सातभाई
‘सातभाई’ हे एखाद्या पडेल हिंदी चित्रपटाचे नाव नाही तर ते एका पक्ष्याचे नाव आहे. इंग्रजीत त्याला कॉमन बॅबलर असे म्हणतात. सातभाईंना इंग्रजीत ‘सेव्हन सिस्टर्स’ असेही नाव आहे.
हिंदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटाची कथा दोन भावांवर आधारलेली असे. पुढे ‘राम और शाम’, ‘सीता और गीता’ अशा जुळे भाऊ वा बहिणींच्या चित्रपटांची लाट आली. तर ‘अमर, अकबर, अँथनी’च्या जोरदार यशानंतर तीन भावांच्या कथेच्या फ़ॉर्म्युल्याची चलती सुरु झाली. त्यानंतर एकदम ‘सत्ते पे सत्ता’ हा सात भावांवर आधारित चित्रपट निघाला. मात्र तो अपेक्षेप्रमाणे चालला तर नाहीच, पण चांगला आपटला. त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. हिंदी चित्रपटातील भावांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आले.
सातभाई हा पक्षी शहरात भरवस्तीत सहसा आढळत नसला तरी शहराच्या सीमेवरील माळरानावर आणि रानावनांत कायम दिसतो. सातभाई जमिनीवरील पालापाचोळा उसकटून त्यातील कीटक खातो. तो जमिनीपासून थोड्या उंचीवर अगदी जिवावर आल्यासारखे उडतो. सातभाई पक्षी नेहमी थव्याने हिंडतात. त्यांच्या थव्याची संख्या सात ते बारापर्यंत असते. थव्यांची संख्या नेहमी सातच असते असे नाही, परंतु बहुतेक वेळा तेवढी असते. म्हणून त्याचे नाव पडले सातभाई.