थट्टा अंगाशी आली..


थट्टा अंगाशी आली...
नव्हे...डोक्यावर बसली !


आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले आद्य विडंबनकार! 'झेंडूची फुले' हा त्यांच्या विडंबन काव्यांचा संग्रह सर्वपरिचित आहे.
अत्र्यांच्या विडंबनाचा फटका ब-याच लोकांना बसला. त्यातून मैत्रीच्या संबंधात काहींशी वितुष्ट आले, पण ते फार काळ टिकले नाही. या विडंबनाचा फटका समर्थ रामदासांनाही बसला. अत्र्यांनी मनाच्या श्लोकांचे विडंबन केले. त्यातला एक श्लोक प्रसिध्द आहे.

मनासज्जना,चार आण्यांत फक्त।
तुला व्हावयाचे असे देशभक्त ॥
परि सांगतो शेवटी युक्ति सोपी ।  
खिशामाजी ठेवी सदा गांधी टोपी ॥   

अत्र्यांनी जेव्हा या काव्यपंक्ती लिहिल्या तेव्हा गांधी टोपीचा प्रसार सर्वत्र झाला होता. ते देशभक्तीचे प्रतीक ठरले होते. गांधीटोपीची किंमत चार आणे होती.

हे विडंबन प्रसिध्द झाल्यानंतर काही वर्षांनी, अत्र्यांना जेव्हा पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांना सर्व प्रथम चार आणे खर्च करून गांधीटोपी विकत घ्यावी लागली. आणि त्यांच्याच विडंबित श्लोकाप्रमाणे कृती करावी लागली.

लेखसूची..


लेखसूची.. प्रेषक - प्रमोद शेंडे

मायबोली - मराठी विषय विविधपैलंचे दर्शन - दै सकाळ

विविध लेखक. दि. 23 नोव्हेंबर 2009 पासून दररोज ( रविवार सोडून)

ती स्वाती - प्रतिमा जोशी.... महाराष्ट्र टाइम्स... दि. 2 जानेवारी 2010

( पाकिस्तानातील स्वाग खो-यात तालीबान्यांचा बिमोड होवून तेथील जनता पूर्वपदावर येत आहे. तेथील छोट्या मुली म्हणजे "स्वात" च्या भवितव्याचे रुपक आहे. त्याबद्दल)

धान्यापासून अखंड उर्जा ---- सोनाली कोलारकर-सोनार.... लोकसत्ता चतुरंग... दि. 2 जानेवारी 2010

धान्यापासून महानिर्मिती करण्याऎवजी (सडक्या) पोचट व कमी प्रतिच्या धान्यापासून बायोगॅस-सयंत्र करणा-या व आंतरराष्ट्रीय अँशडेनचा मानाचा पुरस्कार मिळवणा-या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्या महत्त्वपूर्ण शोधाविषयी...

विहंगम पृथ्वीलोक - अपर्णा मोडक... लोकसत्ता चतुरंग... दि. 2 जानेवारी 2010

फेंच छायाचित्रकार यान बेयाँ यांनी देशोदेशीच्या निसर्गाचे आकाशातून केलेले अप्रतिम छायाचित्रण फ्रान्सच्या दुतावासातर्फे मुंबईच्या जनतेला पहाण्यासाठी मरीन लाईन्स प्रदर्शन आयोजित केले आहे. ह्या प्रख्यात छायाचित्रकाराविषयी ही माहिती..

टॉवर-मानसिक न्यूनगंडाचे प्रतिक- दत्ता परब लोकसत्ता वास्तुरंग... दि. 2 जानेवारी 2010

टॉवर संस्कृतीचे तोटे

तेजाची न्यारी दुनिया - श्री. श. क्षीरसागर - लोकसत्ता चतुरंग 19 डिसेंबर 2009

बोटभर उंचीच्या कीटकभक्षी "ड्रोसेरा" ह्या वनस्पतीची ही चंदेरी तेजाचीन्यारी दुनिया पाऊस संपता संपता डोंगरद-यात हिंडून अनुभवता येते.

