची वस्त्रे नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर 10 ऑक्टोबर 1773 रोजी मिळाली. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सखारामबापू, त्रिंबकराव मामा, नाना फडणवीस, मोरोबा फडणवीस, बजाबा पुरंदरे आदी प्रमुख बारा मंडळींनी एकत्र येऊन बारभाई मंडळ स्थापन केले आणि त्यांनी राघोबादादांना पदच्युत करून कारभार स्वतःच्या हाती घेतला. राघोबादादांनी पेशवाई परत मिळवण्यासाठी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले. राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास 23 फेब्रुवारी 1775 रोजी आले. दादा इंग्रजांबरोबर सतत सात - आठ वर्षें राहिले.
इंग्रज व मराठे यांच्यात तह महादजी शिंदे यांच्यामार्फत ग्वाल्हेरपासून वीस मैलांवर सालबाई येथे 17 मे 1782 रोजी झाला. तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास पेशव्यांच्या स्वाधीन केले. राघोबादादांनी महादजी शिंदे यांच्या सल्ल्यावरून कोपरगावला कायम वास्तव्य करण्याचे ऑगस्ट 1783 मध्ये ठरवले. ते कोपरगावला आले. नाना फडणवीसांनी राघोबादादांना दरमहा पंचवीस हजार रुपयांचे पेन्शन मंजूर केले.