तामसवाड्याचा अभिनव जलप्रयोग
17/11/2018
वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात आले. तो प्रकल्प ‘पर्जन्यसंवर्धन, संधारण, संचय व भूजल पुनर्भरण’ असा होता. केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी हे ‘पूर्ती सिंचन संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर सिव्हिल इंजिनीयर, ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव गोविंद कोटस्थाने हे संस्थेचे सचिव आणि तामसवाडा प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व कार्यवाहक आहेत. शेती हा तेथील एकमेव व्यवसाय. तेथे पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्यामुळे शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हा प्रश्न गंभीर होता.