लहानपणापासून आपण जे जे चांगले अनुभवले ते ते आपल्या मुलांना अनुभवायला मिळावे, ही आंतरिक इच्छा कमीअधिक प्रमाणात सर्व पालकांमध्ये दिसून येते. शिवाय, पुन:प्रत्ययाचा आनंद कोणास नको असतो? म्हणून वेळ मिळताच, आपण आपले व मुला-नातवंडांचे फोटोआल्बम काढून बघतो आणि गतकाळातील आठवणींत रमून जातो. गणपतीचे आणि शिवाजी महाराजांचे केवळ नाव घेताच उत्साहाचे भरते येणारी मराठी माणसे, निव्वळ व्हिडिओ किंवा फोटोंमध्ये गुंतून न राहता, त्यांची भावसृष्टी नाटके व उत्सव यांच्या माध्यमातून सातत्याने पुनश्च उभी करतात.
अमेरिकेतदेखील हे वेड कमी नाही. तीनशे वर्षांपूर्वी युरोपातून आलेल्या स्थलांतरित मंडळींनी येथे जागोजागी छोटी इटाली, छोटे आयर्लंड, नवे इंग्लंड स्थापन करून, येथील गावांना युरोपातील गावांची नावे देऊन गतकाळाशी धागा जोडला आहे. केवळ इतके करून थांबतील तर ते पक्के अमेरिकन कसले? अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील व अंतर्गत युद्धातील निवडक लढायांच्या जागी जंगलात जाऊन त्या लुटूपुटूच्या स्वरूपात का होईना, पुन्हा लढण्याचा व अनुभवण्याचा छंदही हौशी मंडळी गेली कित्येक दशके जोपासत आहेत. अशा हौशी लोकांच्या सहवासात राहून, जात्याच उत्साही असलेल्या मराठी माणसांचे गुण द्विगुणित होणे हे ओघाने आलेच!