नगारा वाद्य
नगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्या काळचे युद्धवाद्य होते. एक मोठ्या अर्धगोलाकार धातूच्या (तांबे, पितळ वा लोखंड) भांड्यावर म्हशीचे कातडे ताणून चढवले जाते. तोच नगारा! त्याची दोन भांडी असतात. मोठ्या भांड्याला नर तर लहान भांड्याला जील असे म्हटले जाते. ती भांडी तांबे, पितळ अथवा लोखंड या धातूच्या पत्र्यांची असत. वर्तमानात तयार केल्या जाणा-या त्या वाद्यात स्टील धातूचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे नगा-याच्या तोंडाचा व्यास दोन ते तीन फूट असतो. मोठ्या आकाराच्या नगा-याचा व्यास पाच फूटांपर्यंतदेखील असतो.
नगारा दोन बाकदार काठ्यांच्या सहाय्याने वाजवतात. नगारा वाजवणा-या व्यक्तीला नगारची असे नाव आहे. घोड्यावर बांधून वाजवण्याच्या लहान नगाऱ्यासारख्या दोन वाद्यांच्या जोडवाद्याला ‘डंका’ म्हणतात.
नगारा वाद्य देवालयांत वा उत्सव प्रसंगी वाजवले जाण्याची पद्धत चालत आली आहे. दिवसाच्या ठराविक वेळेस काल दर्शवण्यासाठीही याचा उपयोग केला जाई. आजही धार्मिक कार्यांमध्ये नगा-याचा वापर केला जातो.