मानवी बाँम्बचा कारखाना - पाकिस्तानातील दारा इस्माईलखान ह्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याचे केलेल्या कारवाईत आत्मघाती बाँम्बचा कारखानाच आढळून आला. इम्तियाज गुल यांनी लिहिलेल्या "द अल् कायदा कनेक्शन" या पुस्तकाचा परिचय... अरविंद गोखले

लोकसत्ता- रविवार दि. 3 जानेवारी 2010

- अमृत दिवाळी अंक 2001 मधील उल्लेखनीय लेख.....

मंदिरांच्या शोधात - श्री निवास गडकरी

पुण्याचे श्री मोरेश्वर व सौ. विजया कुंटे हे दाम्पत्य गेली 14 वर्षे महाराष्ट्र पालथा घालत आहेत ते मंदिरांची माहिती गोळा करण्यासाठी आतापर्यंत जवळपास 1600 मंदिरे पाहून त्यांची संपूर्ण माहिती उदा. त्या जागेचे धार्मिक महात्म्य, मूर्ती शिल्पकाम त्यातील प्राणी विश्व इ.) गोळा करीत आहेत.

बंडापूर्वीची दिल्ली ( भाग- पहिला) - डॉ. शरद अभ्यंकर

लेखक विल्यम डार्लिपल व अल्ताफ हुसेन डाली या कवीनी केलेले 1857 च्या बंडापूर्वीचे दिल्लीचे मनोरंजक वर्णन त्यावेळच्या लोकांच्या चालीरीती, तेथील लोक , शिक्षण पद्धती, आहार विहार यांचे वर्णन.

आभासी शरीर - अर्थबोधपत्रिका भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी औषधांच्या निरनिराळ्या चाचण्या व त्यांचे परिणाम शोधण्यासाठी आभासीशरीर ( व्हर्चुअल फिजिआँलॉजीकल ह्यमून) बनविण्याचे संशोधन जोरात चालू आहे. त्याबद्दलचा वृत्तांत 

संरक्षित घर


2009माणसाला आपल्या जीव-जुमल्याचे संरक्षण करण्याची फिकीर कोणत्याही काळात असते. आज मुंबई-पुण्यात सुरक्षित गृहसंकुले बांधण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चहुबाजूंनी कोट असतो. प्रवेशद्वारावर गुरखा असतो. आलेल्या पाहुण्याची चौकशी केल्यावर त्याला आत सोडले जाते. अनेक ठिकाणच्या कंपाउंडच्या भिंती आठ फूट उंच असतात. तसाच हा नाशिकचा जुना वाडा. भुरटया चोरांपासून रक्षण करणारा. याच्या तळमजल्यावरच्या भिंती भक्कम दगडाच्या आहेत. तळमजल्यावर खिडक्यांच प्रमाण कमी असून वाड्यात शिरण्यास एकच दरवाजा आहे.
पैठणचा वाडा, मे 1979.

तसेच हे पैठणचेही एक जुने घर. वास्तविक पैठण आणि नाशकात पुष्कळ अंतर आहे.तरीही गृहसंरक्षणाची कल्पना बदललेली दिसत नाही. तसं पैठणमधलं एका माहेश्वरी कुटुंबाचं हे घर. ते तीनशे वर्षांपूवी बांधलं गेलं आहे. असं कळलं. जसा काही किल्लाच! या घरातही चौक आहे. तळमजल्यावरच्या भिंती दगडाच्या आहेत आणि खिडक्या नाहीत. प्रवेशद्वारातून आत गेलं की चौक आहे. मोठ्या कुटुंबाला दोन वर्षें पुरेल इतक्या धान्याचा साठा करायची सोय आहे. या घरातलं स्वैपाकघर मोठं असून चुलीतला धूर निघून जाण्यासाठी उंच छताखाली खिडक्या आहेत. या घराचे प्रवेशद्वार किल्ल्याच्या दरवाजासारखे आहे

