शिवडीचा भट्टीवडा
वडापावचा जन्म मुंबईत दादरमध्ये 1966 साली झाला. त्याला कै. अशोक वैद्य यांनी जन्माला घातले अशी माहिती वाचनात येते. दादरच्या छबिलदास शाळेसमोरचा 'श्रीकृष्ण वडा' दादरच्याच कीर्ती कॉलेजजवळचा अशोक वडापाव, पार्ल्याचा दिनानाथ नाट्यगृहासमोरचा वडापाव, भांडूपचा भाऊ वडापाव, ठाण्याचा कुंजविहार आणि गजानन वडापाव, गिरगावचा बोरकर वडापाव, फोर्टचा आराम वडापाव, कल्याणचा खिडकी आणि अंबर वडापाव हे विशेष प्रसिद्धीस पावलेले आहेत.
शिवडी कोळीवाडा येथील वडापाव तसाच चोखंदळ खाणाऱ्यांच्या तोंडी असतो. विठ्ठल शिंदे हे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर गावचे रहिवासी. ते मुंबईतील शिवडी येथे 1950 साली स्थायिक झाले. जवळच शिवडीची खाडी आणि खाडीजवळच्या पट्ट्यात शिवडी कोळीवाडा आहे. विठ्ठल शिंदे कोळीवाड्यात मासेविक्रीसाठी बसलेल्या कोळी लोकांना चहा आणि वडा पुरवण्याचे काम करत असत. सुरुवातीला, त्यांचा तो व्यवसाय फिरस्तीचा होता. पण मग जवळच एक जागा घेऊन विठ्ठलरावांनी शिवडी कोळीवाड्यातच कायम व्यवसायाचा श्रीगणेशा 1955 साली केला. सुरुवातीला, त्यांच्या वड्याची किंमत पंधरा पैसे इतकी होती. तेव्हा वड्याबरोबर पाव हा सहज खाल्ला जात नव्हता.