गांधींना आगळीवेगळी आदरांजली


महात्मा गांधींचा स्मृतिदिन 30 जानेवारीला असतो. ठाण्याच्या सुरेंद्र चौधरी ह्या पुस्तकवेडया व्यावसायिकाला त्या दिवशी एक वेगळेच पुस्तक मिळाले. त्यांचा व्यवसाय बिल्डिंग सुपरवायझर व इंटिरियर डेकोरेटरचा, पण हा माणूस रमतो पुस्तकांत व नाटकांत. त्याला मिळालेल्या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘द पेन इज माइटियर’ आणि उपशीर्षक,  ‘ द स्टोरी ऑफ द वॉर इन कार्टून्स’. ते संपादित केले आहे जे. जे. लिंक्स यांनी. पुस्तकाच्या आरंभीच गोयाने काढलेले मार्क्सचे चित्र आहे. ते येथे प्रदर्शित केले आहे. हे पुस्तक त्यांना दादरच्या रद्दीवाल्याकडे मिळाले. पुस्तक  युद्धोत्तर, 1946 साली प्रकाशित झाले.

परंतु चौधरींना पुस्तकाचा विशेष वाटला, तो म्हणजे एक -त्यात असलेले गांधीजींचे व्यंगचित्र आणि दोन - ह्या पुस्तकात डेव्हिड लो ह्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे एकही चित्र नसणे! गांधींचे व्यंगचित्र एका मेक्सिकन व्यंगचित्रकाराने रेखाटले आहे.

पुस्तकात दीडशे व्यंगचित्रे आहेत. त्यात कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानापासून दोस्त राष्ट्रांच्या युद्धातील विजयापर्यंत अनेक विषय येतात. एका व्यंगचित्रात दुस-या महायुद्धानंतरचा न्युरेम्बर्ग खटला दाखवला आहे. तेथे सर्व ठिकाणी आरोपी-न्यायाधीश-वकील वगैरे फक्त हिटलर दिसतो.  शेवटचे चित्र आहे तोंडात चिरूट असलेल्या विजयी चर्चिलचे.  त्याच्या डोक्यावर अनेक टोप्या आहेत, पण सर्वात वरची टोपी अर्थातच ब्रिटनच्या राणीची!

पुस्तकवेडे सुरेंद्र चौधरीलिंक्स ह्यांनी हे पुस्तक संकलित करण्याचा उद्देश सांगताना प्रास्ताविकात म्हटले आहे, की सध्याच्या रणधुमाळीच्या काळात नीतिमत्ता व प्रामाणिकता टिकवण्याचा प्रयत्न व्यंगचित्रे करत असतात. ती नुसता उपहास करत नाहीत तर निसटून गेलेल्या काळावर आघात करतात व तो जपून ठेवतात.  तो काळ हरवला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या काळातील ही व्यंगचित्रे इथे एकत्र केली आहेत. ती पाहताना स्मितरेषा उमटेल हे खऱेच, परंतु त्या काळातील घटनांकडे गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोनही लाभेल. जीवनात अशा गांभीर्यांची नित्तांत आवश्यकता आहे.

महात्मा गांधींबद्दलच्या व्यंगचित्राचे ‘थिंक महाराष्ट्र’च्या दृष्टीने विशेष महत्त्व असे, की आपण सुरेश लोटलीकर यांची तत्संबंधीची तीन व्यंगचित्रे व त्यांची टिप्पणी ह्यापूर्वी प्रसृत केली आहे. त्यानिमित्ताने मराठी व्यंगचित्रांचा गेल्या शतकभराचा आढावा सादर केला आहे व त्यासोबत शि.द. फडणीसांच्या हास्यचित्रांचे आंतरराष्ट्रीय मह्त्त्व सांगणारा रंजन जोशी ह्यांचा लेखदेखील आहे.

चौधरी हे हुन्नरी कथालेखक आहेत. त्यांचे कुतूहल अपार आहे. ते कशाचा ना कशाचा सतत सोध घेत असतात. ते नाटके दिग्दर्शित करतात, नाटकात कामे करतात, मुलांसाठी शिबिरे घेतात. ‘वुई नीड यु’ ह्या संस्थेचे कार्यकर्ते

आहेत.

संपर्क – 022-25428478

यशवंतराव गडाख...


यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी घडवलेल्या आणि सत्तरीच्या दशकात उभारीने पुढे आलेल्या पिढीतील ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे एक वेगळेपण आहे. या पिढीने सहकाराची पायाभरणी आणि उभारणी केली. सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी पण विलक्षण जिद्द आणि जनसंग्रहाचा व्यासंग या शिदोरीवर मोठे काम उभे केलेली ही माणसे आहेत. याच जातकुळीचे नेतृत्व अहमदनगर जिल्ह्यातील यशवंतराव गडाखांचे आहे. प्रगल्भ जाणिवां आणि समंजस विचार! त्यांचे गाव नेवासा तालुक्यातील 'कौतुकी' नदीच्या काठी वसलेले सोनई. त्यांचे बालपण, शालेय जीवन तिथेच गेले. शेतीचे अपुरे उत्पन्न आणि भाऊबंदकीचे जीवघेणे चटके कायम पाचवीला पुजलेले. गावाच्या बाजारात भाजी विकतांना, व्यापा-याकडे शेतीमाल घेऊन गेल्यावर उपेक्षा वाटयाला यायची. हक्काच्या उत्पन्नासाठी उपेक्षित वागणूक मिळायची. यशवंतराव सांगतात 'मला ग्रामीण माणसांचे, दलितांचे, शेतक-यांचे जगणे परके वाटत नाही ; त्यांच्या मूळ वेदनेची जातकुळी एकच असते. मी तो भोग भोगला आहे. म्हणूनच माझ्या तरूण वयात वडील गेले तेव्हा सगळयांचा विरोध पत्करून दहाव्याचे जेवण न घालता त्याकाळी तो खर्च मी मागासवर्गीय वस्तीतील शाळेसाठी दिला'

