अस्वल
अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत.
अस्वल हा गलिच्छ, ओंगळवाणा आणि क्रूर प्राणी आहे. तो सस्तन प्राणी जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतो.
अस्वलाला लॅटिनमध्ये उर्सुस म्हणतात. संस्कृत ऋक्ष शब्दाशी लॅटिन उर्सुस शब्दाचे साम्य आढळते. कारण दोन्हींचा अर्थ उत्तरेकडील असा आहे. अस्वल हा उत्तर गोलार्धातील उत्तरतम प्रांतातील प्राणी असून नंतर तो दक्षिणेच्या उष्ण कटिबंधापर्यंत पोचला. शरीरावरील दाट केसांमुळे मुळात तो थंड प्रदेशात राहण्याच्याच लायकीचा, तरीही त्याने उष्ण कटिबंधातील वातावरणाशी जुळवून घेतले हे विशेष.
ऋक्ष आणि उर्सुस यांच्यात आणखी एक साम्य आढळते. ऋक्ष म्हणजे सप्तर्षी नक्षत्र असाही अर्थ आहे. सप्तर्षी नक्षत्राला पाश्चात्यांत ‘दि ग्रेट बिअर’ किंवा ‘उर्सा मेजर’ असे म्हणतात. दोन्हींचाही अर्थ मोठे अस्वल असाच आहे.
ऋक्ष शब्दाचे ध्वन्यात्मक रूपांतर होऊन अच्छ शब्द अस्तित्वात आला. भल्ल हा शब्दसुद्धा नंतरचा. अच्छभल्ल हा सामासिक शब्द अस्वलवाचक आहे. तो पाली व अर्धमागधी वाङ्मयात आढळतो. अच्छभल्लचे मराठी रूप म्हणजे अस्वल.