जयंत भालचंद्र उदगावकर – पार्किन्सनवरील उपचाराच्या शोधात
प्रा. जयंत उदगावकर प्रथिन संरचनेतील बिघाडासंबंधात संशोधन करत आहेत. त्याची मदत अल्झायमर, पार्किन्सन अशा आजारांवरील उपचारात होणार आहे. प्रा. उदगावकर सध्या पुण्याच्या 'आयसर'चे संचालक आहेत. जयंत भालचंद्र उदगावकर यांचा जन्म 22 मार्च 1960 या दिवशी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी हायस्कूल येथे झाले तर रसायनशास्त्रातील पदवीचे शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यांनी रसायनशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळाले. त्यांनी चेन्नई आयआयटीमधून एम एससी मिळवल्यावर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात 1986 साली पीएच डी केली. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात पोस्टडॉक्टरल फेलोशिप मिळवल्यावर प्रथिन आकार संरचना (Protein folding) या क्षेत्रात संशोधन केले. ते परदेशात न थांबता भारतात परत आले आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ (टीआयएफआर) च्या बंगलोर येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बॉयालॉजिकल सायन्सेस’ येथे रीडर म्हणून रुजू झाले. तेथेच त्यांना सहप्राध्यापक, प्राध्यापक व विभागप्रमुख होण्याची संधी मिळाली. त्यांच्यावर त्या संशोधन केंद्र प्रमुखपदाची जबाबदारी 1997 साली सोपवण्यात आली. ते पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) या संस्थेचे संचालक म्हणून 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यरत आहेत.