यशवंतरावांचा राजकारणातील प्रवेश मात्र अपघातानेच झाला. ते बी.ए.बी.एड्.करून नोकरीच्या शोधात होते. नेमक्या त्या काळात जिल्हा परिषद निवडणूका जाहीर झाल्या. 'या निवडणुकीला उभे राहता का' या प्रश्नाला त्यांनी अनाहूतपणे होकार दिला आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यापूर्वी महाविद्यालयात त्यांनी सचिवपदाची निवडणूक जिंकली होती, एवढाच काय तो निवडणुकीचा अनुभव. ते गाववर्गणी, उसनवारी करून लढवलेली ही निवडणूक जिंकले आणि मग राजकारणात पुढेच जात राहिले. जिल्हा परिषद सभापती पदाच्या काळात परिसरातील शेतक-यांची खासगी साखर कारखान्यात होणारी पिळवणूक त्यांच्या ध्यानी आली. त्यांनी सोनई येथे मुळा सहकारी साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला. प्रखर राजकीय विरोध सहन करत आणि संघर्ष करत त्यांनी तो उभारला आणि गेली तीन दशके यशस्वीपणे चालवून दाखवला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाल उभ्या महाराष्ट्रात गाजला. जाणकार लोक आजही 'जिप अध्यक्ष असावा तर गडाखांसारखा' असे उदाहरण देतात. त्यांनी आशियातील सर्वात मोठया अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची धुरा प्रदीर्घ काळ सांभाळली आहे. ते राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधित्व दीर्घकाळ करत आहेत. आमदार म्हणून विधान परिषदेचे प्रतिनिधित्व त्यांनी दोन वेळा केले आहे. त्यांनी अहमदनगर (दक्षिण) मतदारसंघातून लोकसभेच्या तीन निवडणूका जिंकल्या.या निवडणुकांत त्यांनी बाळासाहेब विखे, बबनराव ढाकणे, ना.स.फरांदे, कुमार सप्तर्षी अशा मोठमोठ्यांना पराभव केला. राजकीय विद्वेषातून निर्माण झालेला 'विखे-गडाख केस'  म्हणजे नगर जिल्ह्याच्या इतिहासातील काळे पान आहे आणि कोर्टाने निवडणुकीस अपात्र ठरवल्यामुळे गडाखांना सहा वर्षे राजकीय विजनवासात जावे लागले.

या राजकीय विजनवासात 1997 मध्ये अहमदनगर येथे आयोजित केलेले 70 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे गडाखांच्या कर्तृत्वाचे आणि संघटनक्षमतेचे अद्वितीय उदाहरण. ते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. आजतागायत कोणत्याही साहित्य संमेलनाला एवढे यश लाभले नसेल! लाखभर लोकांच्या उपस्थितीने गाजलेल्या या संमेलनात हजेरी लावली ती गिरीश कर्नाड, गुलजार, बासू भटटा्चार्य, अण्णा हजारे, डॉ. श्रीराम लागू, आचार्य किशोर व्यास, पं.हृद्यनाथ मंगेशकर, बाबा महाराज सातारकर, शांता शेळके, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, ना.सं.इनामदार, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, विजया राजाध्यक्ष, नारायण सुर्वे, यू.म.पठाण, आनंद यादव, द.मा.मिरासदार, ना.धों.महानोर, के.ज.पुरोहित, सुभाष भेंडे, शिवाजी सावंत, माधव गडकरी, कुमार केतकर, अशोक जैन, शंकर सारडा, विजय कुवळेकर अशा नामवंतांनी आजवर कोणत्याही साहित्य संमेलनाला एवढया संख्येने मोठ्या व्यक्ती  उपस्थित राहिलेले नाहीत. ही साहित्यिक मांदियाळी जमण्याचे कारण म्हणजे यशवंतरावांनी सगळयांशी जपलेला वैयक्तिक जिव्हाळा. या संमेलनात पुस्तक विकीचा उच्चांक झाला.  संमेलनाचे इत्थंभूत इतिवृत्त नोंदवून ठेवणा-या 'संवाद' या ग्रंथाचे प्रकाशनही यशवंतरावांनी दिमाखदार घडवून आणले. त्यानंतर दोनच वर्षात त्यांनी नगरला जागतिक मराठी परिषदेचे यशस्वी आयोजन करून दाखवले.

गडाखांना नवनवीन कल्पना आणि पुरोगामी विचारांचे प्रचंड आकर्षण आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना त्यांनी शेकडो कलावंतांचा जाहीर सत्कार घडवून आणला होता. विवाहप्रसंगी जेवणावळी, मानपान, अनावश्यक खर्च, त्यामुळे ग्रामीण जीवनात वाढणारे कर्जबाजारीपण हे सामाजिक प्रश्न त्यांना अस्वस्थ करतात. त्यात बदल घडवून आणायचा असेल तर सुरूवात स्वतःपासून करावी लागेल हे त्यांनी जाणले. त्यांनी स्वतः  मुलांची लग्ने लावून घेतली ती नोंदणीपध्दतीने आणि जेवणावळींशिवाय. मोठया मुलाच्या नोंदणी विवाहप्रसंगी साक्षीदार म्हणून शरद पवार, विलासराव देशमुख, बासू भटटा्चार्य, ना.धों.महानोर, शंकरराव खरात यांनी सह्या केल्या. दुस-या मुलाच्या विवाहात त्यांनी आंतरधर्मीय सामुदायिक विवाह आयोजित केले होते. या विवाहात वधू-वरांचे पालकत्व स्विकारले होते सुनिल दत्त आणि यशवंतरावांनी. मामा म्हणून अनेक लेखक, कवी, पत्रकार त्यांच्या पाठीशी उभे होते. अशी कल्पकता आणि कलासक्तता हा त्यांचा स्थायिभाव आहे. त्यांची एकसष्टी त्यांनी पुस्तक प्रकाशनाने साजरी केली होती. त्यांनी तीस वर्षांत लाखो झाडांचा खजिना त्यांनी सोनई परिसरात लावला आहे. अमृता प्रीतम व अनेक साहित्यिकांनी त्याविषयी भरभरून लिहीले आहे. यशवंतरावांना जगभर फिरण्याची हौस आहे. त्यांनी जवळपास पंचवीस देश आतापर्यंत पाहिले आणि अभ्यासले आहेत. यातूनच त्यांच्या शिक्षणाविषयीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या आहेत. 1979 साली त्यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हा शिक्षणाचा वटवृक्ष पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, सोनई येथे विस्तारला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थातून हजारो विद्यार्थी आज शिक्षित होत आहेत.