तुरुंगातले काव्य


आचार्य अत्रे यांना अटक 27 जानेवारी 1956 रोजी होऊन त्यांची रवानगी
ऑर्थर रोडच्या तुरुंगात करण्यात आली.
ऑर्थर रोड तुरुंगातल्या वास्तव्याच्या दुस-या दिवशी
नमस्ते श्री महाराष्ट्रा,
भारताच्या जवाहरा,
तीन कोटी मराठयांच्या
मायबापा मनोहरा !

हे काव्य जन्माला आले त्याच वेळेला अत्र्यांच्या मनात विचार आला की या काव्याचा धागा असाच लांबवत ठेवला तर? ... तर 'महाराष्ट्र-गीता' निर्माण होईल!
अत्र्यांची 18 फेब्रुवारी 1956 रोजी  ऑर्थर रोड  तुरुंगातून ठाण्याच्या तुरुंगात बदली झाली. त्यांना 20 फेब्रुवारी 1956 रोजी ऑर्थर रोड तुरुंगातून ठाण्याला हलवण्यात आले. तर भायखळा ते ठाणे असा रेल्वे प्रवास करत,  ते पोलिसांसह ठाणे स्टेशनवर पोचले, पण ठाणे तुरुंगात नेण्यासाठी कोणीच आले नसल्याने तो गोतावळा वाहनाची वाट बघत बसला.

अत्र्यांची ठाणे तुरुंगात बदली झाली असून ते पोलिस पहा-यात ठाणे स्टेशनवर आले आहेत, हे समजताच लोकांनी तिथे गर्दी केली. त्या गर्दीत कोणीतरी आचार्य नरेंद्र देव यांच्या निधनाची वार्ता अत्र्यांना सांगितली.
आचार्य नरेंद्र देव हे थोर विचारवंत, त्यांचा जन्म पुण्याजवळ देहुरोड नजीकच्या परंदवडी या गावी झाला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर त्यांना गुरुस्थानी मानत असत. आचार्य नरेंद्र देव यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर अत्र्यांना अतिशय दु:ख झाले, पण त्या मनस्थितीत सुध्दा त्यांना ज्या उत्स्फूर्त काव्यपंक्ती सुचल्या त्या वाचून हसू येते. त्या काव्यपंक्ती अशा-

शंकर देवा सोडून देवा,
नरेंद्र देवा का नेले?
आणि सदोबा समोर असता
दृष्टींतून ते कसे सुटले?

मी महाराष्ट्राचा - महाराष्ट्र माझा !


राज श्रीकांत ठाकरे. जन्म 14 जून 1968. एक युवा नेतृत्त्व, एक कलाकार, मित्रांचा मित्र, रसिक, जे.जे.स्कूल ऑफ आर्टस चा विद्यार्थी, व्यंगचित्रकार म्हणून लौकिक पावलेले हे नाव. व्यंगचित्राकलेबरोबरच राजकारणाचे धडे घरीच आपल्या काकांकडून (बाळासाहेब ठाकरे) घेतलेला हा तरूण.

शिवसेनेत असताना आणि नसतानाही जी मोजकी माणसे कायम चर्चेत असतात त्यांपैकी राज ठाकरे हे एक. राज हे उत्तम व्यंगचित्रकार असल्याने बहुधा बेधडक भाष्यकार, बोचरे टीकाकार, विरोधकांच्या  फिरक्या घेणारे असे आहेत. राज राजकारणातही आत्मविश्र्वासाने उतरले आणि  त्यांनी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' ही तंत्र पक्षसंघटना काढून राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांचे राजकीय जीवन अनेक वादग्रस्त घटनांनी भरलेले आहे.

