सोशल मीडिया म्हणजे गावगप्पा!
सोशल मीडिया गेल्या दहा वर्षांत जगभर फैलावला. काही लोकांना तो रोगासमान वाटतो, म्हणून त्यावरील मेसेज खूप झपाट्याने पसरला तर त्याला ‘व्हायरल’ झाला असेच म्हटले जाते. म्हणजे त्याचे मूळ विषाणू व्हायरस आहे; जीवाणू (बॅक्टेरिया) नाही. खरोखरीच, फेसबूक, व्हॉट्स अॅपवरील मेसेजेस, पोस्ट्स या विषवल्ली आहेत का? त्यातील माहिती इतकी समाजविघातक, विकृत असते? कोणी वर वर, ते संदेश, लेखन चाळले तर तसे वाटणार नाही. साधी, एका माणसाने दिलेली माहिती दुसऱ्या दुसऱ्या माणसापर्यंत त्यामार्फत पोचत असते. माहिती दूरवर पोचवण्याची ती आधुनिक तऱ्हा आहे. आचार्य अत्रे यांची गेल्या शतकाच्या पूर्वार्धातील गोष्ट आहे, ‘बोलका ढलपा’ नावाची. त्यातील एक रावसाहेब माणूस लाकडाच्या तुकड्यावर बाजूला पडलेल्या चुन्याने की कोळशाने काही खरडतो व समोर नोकरासमान उभा असणाऱ्या निरक्षर आदिवासी माणसास तो ढलपा घेऊन जाण्यास सांगतो. रावसाहेबाचा निरोप पंतमाणसाला कळतो. तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरतो. तो आदिवासी निरक्षर माणूस अचंबित होतो. त्याला रावांचा निरोप पंतांना कळला कसा याचे आश्चर्य वाटते. सोशल मीडियाकडे पाहण्याची सर्वसाधारण दृष्टी अशी निरक्षराची आहे. मीडिया म्हणजे गावगप्पा! पूर्वी गावच्या पारावर गावातील माणसे जमायची, आणि त्यांच्या विविध तऱ्हेच्या गप्पागोष्टी चालायच्या. शेतीचे प्रश्न, धर्माच्या गोष्टी, गावातील गॉसिप असे सर्व बोलणे तेथे होई. कधी त्यांना कुचाळक्यांचे स्वरूपदेखील येई. आधुनिक तंत्रसाधनांचा वापर सर्रास व सर्वत्र झाल्यानंतर जग हे एक खेडे आहे असे त्याचे वर्णन केले जाऊ लागले, कारण संपर्क वाढला.