यशवंतराव हे अत्यंत सजग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीला सोप्या भाषेतील ओघवतेपणाचे आणि व्यापक अनुभवांचे वरदान आहे. त्यांनी 'अर्धविराम' या आपल्या पहिल्याच पुस्तकाद्वारे मराठी साहित्यात दमदार पाऊल रोवले आहे. या आत्मचरित्राचा प्रकाशनसोहळा पुण्याच्या बालगंधर्वात रंगला होता. या कार्यकमाला शरद पवार, गुलजार यांच्यासह अनेक दिग्गज साहित्यिक उपस्थित होते. आपल्या खडतर राजकीय व सामाजिक प्रवासाचे सजीव चित्रण करणा-या या पुस्तकाला राज्य पातळीवरचे अनेक पुरस्कार आणि जनमान्यता मिळाली आहे. पुणे विद्यापीठात मराठीच्या अभ्यासकमात त्याचा समावेश करण्यात आला आहे. 'सहवास' या त्यांच्या दुस-या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या वेगळया नियोजनाची छाप पाडणारे ठरले. नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिरात ' पैस' खांबानजिक सुशिलकुमार शिंदे,  विलासराव देशमुख, यू.म.पठाण व मधू मंगेश कर्णिक यांच्या सहभागाने व प्रचंड संख्येने उपस्थित ग्रामीण जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यकम गाजला. आयुष्याच्या प्रदीर्घ प्रवासात आपल्या वाटयाला आलेल्या व्यक्ती, मित्र, परिसर, निसर्ग या सर्वांचे चित्र गडाखांनी या पुस्तकात खुबीने रेखाटले आहे. वृत्तपत्र आणि दिवाळी अंकांमध्येही त्यांचे सातत्यपूर्ण आणि विविध विषयांवरचे लेखन सुरू असते. राजकारणापलीकडे जाण्याची प्रवृत्ती त्यांच्या लिखाणात सतत जाणवते. त्यात सहजतेचा दरवळ असतो. त्यांनी माणसाला निसर्गाशी बांधून ठेवणा-या कृषिसंस्कृतीची बांधिलकी नेहमीच जपली आहे. जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, चंगळवादी जीवनशैली आणि कुटुंबांचे विघटन यामुळे ही ग्रामीण संस्कृती लोप पावते आहे. त्याची संवेदनशील व्यथा त्यांच्या लेखनात अभिव्यक्त होत असते.

सव्वासहा फूट उंची आणि राजबिंडे व्यक्तिमत्त्व असणारे यशवंतराव आता आयुष्याच्या वानप्रस्थात रमत आहेत. धकाधकीच्या आयुष्यात गमावलेले कौटुंबिक क्षण समेटण्याकडे त्यांचा कल असतो. यशवंतरावांना अशातच झालेल्या आईच्या, ताईच्या निधनांची आठवण सैरभैर करते. नव्या पुस्तकाची प्रत मात्र हमखास त्यांच्या हाताशी असते. देश विदेशातील पर्यटनाला ते सतत साद घालत राहतात. ते लिखाणात, विद्यार्थ्यांमध्ये  खुप रमतात. प्रचंड संघटन कौशल्य, सहकाराचा दांडगा अनुभव, बहुआयामी व्यक्तिमत्व यांचा ठेवा असतांनाही जाणिवपूर्वक त्यांचे राजकिय नेतृत्व बहुतांशी अहमदनगर जिल्ह्यापुरते मर्यादित राखले गेले. राजकारणात स्वतःसाठी काही न मागण्याची गडाखांची भिडस्तवृत्ती आणि मितभाषीपणा ही कारणे देखिल त्याच्या मुळाशी आहेत. वास्तविक राज्यपातळीवर नेतृत्व गाजवू शकणा-या त्यांच्या राजकीय क्षमतेला कोणत्याच पक्षनेतृत्वाने न्याय दिला नाही. म्हणूनच की काय आताशा सकीय राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात यशवंतराव आपसूकच सहभागी होतात. 'मला माझ्या परिसराने आणि सर्वसामान्यांनी घडविले आहे. आयुष्यभर मी त्यांचा उतराई असेन' या अभावाने आढळणा-या राजकीय सुसंस्कृतपणाचे तेज त्यांच्या चेह-यावर अखंड असते...

डॉ. सुभाष देवढे पाटील, औरंगाबाद
मोबाईल - 9822750566

चांगल्या चित्रपटांना फिल्म सोसायटी चळवळीचे अधिष्ठान...


28 डिसेंबर 1895 रोजी पॅरीसमधील ऑग्युस्टे व लुईस ल्युमिरे बंधूनी एक-एक मिनिट कालावधीच्या काही चित्रफिती प्रदर्शित केल्या. हाच दिवस चित्रपट कलेचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. यानंतर तीस वर्षांनी लंडनमध्ये जगातील पहिली फिल्म सोसायटी स्थापन झाली. 1932 मध्ये व्हेनीस येथे जगातील पहिला चित्रपट महोत्सव भरला. त्याच वर्षी भारतात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा भारतातील चित्रपट सोसायट्यांना एकत्र करुन 19 सत्यजित राय यांनी फेडरेशन आँफ फिल्म सोसायटीज् आँफ इंडिया या देशव्यापी संस्थेची स्थापना केली. गेल्या पन्नासवर्षात देशातील फिल्म सोसायट्यांनी चारशेचा टप्पा गाठला असून सध्या श्याम बेनेगल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. फंडरेशनच्या सुवर्णमहोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून 1 मे रोजी पुण्यात फेडरेशनच्या महाराष्ट्र विभागातील फिल्म सोसायट्यांचे एक दिवसाचा मेळावा झाला त्याला राज्यभरातून पन्नास प्रतिनिधी आले होते. मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, सोलापूर, कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, नाशिक, लातूर, औरंगाबाद, चिपळूण याठिकाणच्या प्रतिनिधींनी त्यांचे उपक्रम व समस्या याबद्दलची चर्चा करुन आगामी काळात ही चळवळ सर्वदूर पोहचविण्याच्या दृष्टीने काय करता येईल, चळवळीची आगामी वाटचाल कशी असावी याचा विचार विनिमय झाला.

पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे या संमेलनाचे उद्घाटक असल्याने साहजिकच महाविद्यालयांमध्ये फिल्म सोसायटीची चळवळ कशी पोहचवता येईल याचा विचार पुण्यातील संमेलनात झाला. त्यादृष्टीने एक विशेष योजनाही तयार करण्यात आली. आजची महाविद्यालयीन पिढी ज्या काळात लहानाची मोठी झाली त्याच काळात उपग्रहवाहिन्यांचे व त्यापाठोपाठ आलेल्या इंटरनेटचे मोठे अतिक्रमण झाले. पारंपारिक नातेसंबंधांना धक्का देणा-या मालिका, अहोराज चालणारे सिनेमाचे चॅनलस, स्त्री-पुरूष संबंधांचे औगळ दर्शन घडविणा-या साईटस यामुळे मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला ओहटी लागली. त्या नव्या संस्कृतीला सरावलेल्या तरुण पिढीला जगभरातील उच्च अभिरुची संपन्न चित्रपटांची ओळख व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरले. 

महाविद्यालयांमधील 'कॅम्पस फिल्म क्लब' हा त्याच उपक्रमांचा एक भाग.