राज यांना चित्रपटांची आवड आहे. भविष्यात; कॉलेजमध्ये असल्यापासून करायची आवड आहे. त्यांनी बेकार तरुणांचा नागपुरात मोर्चा काढला. 2000 साली तरूणांना प्रेरक, मार्गदर्शक असा भव्य कार्यक्रम पुण्यात घेतला- 'झीरो टू हीरो'. राज ठाकरे ह्यांचे नेतृत्त्व कौशल्य लक्षात घेऊन बाळासाहेबांनी 'विद्यार्थी सेने'ची संपूर्ण जबाबदारी ह्यांच्यावर सोपवली व ती त्यांनी समर्थपणे पेलली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यी संघटन करून त्यांना प्रोत्साहन दिले, प्रेरित केले, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थी हा इतर राजकारण्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेला घटक. पण प्रचंड ऊर्जा असलेली ही शक्ती आपल्या कुशल नेतृत्वाने केली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबरोबर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचा प्रश्न हाताळताना शैक्षणिक, चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग आयोजित करून बेरोजगारांचा बौध्दिक विकास करण्याबरोबरीने त्यांस रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या 'शिव उद्योग सेने’ च्या  माध्यमातून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचा प्रश्न यशस्वीपणे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद, मी मुंबईकर मोहीम, परप्रांतीयांचे अतिक्रमण, मराठी माणसांच्या नोक-यांचे प्रश्न (मराठी अस्मिता), भुमिपुत्रांचे हक्क इत्यादी उपक्रमांत राज ठाकरेंचा सहभाग असतो.

'आम्ही कसे घडलो!' हा मान्यवरांच्या अनुभवांचे बोल युवकांना अनुभवण्याची संधी देणारा कार्यक्रम असेल अथवा 'जिगर 2000' सारखा महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम असेल, अशा दिशादर्शक कार्यक्रमांच्या आयोजनामधून तमाम मराठी तरूणांमध्ये नवी उमेद, धडाडी, जिगर निर्माण करून त्यांना दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य राज ठाकरे यांनी केले आहे. मराठी मनामध्ये असणारा 'न्युनगंड' कमी करून व्यावसायिक दृष्टी आणणारा मराठी तरूण निर्माण करण्यामध्ये राज ठाकरे यांचा कटाक्ष आहे. पक्षांतर्गत राजकारणामध्ये होणारी घुसमट मराठी माणसाला घडवण्यासाठी उराशी बाळगलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणताना होणारी पक्षांतर्गत कुचंबणा, स्वत:सोबत असंख्य कार्यकर्त्यांच्या विचारांची कोंडी होत आहे हे वारंवार बोचणारे शल्य इत्यादी बाबींचा विचार करता यातून नवनिर्माणाचा मार्ग शोधता शोधता, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' या राजकीय पक्षाचा जन्म 9 मार्च 2006 रोजी झाला.

