बदलाच्या दिशेने...


रेखा कालिंदीझारखंडची राजधानी रांचीकडून पुरूलियाकडे जाताना झालदा नावाचा प्रदेश लागतो. येथे बोडारोला नावाचे एक गाव आहे. पुरूलियातल्‍या इतर गावांप्रमाणेच येथेही शिक्षणाचा अभाव, गरिबी, बहुसंख्‍य विडीकामगार अशी स्थिती आढळते. अंधारात एखादी पणती मिणमिणत असावी, तशी भासणारी रेखा कालिंदी मला येथेच भेटली. दोन वर्षांपूर्वी रेखाने अज्ञानात पिचत पडलेल्‍या गावात बदलाचे बी रोवण्‍याचे काम केले. या बिजाला कोंब फुटू लागले असल्‍याचे चित्र आज या परिसरात पहायला मिळत आहे.

रेखा कालिंदी. वय वर्षे फक्‍त चौदा. ती बारा वर्षांची असतानाच तिच्‍या गरिब पित्‍याने तिचे लग्‍न जुळवण्‍याची खटपट सुरू केली, मात्र रेखाने त्‍यास सक्‍त विरोध करत लग्‍न करण्‍यास नकार दिला. बालविवाहाच्‍या परंपरेविरूद्ध रेखाने आवाज उठवताच तिला चांगलेच दटावण्‍यात आले आणि तिचे लग्‍न जबरदस्‍तीने लावण्‍याचे प्रयत्‍न सुरू झाले. हे समजताच रेखाने आपल्‍या परिसराच्‍या लेबर कमिश्‍नरला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. परिणामी रेखाच्‍या पालकांना तिचे लग्‍न करण्‍याचा निर्णय मागे घ्‍यावा लागला.