'फिल्म अँप्रिसिएशन कोर्स' अर्थात चित्रपट रसास्वाद अभ्यास-क्रमाचे महाविद्यालयांमध्ये आयोजन हा त्यातलाच एक भाग व्यक्ती अभिरुचीसंपन्न होण्यासाठी नुसते अभिजात चित्रपट पाहणे पुरेसे नसते. चित्रपट माध्यम, चित्रभाषा यांचाही परिचय असावा लागतो. त्याशिवाय चित्रकर्त्याला काय सांगायचय आणि त्याने ते कसे सांगितले आहे याचा उलगडा नीट होत नाही. केवळ एक चांगला चित्रपट पहिल्याचे समाधान मिळते. त्यातही कॅमे-याच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणारी चित्रभाषा ही जर मातृभाषेतून समजावून होत आली तर एरवी दुर्बोध, कंटाळवाणा वाटणारा चित्रपटाचा रचनाप्रकार जाणून घेण्याची मानसिक तयारी होते.

चौथ्या चित्रपट शिबिराचे उदघाटन-सतीश जकातदार, सुधीर नांदगावकर, उदघाटक बी.के.करंजीया अर्काइव्हचे विजय जाधव...फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र विभागा मार्फत मागील चार वर्षांपासन मराठीतून चित्रपट रसास्वाद शिबीराचे आयोजन केले जात आहे. मराठीतील शिबीराचा हा राज्यातील एकमेव उपक्रम असून व्ही. शांताराम फॉऊंडेशन व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय फिल्म अकाइव्हचे त्याला विशेष सहकार्य मिळत असते. चित्रपट माध्यमाचा इतिहास, अभिजात चित्रपटांची तपशीलवार चर्चा, दिग्दर्शकांच्या भेटी आणि निवडक चित्रपट व लघुपटांचा आस्वाद असा सकाळी 9 ते रात्री 9 दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. याच प्रकारे राज्याच्या सहा विभागांमध्ये तीन दिवसांची चित्रपट आयोजित करण्याचे फेडरेशनचे प्रयत्न आहेत.

चित्रपट रसास्वाद शिबिरांमध्ये सहभागी होणा-यांच्या विचारार्थ चित्रपट माध्यमाच्या अभ्यासक श्यामला वनारसे यांनी एक छोटे टिपण तयार केलयं त्यात त्या म्हणतात, एरवी चित्रपट बघायला काही पूर्व शिक्षणाची गरज आपल्याला जाणवलेली नसते. पण चित्रपटकर्ते जेव्हा एखादी भव्य आणि खोल जाणीव देणारी कलाकृती समोर आणतात.. तेव्हा त्याचा अन्व्य लावायला शिकावे लागते. चित्रपटकर्ता काय आणि कसे सांगतो आहे हे समजावून घेण्यासाठी प्रेक्षकांला स्वत:ची संवेदनशीलता विकसित करावी लागते. या टिपणाच्या अखेरीस श्यामला वनारसे म्हणतात, (चित्रपटाचे) मूल्यमापन करण्यापूर्वी आपण आपली आस्वादाची साधने तयार केली तर चित्रपटाच्या रसास्वादातून समीक्षेकडे जाण्याचा मार्ग तयार होतो. रसास्वादाची ही तयारी आपला चित्रपटाचा अनुभव अधिक समुध्द करते आणि एकूण जीवनानुभवातही कलेचा संस्कार दृढ करते.

सर्वसामान्य प्रेक्षकांची अभिरुची संपन्न होण्यास जसा रसास्वाद शिबीराचा हातभार लागतो त्याचप्रमाणे चित्रपट सोसायटीची चळवळ अधिक बळकट करण्यास अशी शिबिरे उपयुक्त ठरत आहेत. फिल्म फेडरेशनच्या पश्चिम विभागाचे सचिव सतीश जकातदार यासंबंधात म्हणतात व्ही.सी.डी चोविस तास चालणा-या चित्रपटवाहिन्या इंटरनेट, दरवर्षी भरवले जाणारे आंतरराष्ट्रीय महोत्सव यामुळे जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळणे ही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. त्या अर्थाने पाहिले तर चित्रपट सोसायट्यांची उपयुक्तता आता पहिल्या इतकी राहिलेली नाही. म्हणून या सोसायट्यांनी त्यांचा फोकस पॉईंट बदलला पाहिजे. चित्रपटाचा रसास्वाद इंग्रजीपेक्षा मातृभाषेतून घेता येणे हे आता अनिवार्य आहे. चित्रपट सोसायट्यांनी याच दृष्टीने त्यांची उपक्रमशीलता व उपयोगीता वाढवली पाहिजे.

1970 ते 80 या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर, कलात्मक चित्रपटांची जी लाट उसळली तिला चित्रपट सोसायटीच्या चळवळीचे अधिष्ठान लाभले होते. असे फेडरेशनचे केंद्रीय सचिव सुधीर नांदगावकर यांचे मत आहे. चळवळीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही 'बेगर' होतो आता आम्ही 'च्युझर' झालो आहोत आपल्या हवे ते चित्रपट जगभरातून मिळवणे सहज शक्य आहे. देशातील प्रत्येक मोठ्या शहरात स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता होऊ लागलाय, यातले निवडक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेऊन दिग्दर्शक व प्रेक्षकांमध्ये थेट संवाद घडवून आणणे हे आमचे प्रमुख कार्य आहे..

पुण्यातील रसास्वाद शिबिरात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी अशी टिपणी केली आहे की काही वर्षांपूर्वी सर्वमानसिक आजारीसाठी 'वेडा' हा एकच शब्द वापरला जायचा. आता य आजारांचे निदान वेगवेगळ्या वर्गवारीत केले जाते. चित्रपटांचे सुद्धा तसेच आहे. वर्तमानपत्रे बातम्यांमधून मनोरंजन करु लागल्याने त्यांचे लोकशिक्षणाचे काम चित्रपटांना करावे लागत आहे. अशा चित्रपटांना केवळ 'चांगला' 'वाईट' ठरवून चालणार नाही यावर्गवारीच्या पलिकडे जाऊन चित्रपटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. फेडरेशनच्या पन्नासपैकी पंचवीस वर्षे व्यापणा-या 'आशय'चे प्रयत्न त्यात दिशेने चालू आहेत.

- रमेश दिघे..
  ramesh_dighe@yahoo.in

पराभवानंतरच्या चाली-हालचाली


नेहरूंनी घटना परिषदेपुढे  27 नोव्हेंबर 1947 रोजी जे भाषण केले, त्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेतल्या प्रतिनिधींना आपला पराभव झाल्यासारखे वाटले. त्यानंतर प्रतिनिधींनी परिषदेचे चिटणीस यांना आपल्या प्रतिक्रिया लिखित स्वरूपात कळवल्या आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कोणत्या मार्गाने न्यायची त्या नव्या दिशेचा शोध सुरू झाला.