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' एका युवा नेत्याच्या कल्पनाविष्कारातून जन्माला आलेला अन् महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची स्वप्ने महाराष्ट्रीय जनतेस दाखवणारा राजकीय पक्ष आहे पक्ष नवीन आहे. भोवताली सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांचे जंजाळ आहे. अशा स्थितीतही नवे मार्ग शोधण्याची धडपड उल्लेखनीय रीत्या सुरू आहे. प्रस्थापित नेतृत्त्वाच्या मागे न लागता महाराष्ट्राला विकासाची ओळख करुन देण्यासाठी आवश्यक असणा-या वाटा शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वत: आपल्या परीने करत आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी, वीज, रस्ते, शेती, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासोबतच सुंदर, स्वच्छ, विकसित आणि आधुनिक शहरे निर्माण करणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्राथमिकता आहे. विकासाची फळे तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबध्द असून, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वत:सोबत आपल्या मराठी बांधवांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रांत रोजगार व निर्मितीसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत जनजागृती करून एक संवेदनशील मराठी माणूस घडवणे यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्राधान्य देणार आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीत मोठया संख्येने निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची संख्या पाहता महाराष्ट्राने राज ठाकरेंवर दाखवलेल्या विश्वासाची प्रचीती येते.
विविध क्षेत्रांतील तसेच विविध वयोगटातील मित्रांचा गोतावळा असणारे  राज ठाकरे व्यक्तिगत जीवनात 'मित्रांचा मित्र' म्हणून ओळखले जातात. शिवाजी महाराजांच्या अडीचशे गडकोटांच्या चाळीस हजार छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस' मध्ये नोंद होण्यासाठी तरुणांच्या धडपडींमध्ये काही कमतरता राहणार नाही. यासाठी दक्ष असणारा राज, मराठी युवकांमध्ये मराठी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणारा राज, आपल्या आदरणीय नेत्याचा जीवनपट जगाला उलगडून दाखवण्यासाठी 'बाळ केशव ठाकरे-अ फोटोबायोग्रफी' हे पुस्तक जिद्दीने व चिकाटीने पूर्ण करणारा राज, पैशांअभावी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता असूनही परदेशी स्पर्धेला मुकणा-या खेळाडूला सर्वतोपरी साहाय्य करणारा राज.... राज ठाकरे यांच्या स्वभावाच्या विविध छटा आपणास पहावयास मिळतात.

एकूणच 'राजकारण' असो वा 'मैत्री', जे करू ते संपूर्ण निष्ठेने, एकग्रतेने व कौशल्याने करण्याची हातोटी राज ठाकरेंना लाभली आहे. मराठी युवकांना प्रोत्साहन, पाठिंबा देणारा हा ख-या अर्थाने मराठी युवकांचा युवक प्रतिनिधी असल्याची प्रचीती क्षणोक्षणी दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे असे मानणा-या काही मोजक्या राजकारण्यांमध्ये राज ठाकरे यांचा क्रमांक निश्चितच अव्वल आहे. मला रिमोट कंट्रोल किंवा सॅटेलाईट व्हायला आवडेल हे त्यांचे एका मुलाखतीतील उद्गार त्यांच्या कर्तृत्वाचे सूचक आहेत.

- प्रसाद क्षीरसागर

दोन विनोदवीरांची जुगलबंदी!


आचार्य अत्र्यांप्रमाणेच शा.दादा कोंडके हे महाष्ट्रातील प्रख्यात विनोदवीर! हजरजबाबीपणात दादांचा हात धरू शकेल असा माणूस शोधून सापडणार नाही. दादांशी गप्पा मारायला जायच म्हणजे ते बोलतील ते सगळा वेळ ऐकायचं आणि पोट दुखेपर्यंत हसायचं! हसून हसून पोट दुखलं हे दादांशी गप्पा मारताना अनुभवायला यायचं!

'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचे प्रयोग त्यावेळी जोरात चालले होते. हा नाट्यप्रयोग म्हणजे दादांच्या हजरजबाबीपणाची कमाल होती. चालू घडामोडींवर दादांनी मारलेले टोमणे हे अनेकांना हसवून गेले तर अनेकांना पोटदुखी करून गेले. आचार्य अत्रे यांचा उल्लेख या नाटकात एकदा होत असे तर कोतवालाच्या लग्नप्रसंगात 'मराठा'चा उल्लेख होत असे ते दोन प्रसंग असे-

राजा: काय हे! आमच्या राज्याचा कोतवाल एवढा आजारी आणि आम्हाला खबर नाही? प्रधानजी! राजवैद्यांना त्यांची प्रकृती दाखवायला सांगा.

प्रधान: दाखवली महाराज!

राजा: कोणाला?

प्रधान: आपले ते हे...(हवालदाराला उद्देशून) तू सांग रे!

हवालदार: (गोंधळतो) आपले ते हे...म्हणजे डॉक्टर लागू!

