झोत पुस्तकाची चाळिशी : शिळ्या कढीला ऊत!
मी रावसाहेब कसबे यांच्या ‘झोत’ या पुस्तकातील प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारे ‘‘झोत’च्या निमित्ताने संघकार्याचा मागोवा” हे पुस्तक त्याच वेळी लिहिले होते. मी स्वतः त्या पुस्तकाच्या प्रती कसबे, नरहर कुरुंदकर व इतर समाजवादी लोकांना पाठवल्या होत्या. कुरूंदकर वगळता, इतर कोणी त्याची साधी पोच दिली नाही किंवा मी कसबे यांच्या विधानांवर खोडून काढण्यासाठी जे आक्षेप केले, त्याचा पुन:प्रतिवादही केला नाही. जनता पक्षाच्या पुण्याच्या शिबिरात संघवाल्यांनी फु.क्रां.द.च्या (इति अरूण लिमये. मूळ नाव -युवक क्रांती दल) पावलावर पाऊल ठेवून गोंधळ घालणे, पुस्तकाची होळी करणे इत्यादी गोष्टी केल्या हे खरे. मी स्वत: ‘संघकार्याचा मागोवा’ यामध्ये त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे (पृष्ठ 1). माझ्यासारखा एखादा व्यक्तिगत बोरू बहाद्दर (मी लेखक आणि माझी पत्नीच प्रकाशक) सोडला तर, कोणाही मातब्बर संघवाल्याने ‘झोत’चा प्रतिवाद केला नाही. सारे संघवाले त्यांच्या पद्धतीप्रमाणे काही न बोलता आणि गाजावाजा न करता काम करत राहिले. पुस्तकाची जाळपोळ आणि गोंधळ यांमुळे ‘झोत’च्या बरोबर रावसाहेब कसबे यांना मात्र फुकटात प्रसिद्धी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्याभोवती हौतात्म्याचे वलय तयार झाले! ‘झोत’च्या आवृत्ती निघाल्या आणि भाषांतरे झाली असली तरी संघाने माझे पुस्तक बासनात बांधून ठेवले. आता, चार दशकांनंतर, मिलिंद कसबे यांना त्या वादाचे मढे उकरून काढायचे असेल तर मी ‘संघकार्याचा मागोवा’त कसबे यांच्या लिखाणासंदर्भात केलेली पुढील विधाने अनायासेच पुढे येतील.