अध्यक्ष शंकरराव देव यांनी पं. नेहरूंचे मत आपल्याला पटले असल्याचे पत्र लिहून कळवले.
हरिभाऊ पाटसकर, केशवराव जेधे, रंगराव दिवाकर यांनी एक पत्रक काढून आपले  नेहरूंशी मतभेद असल्याचे जाहीर केले. 'केवळ आंध्र प्रदेश प्रांत हा वेगळा करण्यास पात्र ठरवून नेहरूंनी अन्य प्रांतांवर अन्याय केल्याचे सांगून, नुसता आंध्र प्रांत निर्माण करायचा असेल तरी त्याच्या सीमा निश्चित करण्यासाठी आयोग नेमावा लागेल आणि मद्रास प्रांतात समाविष्ट केलेला बल्लारी जिल्हा कर्नाटकाला जोडण्याचा प्रश्न त्या आयोगाला सोडवावा लागेल, याचीही जाणीव पाटसकर, जेधे आदि मंडळींनी नेहरूंना पत्रकाद्वारे करून दिली.

विदर्भातले नेते रामराव देशमुख यांनी डॉ.ना.भा.खरे, बापुजी अणे आणि पंजाबराव देशमुख यांच्याशी चर्चा करून माडखोलकरांना लिहिले, ''आपल्या सर्वांना माहीत असलेले मुंबईतील हितसंबंधी गट आणि इतर लोकांनी वेगळ्या प्रांतासाठी केलेल्या मागण्या यांच्यामुळे आपण पराभूत झालो आहोत. महाराष्ट्राचा स्वतंत्र प्रांत करण्याबाबत काँग्रेस श्रेष्ठींना कधीच उत्साह वाटला नाही, म्हणून ते वेगळ्या प्रांतासाठी फार गडबड करत होते, त्यांची स्वतंत्र आंध्राची मागणी, अन्य मागण्यांमधून बाजूला काढून काँग्रेस श्रेष्ठींनी ती मान्य केली आणि त्यांनी आपल्याला, वाटत होते तसेच, अनिश्चित भवितव्याच्या तोंडी दिले आहे. आपण त्यांना पुरेसा उपद्रव दिला नाही हेच आपले चुकले.''

थट्टा अंगाशी आली..


थट्टा अंगाशी आली...
नव्हे...डोक्यावर बसली !


आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले आद्य विडंबनकार! 'झेंडूची फुले' हा त्यांच्या विडंबन काव्यांचा संग्रह सर्वपरिचित आहे.
अत्र्यांच्या विडंबनाचा फटका ब-याच लोकांना बसला. त्यातून मैत्रीच्या संबंधात काहींशी वितुष्ट आले, पण ते फार काळ टिकले नाही. या विडंबनाचा फटका समर्थ रामदासांनाही बसला. अत्र्यांनी मनाच्या श्लोकांचे विडंबन केले. त्यातला एक श्लोक प्रसिध्द आहे.

मनासज्जना,चार आण्यांत फक्त।
तुला व्हावयाचे असे देशभक्त ॥
परि सांगतो शेवटी युक्ति सोपी ।  
खिशामाजी ठेवी सदा गांधी टोपी ॥   

अत्र्यांनी जेव्हा या काव्यपंक्ती लिहिल्या तेव्हा गांधी टोपीचा प्रसार सर्वत्र झाला होता. ते देशभक्तीचे प्रतीक ठरले होते. गांधीटोपीची किंमत चार आणे होती.

हे विडंबन प्रसिध्द झाल्यानंतर काही वर्षांनी, अत्र्यांना जेव्हा पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांना सर्व प्रथम चार आणे खर्च करून गांधीटोपी विकत घ्यावी लागली. आणि त्यांच्याच विडंबित श्लोकाप्रमाणे कृती करावी लागली.

लेखसूची..


लेखसूची.. प्रेषक - प्रमोद शेंडे

मायबोली - मराठी विषय विविधपैलंचे दर्शन - दै सकाळ

विविध लेखक. दि. 23 नोव्हेंबर 2009 पासून दररोज ( रविवार सोडून)

ती स्वाती - प्रतिमा जोशी.... महाराष्ट्र टाइम्स... दि. 2 जानेवारी 2010

( पाकिस्तानातील स्वाग खो-यात तालीबान्यांचा बिमोड होवून तेथील जनता पूर्वपदावर येत आहे. तेथील छोट्या मुली म्हणजे "स्वात" च्या भवितव्याचे रुपक आहे. त्याबद्दल)

धान्यापासून अखंड उर्जा ---- सोनाली कोलारकर-सोनार.... लोकसत्ता चतुरंग... दि. 2 जानेवारी 2010

धान्यापासून महानिर्मिती करण्याऎवजी (सडक्या) पोचट व कमी प्रतिच्या धान्यापासून बायोगॅस-सयंत्र करणा-या व आंतरराष्ट्रीय अँशडेनचा मानाचा पुरस्कार मिळवणा-या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्या महत्त्वपूर्ण शोधाविषयी...

विहंगम पृथ्वीलोक - अपर्णा मोडक... लोकसत्ता चतुरंग... दि. 2 जानेवारी 2010

फेंच छायाचित्रकार यान बेयाँ यांनी देशोदेशीच्या निसर्गाचे आकाशातून केलेले अप्रतिम छायाचित्रण फ्रान्सच्या दुतावासातर्फे मुंबईच्या जनतेला पहाण्यासाठी मरीन लाईन्स प्रदर्शन आयोजित केले आहे. ह्या प्रख्यात छायाचित्रकाराविषयी ही माहिती..

टॉवर-मानसिक न्यूनगंडाचे प्रतिक- दत्ता परब लोकसत्ता वास्तुरंग... दि. 2 जानेवारी 2010

टॉवर संस्कृतीचे तोटे

तेजाची न्यारी दुनिया - श्री. श. क्षीरसागर - लोकसत्ता चतुरंग 19 डिसेंबर 2009

बोटभर उंचीच्या कीटकभक्षी "ड्रोसेरा" ह्या वनस्पतीची ही चंदेरी तेजाचीन्यारी दुनिया पाऊस संपता संपता डोंगरद-यात हिंडून अनुभवता येते.

मानवी बाँम्बचा कारखाना - पाकिस्तानातील दारा इस्माईलखान ह्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याचे केलेल्या कारवाईत आत्मघाती बाँम्बचा कारखानाच आढळून आला. इम्तियाज गुल यांनी लिहिलेल्या "द अल् कायदा कनेक्शन" या पुस्तकाचा परिचय... अरविंद गोखले

लोकसत्ता- रविवार दि. 3 जानेवारी 2010

- अमृत दिवाळी अंक 2001 मधील उल्लेखनीय लेख.....