राजा: (आश्चर्याने) लागू? पण आमचे फॅमिली डॉक्टर कुलकर्णी असताना हे लागू कुठून आले?

हवालदार: आले नाहीत. अत्र्यांनी आणले.

यात हवालदाराची भूमिका दादा करायचे. त्यावेळी रंगभूमीवर आलेलं आचार्य अत्र्यांचं 'डॉ.लागू' हे नाटक जोरात सुरु होतं. त्यामुळे डॉ.लागू अत्र्यांनी आणले हे खरचं होतं.

नाटकाचा शेवटचा प्रसंग! कोतवालाचं मैनावतीशी लग्न होत आहे. तयारी करताना कोतवाल शिपायाला बाशिंग बांधायला सांगतो. शिपाई कोतवालाला बाशिंग बांधण्याऐवजी आपल्याच डोक्याला बांधू लागतो. कोतवाल ओरडून हवालदाराला ते दाखवतो-

कोतवाल: हे हवालदारऽऽ! हे येडं बघ, ए!

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या.(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस-चारसोबीस, ए दरवडेखोर हरामखोर....

आयला! बरं झालं सकाळी 'मराठा' वाचला.

यावर नाटयगृहात एक प्रचंड हास्यकल्लोळ उसळायचा. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांची विशेषणं प्रेक्षकांनी 'मराठया'त वाचलेली असायची.

दादांच्या विनोदानं 'पोटदुखी' लागलेल्या कोणीतरी अत्र्यांकडे,''दादा कोंडके तुमची बदनामी करतो' अशी चुगली केली. अत्र्यांनी वसंत सबनीसांना निरोप पाठवला ''जरा त्या कोंडक्याला माझ्याकडे घेऊन या.''

वसंत सबनीसांना विषय काय असावा त्याची कल्पना आली. कारण खूप दिवस आधीपासून ते दादांना समजावून सांगत होते.''दादा, तू अत्र्यांच्या नादाला लागू नकोस. त्यांनी भल्याभल्यांची चड्डी सोडली. आपण तर किस झाड की पत्ती,''

दादांनी सबनीसांचं बोलणं ही मनावर घेतलं नाही आणि टोमणे मारणं बंद केलं नाही. अत्र्यांचा निरोप आल्यावर वसंत सबनीस म्हणाले,'' दादा. तुला सांगूनसुध्दा तू ऐकलं नाहीस. खा आता शिव्या, अत्र्यांनी मला तुला घेऊन बोलावलंय.''

दादा आणि सबनीस, दोघं 'मराठा'च्या कार्यालयात पोचले. अत्र्यांच्या केबिनमध्ये गेले. पाठोपाठ चहा आला.

''बसा, सबनीस. चहा घ्या. आज काय काम काढलत?''
काही नाही. कोंडकेला घेऊन आलोय.''

'' हेच का ते ? काय हो तुमच्या नाटकात तुम्ही आमची बदनामी करता.''

दादा अतिबेरकी! त्यांना अत्रे साहेबांना नाटकाच्या प्रयोगाला बोलवायचं होतं. ती संधी आयती चालून आली होती.

'' साहेब! आपण आमचं नाटक बघायला या. तुम्हाला जर वाटलं की मी आपली बदनामी करतोय तर पुढच्या प्रयोगातून तो भाग गाळून टाकू.''

'पुढच्याच प्रयोगाला येतो' असं अत्र्यांचं आश्वासन घेऊन दादा आणि सबनीस तिथून निघाले.

प्रयोगाचा दिवस उजाडला. नाही म्हटलं तरी दादांच्या मनात चलबिचल चालू होती. दुरुन अत्रे  साजरे दिसले तरी त्यांच्याशी भेट झाल्यावर दादांची थोडी गडबड उडालीच होती.

