रोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती
मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना स्वत:मधील गुणदोषांची ओळख होण्यास हवी. त्यांना काय चांगल्या प्रकारे जमते, आवडते ते त्यांचे त्यांना कळण्यास हवे; नाहीतर योग्य त्या वयात, योग्य तो निर्णय घेता न आल्यामुळे, पुढे त्यांची प्रगती होत नाही. तेव्हा ती निर्णयक्षमता योग्य त्या वयातच येणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य विचारांची गरज आहे. ते पुन्हा आत्मविश्वासातून निर्माण होतात.
विचार करणे ही गोष्ट सध्या टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यांमुळे थांबली आहे किंवा चुकीच्या दिशेने जात आहे. विचार जीवनाला योग्य दिशा देतो. एक चांगला विचार मनुष्याचे आयुष्य बदलू शकतो.