मंदिरांच्या शोधात - श्री निवास गडकरी

पुण्याचे श्री मोरेश्वर व सौ. विजया कुंटे हे दाम्पत्य गेली 14 वर्षे महाराष्ट्र पालथा घालत आहेत ते मंदिरांची माहिती गोळा करण्यासाठी आतापर्यंत जवळपास 1600 मंदिरे पाहून त्यांची संपूर्ण माहिती उदा. त्या जागेचे धार्मिक महात्म्य, मूर्ती शिल्पकाम त्यातील प्राणी विश्व इ.) गोळा करीत आहेत.

बंडापूर्वीची दिल्ली ( भाग- पहिला) - डॉ. शरद अभ्यंकर

लेखक विल्यम डार्लिपल व अल्ताफ हुसेन डाली या कवीनी केलेले 1857 च्या बंडापूर्वीचे दिल्लीचे मनोरंजक वर्णन त्यावेळच्या लोकांच्या चालीरीती, तेथील लोक , शिक्षण पद्धती, आहार विहार यांचे वर्णन.

आभासी शरीर - अर्थबोधपत्रिका भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी औषधांच्या निरनिराळ्या चाचण्या व त्यांचे परिणाम शोधण्यासाठी आभासीशरीर ( व्हर्चुअल फिजिआँलॉजीकल ह्यमून) बनविण्याचे संशोधन जोरात चालू आहे. त्याबद्दलचा वृत्तांत 

संरक्षित घर


2009माणसाला आपल्या जीव-जुमल्याचे संरक्षण करण्याची फिकीर कोणत्याही काळात असते. आज मुंबई-पुण्यात सुरक्षित गृहसंकुले बांधण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चहुबाजूंनी कोट असतो. प्रवेशद्वारावर गुरखा असतो. आलेल्या पाहुण्याची चौकशी केल्यावर त्याला आत सोडले जाते. अनेक ठिकाणच्या कंपाउंडच्या भिंती आठ फूट उंच असतात. तसाच हा नाशिकचा जुना वाडा. भुरटया चोरांपासून रक्षण करणारा. याच्या तळमजल्यावरच्या भिंती भक्कम दगडाच्या आहेत. तळमजल्यावर खिडक्यांच प्रमाण कमी असून वाड्यात शिरण्यास एकच दरवाजा आहे.
पैठणचा वाडा, मे 1979.

तसेच हे पैठणचेही एक जुने घर. वास्तविक पैठण आणि नाशकात पुष्कळ अंतर आहे.तरीही गृहसंरक्षणाची कल्पना बदललेली दिसत नाही. तसं पैठणमधलं एका माहेश्वरी कुटुंबाचं हे घर. ते तीनशे वर्षांपूवी बांधलं गेलं आहे. असं कळलं. जसा काही किल्लाच! या घरातही चौक आहे. तळमजल्यावरच्या भिंती दगडाच्या आहेत आणि खिडक्या नाहीत. प्रवेशद्वारातून आत गेलं की चौक आहे. मोठ्या कुटुंबाला दोन वर्षें पुरेल इतक्या धान्याचा साठा करायची सोय आहे. या घरातलं स्वैपाकघर मोठं असून चुलीतला धूर निघून जाण्यासाठी उंच छताखाली खिडक्या आहेत. या घराचे प्रवेशद्वार किल्ल्याच्या दरवाजासारखे आहे

तुरुंगातले काव्य


आचार्य अत्रे यांना अटक 27 जानेवारी 1956 रोजी होऊन त्यांची रवानगी
ऑर्थर रोडच्या तुरुंगात करण्यात आली.
ऑर्थर रोड तुरुंगातल्या वास्तव्याच्या दुस-या दिवशी
नमस्ते श्री महाराष्ट्रा,
भारताच्या जवाहरा,
तीन कोटी मराठयांच्या
मायबापा मनोहरा !

हे काव्य जन्माला आले त्याच वेळेला अत्र्यांच्या मनात विचार आला की या काव्याचा धागा असाच लांबवत ठेवला तर? ... तर 'महाराष्ट्र-गीता' निर्माण होईल!
अत्र्यांची 18 फेब्रुवारी 1956 रोजी  ऑर्थर रोड  तुरुंगातून ठाण्याच्या तुरुंगात बदली झाली. त्यांना 20 फेब्रुवारी 1956 रोजी ऑर्थर रोड तुरुंगातून ठाण्याला हलवण्यात आले. तर भायखळा ते ठाणे असा रेल्वे प्रवास करत,  ते पोलिसांसह ठाणे स्टेशनवर पोचले, पण ठाणे तुरुंगात नेण्यासाठी कोणीच आले नसल्याने तो गोतावळा वाहनाची वाट बघत बसला.

अत्र्यांची ठाणे तुरुंगात बदली झाली असून ते पोलिस पहा-यात ठाणे स्टेशनवर आले आहेत, हे समजताच लोकांनी तिथे गर्दी केली. त्या गर्दीत कोणीतरी आचार्य नरेंद्र देव यांच्या निधनाची वार्ता अत्र्यांना सांगितली.
आचार्य नरेंद्र देव हे थोर विचारवंत, त्यांचा जन्म पुण्याजवळ देहुरोड नजीकच्या परंदवडी या गावी झाला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर त्यांना गुरुस्थानी मानत असत. आचार्य नरेंद्र देव यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर अत्र्यांना अतिशय दु:ख झाले, पण त्या मनस्थितीत सुध्दा त्यांना ज्या उत्स्फूर्त काव्यपंक्ती सुचल्या त्या वाचून हसू येते. त्या काव्यपंक्ती अशा-

शंकर देवा सोडून देवा,
नरेंद्र देवा का नेले?
आणि सदोबा समोर असता
दृष्टींतून ते कसे सुटले?

मी महाराष्ट्राचा - महाराष्ट्र माझा !


राज श्रीकांत ठाकरे. जन्म 14 जून 1968. एक युवा नेतृत्त्व, एक कलाकार, मित्रांचा मित्र, रसिक, जे.जे.स्कूल ऑफ आर्टस चा विद्यार्थी, व्यंगचित्रकार म्हणून लौकिक पावलेले हे नाव. व्यंगचित्राकलेबरोबरच राजकारणाचे धडे घरीच आपल्या काकांकडून (बाळासाहेब ठाकरे) घेतलेला हा तरूण.