गण, गवळण, बतावणी झाली. मध्यंतरात अत्र्यांनी आत जाऊन दादांना विचारलं, ''ते आम्हाला मारलेले टोमणे कधी आहेत?''

''ते वगात आहेत. वग पूर्ण बघायवाच लागेल आपल्याला त्यासाठी.'' दादा.

झालं. वग सुरू झाला.'डॉ.लागू अत्र्यांनी आणले' या विधानाला साहेबांनी हसून दाद दिली. साहेब नाटक पाहण्यात रंगून गेले.

शेवटचा प्रसंग आला. कोतवाल हवालदाराला उद्देशून म्हणाला 'हे हवालदारऽऽ हे येडं बघ ए!''

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या...(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस चारसोबीस, ए दरवडेखोर

हरामखोर... आयला! बरं झालं सकाळी मराठीतलं एक वृत्तपत्र वाचलं....

यावर अत्रे ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले ''ए गाढवा!! 'मराठा' म्हण'' मग पुन्हा दादांनी ते वाक्य 'मराठा'चा उल्लेख करून म्हटलं.

दादांनी 'मराठा'चा उल्लेख करणं ही 'मराठया'ची किंवा अत्र्यांची बदनामी नव्हती तर तो सन्मान होता. मग असा सन्मान अत्रेसाहेब कसा नाकारणार?

आचार्य अत्रे यांच्यामध्ये गुणग्राहकता होती, अत्र्यांनी आवर्जून 'मराठा'चा उल्लेख करायला लावला हा जणू दादांसाठी आशीर्वादच ठरला!

'मंत्रा'वेगळा आशुतोष गोवारीकर...


भारतात काय किंवा जगभरात, कुठेही काय, चित्रपटसृष्टीतले ग्लॅमर बहुधा कलावंतांच्या खात्यावर जमा होते. चित्रपटनिर्मितीचा मुख्य सूत्रधार आणि श्रेय किंवा अपश्रेयांचा धनी हा, खरे तर, दिग्दर्शक असायला हवा. परंतु बहुतांश, सगळे तेज आणि सगळे वलय कलावंत लुटून घेऊन जातात आणि दिग्दर्शकाला मिळते आपण कॅप्टन असल्याचे केवळ मानसिक समाधान! आशुतोष गोवारीकर हा याबाबत सन्माननीय अपवाद ठरला आहे. कोल्हापूरचे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि व्ही. शांताराम यांच्यामागून दमदारपणे पावले टाकणारा आशुतोष गोवारीकर हा तरुण दिग्दर्शक कोल्हापूरने देशाला दिला. त्याने उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसला. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत दिसला. पण त्याला अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला 'पहला नशा'  हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. तो दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेला. तो दिग्दर्शन करताना आपण अभिनेता असल्याचे जाणीवपूर्वक विसरतो. आशुतोषला हिंदी सिनेमातील व्ही. शांताराम, गुरुदत्त, राज कपूर आणि मनोजकुमार प्रभृतींनी दिग्दर्शनाबरोबर अभिनय केल्याने त्यांच्याबद्दल आदर आहे.

