विशेषांचे मनसोक्त जगणे! - ‘सहवास - अ केअर!’
समाधान सावंत यांची जळगावला कासोदा येथे विशेष (मतिमंद) मुलांची काळजी घेणारी ‘सहवास - अ केअर’ नावाची संस्था आहे. संस्था सुरू होऊन चार वर्षें झाली. जळगाव जिल्ह्यात विशेष (मतिमंद) मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतपत आहेत; त्या मुख्यत: अठरा वर्षांच्या आतील मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था. पण खरा प्रश्न मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर काय? सरकार त्या वयानंतरच्या दिव्यांगांना सांभाळण्यास अनुदान देत नाही. समाधान सावंत यांनी वेगळी दुनिया ‘सहवास’ या नावाने तशाच अठरा वर्षांवरील विशेष मुलांसाठी उभी केली आहे. त्या सगळ्यांनी तेथे यावे. त्यांनी छानपैकी जेवण करावे, खेळावे, टीव्ही पहावा- त्यासोबत काही गमतीजमती कराव्या असे सारे डोक्यात ठेवून संस्था उभारली आहे. मी संस्थेत पाय ठेवल्या ठेवल्या तेथील विशेष मुलगा मला विचारू लागला, की “तू कोण?” मी त्याला म्हणालो, “पाहुणा आलोय तुमच्याकडे”. त्याने लगेच स्वागत केले. बाकीजण कॅरम खेळण्यात दंग होते. त्यांना समजले, की कोणीतरी नवीन व्यक्ती आली आहे. म्हणून सगळ्यांनी एकसाथ स्वागत केले. त्यांच्यातील एकजण उठला आणि त्याने गुलाबपुष्प दिले. त्याचे स्वागताचे काम झाले आणि तो मस्तपैकी गादीवर जाऊन बसला. बाकीचे पुन्हा कॅरम खेळण्यात दंग झाले.