शिवसेनेत असताना आणि नसतानाही जी मोजकी माणसे कायम चर्चेत असतात त्यांपैकी राज ठाकरे हे एक. राज हे उत्तम व्यंगचित्रकार असल्याने बहुधा बेधडक भाष्यकार, बोचरे टीकाकार, विरोधकांच्या  फिरक्या घेणारे असे आहेत. राज राजकारणातही आत्मविश्र्वासाने उतरले आणि  त्यांनी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' ही तंत्र पक्षसंघटना काढून राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांचे राजकीय जीवन अनेक वादग्रस्त घटनांनी भरलेले आहे.

राज यांना चित्रपटांची आवड आहे. भविष्यात; कॉलेजमध्ये असल्यापासून करायची आवड आहे. त्यांनी बेकार तरुणांचा नागपुरात मोर्चा काढला. 2000 साली तरूणांना प्रेरक, मार्गदर्शक असा भव्य कार्यक्रम पुण्यात घेतला- 'झीरो टू हीरो'. राज ठाकरे ह्यांचे नेतृत्त्व कौशल्य लक्षात घेऊन बाळासाहेबांनी 'विद्यार्थी सेने'ची संपूर्ण जबाबदारी ह्यांच्यावर सोपवली व ती त्यांनी समर्थपणे पेलली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यी संघटन करून त्यांना प्रोत्साहन दिले, प्रेरित केले, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थी हा इतर राजकारण्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेला घटक. पण प्रचंड ऊर्जा असलेली ही शक्ती आपल्या कुशल नेतृत्वाने केली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबरोबर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचा प्रश्न हाताळताना शैक्षणिक, चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग आयोजित करून बेरोजगारांचा बौध्दिक विकास करण्याबरोबरीने त्यांस रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या 'शिव उद्योग सेने’ च्या  माध्यमातून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचा प्रश्न यशस्वीपणे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद, मी मुंबईकर मोहीम, परप्रांतीयांचे अतिक्रमण, मराठी माणसांच्या नोक-यांचे प्रश्न (मराठी अस्मिता), भुमिपुत्रांचे हक्क इत्यादी उपक्रमांत राज ठाकरेंचा सहभाग असतो.

'आम्ही कसे घडलो!' हा मान्यवरांच्या अनुभवांचे बोल युवकांना अनुभवण्याची संधी देणारा कार्यक्रम असेल अथवा 'जिगर 2000' सारखा महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम असेल, अशा दिशादर्शक कार्यक्रमांच्या आयोजनामधून तमाम मराठी तरूणांमध्ये नवी उमेद, धडाडी, जिगर निर्माण करून त्यांना दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य राज ठाकरे यांनी केले आहे. मराठी मनामध्ये असणारा 'न्युनगंड' कमी करून व्यावसायिक दृष्टी आणणारा मराठी तरूण निर्माण करण्यामध्ये राज ठाकरे यांचा कटाक्ष आहे. पक्षांतर्गत राजकारणामध्ये होणारी घुसमट मराठी माणसाला घडवण्यासाठी उराशी बाळगलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणताना होणारी पक्षांतर्गत कुचंबणा, स्वत:सोबत असंख्य कार्यकर्त्यांच्या विचारांची कोंडी होत आहे हे वारंवार बोचणारे शल्य इत्यादी बाबींचा विचार करता यातून नवनिर्माणाचा मार्ग शोधता शोधता, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' या राजकीय पक्षाचा जन्म 9 मार्च 2006 रोजी झाला.

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' एका युवा नेत्याच्या कल्पनाविष्कारातून जन्माला आलेला अन् महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची स्वप्ने महाराष्ट्रीय जनतेस दाखवणारा राजकीय पक्ष आहे पक्ष नवीन आहे. भोवताली सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांचे जंजाळ आहे. अशा स्थितीतही नवे मार्ग शोधण्याची धडपड उल्लेखनीय रीत्या सुरू आहे. प्रस्थापित नेतृत्त्वाच्या मागे न लागता महाराष्ट्राला विकासाची ओळख करुन देण्यासाठी आवश्यक असणा-या वाटा शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वत: आपल्या परीने करत आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी, वीज, रस्ते, शेती, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासोबतच सुंदर, स्वच्छ, विकसित आणि आधुनिक शहरे निर्माण करणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्राथमिकता आहे. विकासाची फळे तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबध्द असून, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वत:सोबत आपल्या मराठी बांधवांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रांत रोजगार व निर्मितीसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत जनजागृती करून एक संवेदनशील मराठी माणूस घडवणे यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्राधान्य देणार आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीत मोठया संख्येने निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची संख्या पाहता महाराष्ट्राने राज ठाकरेंवर दाखवलेल्या विश्वासाची प्रचीती येते.
विविध क्षेत्रांतील तसेच विविध वयोगटातील मित्रांचा गोतावळा असणारे  राज ठाकरे व्यक्तिगत जीवनात 'मित्रांचा मित्र' म्हणून ओळखले जातात. शिवाजी महाराजांच्या अडीचशे गडकोटांच्या चाळीस हजार छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस' मध्ये नोंद होण्यासाठी तरुणांच्या धडपडींमध्ये काही कमतरता राहणार नाही. यासाठी दक्ष असणारा राज, मराठी युवकांमध्ये मराठी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणारा राज, आपल्या आदरणीय नेत्याचा जीवनपट जगाला उलगडून दाखवण्यासाठी 'बाळ केशव ठाकरे-अ फोटोबायोग्रफी' हे पुस्तक जिद्दीने व चिकाटीने पूर्ण करणारा राज, पैशांअभावी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता असूनही परदेशी स्पर्धेला मुकणा-या खेळाडूला सर्वतोपरी साहाय्य करणारा राज.... राज ठाकरे यांच्या स्वभावाच्या विविध छटा आपणास पहावयास मिळतात.

एकूणच 'राजकारण' असो वा 'मैत्री', जे करू ते संपूर्ण निष्ठेने, एकग्रतेने व कौशल्याने करण्याची हातोटी राज ठाकरेंना लाभली आहे. मराठी युवकांना प्रोत्साहन, पाठिंबा देणारा हा ख-या अर्थाने मराठी युवकांचा युवक प्रतिनिधी असल्याची प्रचीती क्षणोक्षणी दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे असे मानणा-या काही मोजक्या राजकारण्यांमध्ये राज ठाकरे यांचा क्रमांक निश्चितच अव्वल आहे. मला रिमोट कंट्रोल किंवा सॅटेलाईट व्हायला आवडेल हे त्यांचे एका मुलाखतीतील उद्गार त्यांच्या कर्तृत्वाचे सूचक आहेत.

- प्रसाद क्षीरसागर

दोन विनोदवीरांची जुगलबंदी!