मतिमंदांची कलासाधना


‘विश्वास’चा अर्थ ‘ट्रस्ट’. अरविंद सुळे ह्यांच्या डोक्यात या शब्दाविषयीची जाणीव फार मोठी. ती अशी, की आपण ज्यांना मतिमंद म्हणतो त्या व्यक्ती/ती मुले मुळात हुशार असतात. परंतु डॉक्टर मंडळी मात्र त्यांच्या मेंदूत असणा-या कमतरतेविषयी बोलतात. “ही अशी मंडळी कुणावर तरी अवलंबून राहणार, त्यांची प्रगती होणार नाही,” ह्या अशा दृष्टिकोनामुळे ज्यांच्या त्यांच्या स्वत:च्या पालकांचेदेखील प्रोत्साहन मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अशा व्यक्ती निकामी होतात. सर्वत्र असणा-या अशा समजामुळे आणि विशेषत:, त्यांच्या स्वत:च्या पालकांना ह्या नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी, आधी त्यांच्या हृदयात विश्वास  निर्माण केला पाहिजे. म्हणून सुळे ह्यांनी ‘विश्वास’ ह्या नावाचाच ट्रस्ट निर्माण केला!  सुळे म्हणतात, की “स्वत:च्या घरी जी जी कामे मुलांना करू दिली जात नाहीत ती ती कामे मुले इथे करतात. त्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार रूजवल्यामुळे मुले केर काढतात, सतरंज्यांच्या घड्या व्यवस्थित घालून त्या विशिष्ट जागेवर नेऊन ठेवतात. अशा पध्दतीची ही  कामे त्यांच्याकडून घरी पालक मंडळी करून घेत नाहीत. स्वत: पालकांनी मुलांच्या समजशक्तीबद्दल अविश्वास दाखवणे आम्हाला पटत नाही”.

ते म्हणतात, की ‘मतिमंद’ असा उल्लेख वारंवार करणे आम्हाला मान्य नाही. ‘विश्वास’ हे पाळणाघर नाही. आमची मुले स्वत: उसळी, सॅलड असे पदार्थ तयार करतात. त्यांनी तयार केलेले पदार्थ आम्ही त्यांनाच खायला देतो. त्यामुळे त्यांच्या ठायी आत्मविश्वास वाढायला मदत होते. लसूण सोलणे, वाल सोलणे ह्या क्रियांमुळे त्यांच्या बोटांची हालचाल नैसर्गिक रीतीने होऊ लागते.

लेखसूची...


मराठी नियतकालिकांत विविध विषयांवर लेखन सतत प्रसिद्ध होत असंत. अशा लेखनाची सूची करण्याचा व शक्य तिथं त्या लेखांची लिंक देण्याचा प्रयत्न इथं असणार आहे. लोकांसमोर अनेक विषयांवरील ज्ञान यावं, त्यांनी ते भ्रमराप्रमाणे टिपावं आणि अखंड ज्ञानसाधना चालू ठेवावी ही सदिच्छा. ह्या सूचीचा संग्रह होऊन वर्षअखेर किंवा केव्हाही, तुम्हाला लेखाचा संदर्भ गवसू शकेल. तुम्ही देखील लेखांची माहिती कळवू शकता.

साद वैचारिकता


बाळशास्त्री जांभेकरांपासून बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा काळ महाराष्ट्रात प्रबोधन काळ म्हणून मानला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील बौद्धिकता लोपली आणि तेथे बुद्धिमांद्य पसरले. त्याचे एक उघड कारण त्या कष्टमय काळातील भौतिक विकासाची गरज हे होते. त्यामुळे सुशिक्षित समाज उद्योग-व्यवसायाच्या, करियरच्या पाठी लागला. त्यात बूडून गेलां परंतु गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अनेक नंव नवीन ज्ञानशाखांचा उदय झाला. सुशिक्षित मंडळी त्यांना कौशल्याने सामोरी गेली. प्रश्नांचा उत्तरे शोधण्याच्या जुन्या पद्धती, जुने वाद, जुने इझम काळाच्या पडद्याआड झाले. मात्र या ओघामध्ये बौद्धिक, वस्तुनिष्ठ, विवेकपूर्ण चर्चा मंदावल्या. साद वैचारकत्तेला या विभागामधून बुद्धिगम्य वातावरणाला वाव देण्याचा प्रयत्न असणार आहे. समकालीन सामाजिक, सांस्कृतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर येथे दर आठवड्याला एक ना दोन टिपण वितरीत केली जाईल आणि त्यावर मते-मतांतरे व्यक्त होत राहतील. ह्या चर्चेत रूढ धर्तीचा विचारांना फारसा वाव दिला जाऊ नये असा प्रयत्न आहे.