सूर्यकुंभ
सौर ऊर्जेचा वापर केवळ वीजनिर्मिती करण्यासाठी नसून, इतरही अनेक जीवनावश्यक गरजांसाठी करता येतो, या विचाराने प्रेरित होऊन एक अनोखा प्रयोग, मुंबईनजीकच्या भाईंदरजवळ उत्तन येथील ‘केशवसृष्टी’त ४ जानेवारी २०१४ या दिवशी पार पडला. ‘सूर्यकुंभ’ हे त्या प्रयोगाचे नाव.
सौर ऊर्जेचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे, सौर ऊर्जेचा वापर करून अन्न कसे शिजते हा प्रयोग त्यांनी स्वत: करावा या उद्देशाने या सूर्यकुंभ प्रयोगाची योजना आखली गेली. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने, केशवसृष्टीत ‘रज्जुभय्या एनर्जी पार्क’ची स्थापना केली गेली आहे. (त्याचे नाव आता ‘प्रो. राजेंद्रसिंग ऊर्जा अभियान’असे ठेवण्यात आले आहे.) ‘केशवसृष्टी’च्या कार्यालयातील उपकरणे त्या योजने अंतर्गत,सौर ऊर्जेवर चालवली जातात.