ख (Kha)
‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’ म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी). अनेक शब्द ‘ख’पासून तयार झाले आहेत. ज्याच्यातील ‘ख’ म्हणजे आकाश, ‘श’ म्हणजे शुभ असते तो शंख. आकाशात दिव्यासारखा चमकणारा खद्योत म्हणजे काजवा. खगंगा म्हणजे आकाशगंगा, खवल्ली म्हणजे आकाशवेल. खनगर (गंधर्वनगर), खस्थान (घरटे, ढोली), खद्रु:(चारोळी) तर खहर: म्हणजे शून्याने भागलेली संख्या (अनंत). त्याशिवाय ख शब्दाचे सूर्य, स्वर्ग, इंद्रिय, छिद्र, पोकळी, शून्य टिंब, जखम, कर्म, ब्रह्म, ज्ञान, शेत, अभ्रक आणि शहर असे अर्थ गीर्वाणलघुकोशात दिले आहेत.