आचार्य अत्र्यांप्रमाणेच शा.दादा कोंडके हे महाष्ट्रातील प्रख्यात विनोदवीर! हजरजबाबीपणात दादांचा हात धरू शकेल असा माणूस शोधून सापडणार नाही. दादांशी गप्पा मारायला जायच म्हणजे ते बोलतील ते सगळा वेळ ऐकायचं आणि पोट दुखेपर्यंत हसायचं! हसून हसून पोट दुखलं हे दादांशी गप्पा मारताना अनुभवायला यायचं!

'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचे प्रयोग त्यावेळी जोरात चालले होते. हा नाट्यप्रयोग म्हणजे दादांच्या हजरजबाबीपणाची कमाल होती. चालू घडामोडींवर दादांनी मारलेले टोमणे हे अनेकांना हसवून गेले तर अनेकांना पोटदुखी करून गेले. आचार्य अत्रे यांचा उल्लेख या नाटकात एकदा होत असे तर कोतवालाच्या लग्नप्रसंगात 'मराठा'चा उल्लेख होत असे ते दोन प्रसंग असे-

राजा: काय हे! आमच्या राज्याचा कोतवाल एवढा आजारी आणि आम्हाला खबर नाही? प्रधानजी! राजवैद्यांना त्यांची प्रकृती दाखवायला सांगा.

प्रधान: दाखवली महाराज!

राजा: कोणाला?

प्रधान: आपले ते हे...(हवालदाराला उद्देशून) तू सांग रे!

हवालदार: (गोंधळतो) आपले ते हे...म्हणजे डॉक्टर लागू!

राजा: (आश्चर्याने) लागू? पण आमचे फॅमिली डॉक्टर कुलकर्णी असताना हे लागू कुठून आले?

हवालदार: आले नाहीत. अत्र्यांनी आणले.

यात हवालदाराची भूमिका दादा करायचे. त्यावेळी रंगभूमीवर आलेलं आचार्य अत्र्यांचं 'डॉ.लागू' हे नाटक जोरात सुरु होतं. त्यामुळे डॉ.लागू अत्र्यांनी आणले हे खरचं होतं.

नाटकाचा शेवटचा प्रसंग! कोतवालाचं मैनावतीशी लग्न होत आहे. तयारी करताना कोतवाल शिपायाला बाशिंग बांधायला सांगतो. शिपाई कोतवालाला बाशिंग बांधण्याऐवजी आपल्याच डोक्याला बांधू लागतो. कोतवाल ओरडून हवालदाराला ते दाखवतो-

कोतवाल: हे हवालदारऽऽ! हे येडं बघ, ए!

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या.(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस-चारसोबीस, ए दरवडेखोर हरामखोर....

आयला! बरं झालं सकाळी 'मराठा' वाचला.

यावर नाटयगृहात एक प्रचंड हास्यकल्लोळ उसळायचा. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांची विशेषणं प्रेक्षकांनी 'मराठया'त वाचलेली असायची.

दादांच्या विनोदानं 'पोटदुखी' लागलेल्या कोणीतरी अत्र्यांकडे,''दादा कोंडके तुमची बदनामी करतो' अशी चुगली केली. अत्र्यांनी वसंत सबनीसांना निरोप पाठवला ''जरा त्या कोंडक्याला माझ्याकडे घेऊन या.''

वसंत सबनीसांना विषय काय असावा त्याची कल्पना आली. कारण खूप दिवस आधीपासून ते दादांना समजावून सांगत होते.''दादा, तू अत्र्यांच्या नादाला लागू नकोस. त्यांनी भल्याभल्यांची चड्डी सोडली. आपण तर किस झाड की पत्ती,''

दादांनी सबनीसांचं बोलणं ही मनावर घेतलं नाही आणि टोमणे मारणं बंद केलं नाही. अत्र्यांचा निरोप आल्यावर वसंत सबनीस म्हणाले,'' दादा. तुला सांगूनसुध्दा तू ऐकलं नाहीस. खा आता शिव्या, अत्र्यांनी मला तुला घेऊन बोलावलंय.''

दादा आणि सबनीस, दोघं 'मराठा'च्या कार्यालयात पोचले. अत्र्यांच्या केबिनमध्ये गेले. पाठोपाठ चहा आला.

''बसा, सबनीस. चहा घ्या. आज काय काम काढलत?''
काही नाही. कोंडकेला घेऊन आलोय.''

'' हेच का ते ? काय हो तुमच्या नाटकात तुम्ही आमची बदनामी करता.''

दादा अतिबेरकी! त्यांना अत्रे साहेबांना नाटकाच्या प्रयोगाला बोलवायचं होतं. ती संधी आयती चालून आली होती.

'' साहेब! आपण आमचं नाटक बघायला या. तुम्हाला जर वाटलं की मी आपली बदनामी करतोय तर पुढच्या प्रयोगातून तो भाग गाळून टाकू.''

'पुढच्याच प्रयोगाला येतो' असं अत्र्यांचं आश्वासन घेऊन दादा आणि सबनीस तिथून निघाले.

प्रयोगाचा दिवस उजाडला. नाही म्हटलं तरी दादांच्या मनात चलबिचल चालू होती. दुरुन अत्रे  साजरे दिसले तरी त्यांच्याशी भेट झाल्यावर दादांची थोडी गडबड उडालीच होती.

गण, गवळण, बतावणी झाली. मध्यंतरात अत्र्यांनी आत जाऊन दादांना विचारलं, ''ते आम्हाला मारलेले टोमणे कधी आहेत?''

''ते वगात आहेत. वग पूर्ण बघायवाच लागेल आपल्याला त्यासाठी.'' दादा.

झालं. वग सुरू झाला.'डॉ.लागू अत्र्यांनी आणले' या विधानाला साहेबांनी हसून दाद दिली. साहेब नाटक पाहण्यात रंगून गेले.

शेवटचा प्रसंग आला. कोतवाल हवालदाराला उद्देशून म्हणाला 'हे हवालदारऽऽ हे येडं बघ ए!''

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या...(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस चारसोबीस, ए दरवडेखोर

हरामखोर... आयला! बरं झालं सकाळी मराठीतलं एक वृत्तपत्र वाचलं....

यावर अत्रे ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले ''ए गाढवा!! 'मराठा' म्हण'' मग पुन्हा दादांनी ते वाक्य 'मराठा'चा उल्लेख करून म्हटलं.

दादांनी 'मराठा'चा उल्लेख करणं ही 'मराठया'ची किंवा अत्र्यांची बदनामी नव्हती तर तो सन्मान होता. मग असा सन्मान अत्रेसाहेब कसा नाकारणार?

आचार्य अत्रे यांच्यामध्ये गुणग्राहकता होती, अत्र्यांनी आवर्जून 'मराठा'चा उल्लेख करायला लावला हा जणू दादांसाठी आशीर्वादच ठरला!