नागपुरातील स्त्रियांचा वाद्यवृंद!
ती एक गृहिणी. तिला संसारात थोडा वेळ मिळू लागल्यावर तिच्या मनातील गाणे शिकण्याची जुनी उर्मी उफाळून वर आली आणि तिने एक दिवस थेट गाठले, नागपुरातील सर्वात जुने ‘बुटी संगीत महाविद्यालय’! गाण्याच्या वर्गात जागा नव्हती, पण सतारीच्या वर्गात होती. म्हणून तिने सतार शिकण्यास सुरुवात केली. तेथे तिला प्रसिद्ध दिलरुबावादक शुभदा पेंढारकर गुरू म्हणून लाभल्या... ती गृहिणी म्हणजे नंदिनी सहस्रबुद्धे. त्यांनी स्वतःसाठी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केलेला तो प्रवास अनेक स्त्रियांना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहासारखा विस्तारला आहे.
नंदिनी यांनी सतारवादनात ‘अलंकार’पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ‘एसएनडीटी (मुंबई)’, येथून एमएची पदवी मिळवली. त्यांना त्यांच्या माहेरून कलेचा वारसा लाभला आहे. नंदिनी या पूर्वाश्रमीच्या सुनीता बापट. त्यांचे श्रीकृष्ण (बाळ) बापट हे वडील जुन्या काळातील छायालेखक. त्यांनी ‘ऊनपाऊस’, ‘अवघाची संसार’, ‘जगाच्या पाठीवर’ या आणि त्या वेळी गाजलेल्या बऱ्याच मराठी चित्रपटांचे छायालेखन केले आहे. नंदिनी यांनी शाळेत असताना दोन वर्षे गाणे शिकून नंतर खेळांवर जास्त लक्ष दिले.